शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

‘संशय हेच क्रौर्य’

By admin | Published: October 03, 2016 6:13 AM

नागपूर खंडपीठाने सतत १३ वर्षे ते क्रौर्य सहन केलेल्या एका अभियंता महिलेने आपल्यासमोर घटस्फोटासाठी दाखल केलेली याचिका मंजूर केली

पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय घेणे हा वैवाहिक जीवनातील क्रौर्याचा भाग असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सतत १३ वर्षे ते क्रौर्य सहन केलेल्या एका अभियंता महिलेने आपल्यासमोर घटस्फोटासाठी दाखल केलेली याचिका मंजूर केली आहे. अभियंता पदाची जबाबदारी शिरावर असलेल्या या महिलेला तिचे काम व कार्यालयीन जबाबदाऱ्या यामुळे दीर्घकाळ घराबाहेर राहावे लागे. या उलट कोणतेही काम न करणारा व अर्धवट शिकलेला तिचा नवरा व त्याच्या कुटुंबातील इतर तिची संशयपूर्ण वाट पाहत घरी असत. त्याच कारणावरून ते तिला मारझोड करीत व तिचा इतर प्रकारांनीही छळ करीत. याच आपत्तीपायी या महिलेला दोनदा गर्भपाताला तोंड द्यावे लागले. पुढे तिला एक मूलही झाले. दरम्यान तिची बदली पुण्याला झाली. काही काळ तिच्यासोबत जायला तयार नसलेला नवरा पुढे तिच्यासोबत गेला. पण आपले अर्धवट शिक्षण आणि पत्नीचा अधिकार यामुळे मनात सातत्याने न्यूनगंड बाळगणारा हा इसम तेथेही तिला मारहाण करू लागला. या साऱ्याला कंटाळून त्या महिलेने कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तेथे मनाजोगा न्याय न मिळाल्याने तिने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. तिची कैफियत ऐकून घेणाऱ्या न्या. वासंती नाईक आणि न्या. इंदिरा जैन यांनी तिची घटस्फोटाची विनंती मान्य करताना आपले उपरोक्त मत नोंदविले आहे. त्या पीडित महिलेला न्याय देताना तिचे मूल तिच्याच सोबत राहील असेही त्यांच्या पीठाने म्हटले आहे. पत्नीच्या चारित्र्याविषयीचा संशय मनात बाळगणे, तो व्यक्त करणे आणि त्यावरून तिचा छळ करणे हा विवाहातील क्रूरपणाचा भाग असल्याचे या पीठाने व्यक्त केलेले मत अनेक विवाहित स्त्रियांच्या मनात अकारण वास करणारा भयगंड दूर करणारे आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्य व सबलीकरणाला नवे बळ देणारे आहे. आपल्या समाजातील मध्यमवर्गासह बहुतेक सगळ्याच वर्गांचा एक दृढ समज हा की मुलीचे लग्न एकदा लावून दिले की तिचे सगळे प्रश्न सुटतात व आपणही तिच्या जबाबदारीतून मुक्त होतो. वास्तव हे की मुलींच्या जीवनात विवाहानंतर नव्या समस्याही उत्पन्न होतात. त्यांना त्या यशस्वीपणे तोंड देऊ शकल्या नाहीत तर त्यांच्यामागे पुन्हा त्यांच्या पालकांना उभे राहावे लागत असते. लग्न करून सोबत नेलेल्या व काही काळानंतर कोणतेही कारण न देता माहेरी पाठवून दिलेल्या अभागी मुलींची संख्या महाराष्ट्रात पुण्यापासून गडचिरोली-सिरोंचापर्यंत फार मोठी आहे. शहरी भागात राहणारी कुटुंबे किमान त्यांची चर्चा करतात. ग्रामीण भागात अशा मुली कालांतराने साऱ्यांच्या विस्मरणात जातात आणि त्यांच्या आयुष्याची समाप्तीही तशीच होते. लग्न जमविताना जोडीदारांचे ३६ गुण जुळतात की नाही हे पारंपरिक आग्रहामुळे व तेवढ्याच कमालीच्या भाबडेपणामुळे पाहणारी माणसेही त्यांच्यातल्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक व स्वभावशीलतेतला फरक समजून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. स्वत:चे लग्न भावनेच्या एखाद्या लाटेच्या आहारी जाऊन करणारी मुले वा मुलीही तशा तपशिलात जाताना कधी दिसत नाहीत. परिणामी काही काळानंतर त्यांच्या आयुष्याची वाटचाल समांतर होऊ लागते व पुढे त्यांच्यातले अंतरही आणखी वाढत जाते. आपण आपल्या जवळच्या व शेजार संबंधातल्या अनेक कुटुंबात दिसणारे असे चित्र अनेकदा पाहतो पण ते विचारात घेण्याच्या भानगडीत कधी पडत नाही. मात्र या वास्तवाचा व्याप फार मोठा आहे. पती आणि पत्नी यांच्यातले बौद्धिक व शैक्षणिक अंतर मोठे असले तर त्यांना त्यांचा संसार कमालीच्या संयमाने व परस्परांचा योग्य तो आदर करीत पुढे न्यावा लागतो. पण त्यामुळे एकदा का एखाद्याच्या वा एखादीच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली की मग सगळ्या तेढींनाच सुरुवात होते. सहजपणे केलेल्या गोष्टीही मग त्यांना संशयास्पद वाटू लागतात. आपल्या परंपरेचा एक संस्कार असा की हा न्यूनगंड सांभाळत जगता येणे हा आपल्यातील स्त्रियांचा गुणधर्मच बनला आहे. त्याचे खरेखोटे गोडवे गाणारी गाणी आणि सणासुदीसारख्या गोष्टीही आपल्यात आहेत. परिणामी मन मारून का होईना त्या बिचाऱ्या सांसारिक जबाबदारी निमूट पार पाडण्यातच धन्यता मानतात. आपल्यातली शहाणी माणसे मग त्या तशा हताश जगण्यालाच पातिव्रत्याचे नाव देतात. मात्र असा न्यूनगंड पुरुषांच्या मनात उत्पन्न झाला तर तो बहुधा विकृतीतच परिवर्तित होताना दिसतो. पत्नीला मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि सार्वजनिकरीत्या तिचा अपमान करणे अशा बाबी त्यातून येतात. ‘आपण शिक्षणात, ज्ञानात वा अधिकारात कमी असलो तरी नवरे आहोत’ हे सभोवतीच्या जगाला दाखवून देण्याची ही त्यांची आवडती पण विकृत वागणूक असते. उच्च न्यायालयाचा आताचा निकाल अशा नवरोजींना एक शहाणा धडा शिकविणारा आहे. न्यूनगंड व त्यातून येणारी संशयाची वा अविश्वासाची भावना यांनी अनेक संसार मोडले व अनेक घरे नासविली आहेत. या अपक्वतेवर मात करायची तर ती केवळ आपली मनोवृत्ती बदलूनच करावी लागते. पण ती बदलण्याच्या मार्गात पुरुषांचा अहंकार बहुधा आड येतो. त्यामुळे संशय हेच क्रौर्य ठरवून स्त्रियांना संरक्षण देतानाच पुरुषांनाही एक चांगला संस्कार त्यांच्या सहजीवनासाठी शिकविला आहे.