- डॉ. मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲड इंडस्ट्रीज (डिक्की)
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. सर्वप्रथम या महामानवाला अभिवादन. एक थोर समाजसुधारक, महान अर्थतज्ज्ञ, उत्तम वक्ता, लेखक, पत्रकार, उत्तम संसदपटू, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो. बाबासाहेबांनी प्रत्येक विषयावर सखोल चिंतन व अभ्यास केला. आपल्या विचारांना विविध चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून मूर्त रूप दिले. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अनेक चळवळी उभ्या केल्या. त्याचबरोबर केवळ भाषणे न करता संस्था उभारून आपल्या विचारांना कृतीची जोड दिली. त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढील पिढीने जाणणे, जपणे आणि पुढे नेणे आवश्यक आहे.
डॉ. आंबेडकरांनी ज्ञानाच्या विविध शाखा म्हणजेच समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, धर्म अशा विषयांचा सखोल अभ्यास केला. चिंतन, लेखन केले. अनेक अडथळे पार करत शिक्षण पूर्ण केले. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली आणि त्यायोगे त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण प्राप्त केले. त्यांनी ज्या पदव्या प्राप्त केल्या तशा त्यांच्या समकालीन नेत्यांनी मिळविल्याचे ज्ञात नाही. स्वत: उच्चविद्याविभूषित होऊन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्याबरोबरच तळागाळातील तरुणांनी उच्चशिक्षण घेतले पहिजे यासाठी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’सारखी संस्था स्थापन केली.
मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय तसेच औरंगाबाद येथे ‘मिलिंद’ महाविद्यालय सुरू केले.तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये दुर्बलांवर होणाऱ्या अन्यायाचा सामना करण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली. अन्यायाचा प्रतिकार सामूहिकपणे शिस्तबद्धपणे तसेच लोकशाही मार्गाने केला पाहिजे याबाबत ते कायम आग्रही राहिले. समता सैनिक दलाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची चळवळही त्यांनी उभी केली. लोकशाही शासनव्यवस्थेत दलित समाजाचे प्रश्न सोडवण्यास बळ मिळावे यासाठी बाबासाहेबांना राजकीय पक्षाची गरज वाटली. यातून त्यांनी प्रथम स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. कालांतराने डिप्रेस्ड क्लास मिशन आणि नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. राजकीय पक्षामुळे लोकशाही संसदीय आणि विधिमंडळामध्येही दलित समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली.
‘धर्म ही अफूची गोळी आहे’ हे तत्त्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हते. बाबासाहेबांच्या मते, ‘धर्म’ गोरगरिबांच्या, सामान्यांच्या जीवनात जगण्याची आशा निर्माण करतो. हिंदू धर्मामध्ये सुधारणा होण्यासाठी केलेले प्रयत्न विफल ठरल्यावर त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा १९३५ मध्ये केली. १९५६मध्ये समता, बंधुता या तत्त्वांचा आधार असलेला भगवान बुद्धांचा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला आणि आपल्या लाखो अनुयायांना दीक्षा दिली. यानंतर त्यांनी ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना करून धार्मिक क्षेत्रातील कार्यास दिशादर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे तर अर्थशास्त्राचे अभ्यासक होते.
‘कोलंबिया विद्यापीठ’ आणि ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथून त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्या घेऊन भारतात परतल्यानंतर मुंबईत सिडनेहॅम कॉलेजमध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. पुढे मुंबई विधिमंडळाचे सदस्य असताना ‘सावकारी नियंत्रण कायदा’ व ‘खोती पद्धती नष्ट व्हावी” अशी दोन विधेयके त्यांनी आणली. गरिबांकडे द्रव्य नाही म्हणून दारिद्र्य आहे, दारिद्र्य आहे म्हणून शिक्षणापासून तो वंचित आहे आणि त्यामुळे रुढी, अंधश्रद्धा, परंपरा यांच्या कुचक्रात तो अडकून पडला आहे.
दलित समाजाच्या अधोगतीचे नेमके कारण त्यांनी ओळखले होते. त्यातून मुक्तीचा मार्ग म्हणूनच त्यांनी समानतेची लढाई उभी केलेली दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही मूल्यांवर दृढ विश्वास होता. सामाजिक आंदोलन करतेवेळेस त्यांनी कधीही हिंसेला थारा दिल्याचे आढळत नाही. भारताची राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारीही बाबासाहेब आंबेडकरांवरच आली. त्यावेळेस जगभरातील राज्य घटनांचा अभ्यास करून भारतीय समाजाला न्याय मिळेल अशी समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर आधारित राज्यघटना भारताला दिली.
लोकशाहीमध्ये प्राप्त झालेल्या अधिकारांचा व आयुधांचा वापर करून सर्व समाजघटकांनी न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत, असे आग्रही प्रतिपादन बाबासाहेबांनी केले आहे. देशातील पददलितांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी चर्चा, संवाद, वादविवाद, कधी सौम्य, तर कधी जहाल भाषेचा व लेखणीचा वापर केलेला दिसतो. मानवी हक्कांच्या स्थापनेसाठी बाबासाहेबांनी लोकशाही मार्गाचाच अवलंब केलेला आहे. हिंसेला अजिबात स्थान दिले नाही. संवैधानिक मूल्यांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करणे म्हणजेच बाबासाहेबांचा वैचारिक वारसा जाणणे, जपणे आणि पुढे नेणे होय.
१९०० साली अमेरिकेत बुकर टी वॉशिंग्टन यांनी बोस्टन येथे ‘निग्रो बिझनेस लीग’ची स्थापना करून तेथील कृष्णवर्णीयांना व्यवसाय उद्योग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे २००५ सालापासून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. ‘नोकऱ्या मागणारे नाही, तर देणारे व्हा’ हे डिक्कीचे ब्रीद बनले आहे.