- बी.व्ही. जोंधळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते; पण असामान्य बाबासाहेबांच्या मनात एक सुसुंस्कृत ‘माणूस’पण होते. बाबासाहेबांचा स्वभाव रागीट होता; पण मनाने ते फारच हळवे होते. प्राचार्य म.भि. चिटणीस बाबासाहेबांना म्हणाले होते, ‘व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स’ या पुस्तकाबद्दल गांधीभक्तांची व काँग्रेसवाल्यांची कडवट प्रतिक्रिया आहे. यावर बाबासाहेब भावविवश होऊन स्फुंदून-स्फुंदून रडताना म्हणाले होते, माझी वस्तुनिष्ठ टीका या लोकांना जर कडवट वाटत असेल, तर आजवर हजारो वर्षे हिंदू उच्चवर्णीयांनी माझ्या दलित बांधवांना दिलेल्या अमानुष वागणुकीबद्दल मला काय वाटत असेल?बाबासाहेबांनी कौटुंबिक जीवनात फार आघात सोसले; पण तरीही समाजकार्य करताना त्यांनी आपली वैयक्तिक दु:खे दूर सारून विविध छंद जोपासले. त्यांना शिल्पकला, चित्रकला, बागकामाची आवड होती. फिडेल व व्हायोलिन वाजविण्यात त्यांना रस होता. त्यांची विनोदबुद्धी जागृत होती. प्रसन्न मूडमध्ये असल्यावर ‘तू नसतीस तर...’ हे गाणे ते तालासुरात गायचे.बाबासाहेबांच्या हळव्या मनातील मृदता त्यांना दुबळे करीत असे. चित्रपटातील करुण प्रसंग पाहणे असह्य झाल्यावर ते तो चित्रपट अर्ध्यावर सोडून परत येत. त्यांचा एक लाडका कुत्रा मेल्यावर बाबासाहेबांनी एकच आक्रोश केला होता, असे मृदू नि कोमल मनाचे होते बाबासाहेब.बाबासाहेब कुटुंबवत्सल होते. दर पौर्णिमेस बाबासाहेबही रमाईसोबत पौर्णिमेचा उपवास करीत. त्यांचे मन उदास झाले की, ते पुष्कळदा एकटे वा रमाईसोबत त्यांच्या वडिलांचे जिथे दहन केले त्याठिकाणी जात. तिथे वडिलांचे स्मरण केल्यावर त्यांचे मन शांत होत असे.बाबासाहेब सदोदित अभ्यासात मग्न असत. तेव्हा रमाई एकदा लटक्या रागात बाबांना म्हणाल्या, त्या पुस्तकातून लक्ष काढून जरा घरा-दाराकडे पाहत जा की, घर म्हणून कधी तरी भाजीपाला आणत जा. बाबासाहेब उठले आणि तडक भायखळ्याच्या मार्केटमध्ये गेले. पिशवी भरून भाजीपाला नि भलेमोठे बोंबील घेतले आणि स्वारी घरी आली. बाबांना वाटले रमाई आपले बाजारकौशल्य पाहून खूश होतील; पण कसचे काय? बाबांवर डाफरत रमाई म्हणाल्या, या भाज्या एका दिवसात कुजणार. ते बोंबील खराब होणार. वर रमाईने बाबांना विचारले या बाजारावर किती खर्च केला. बाबांनी उत्तर दिले ३८ रुपये. रमाईने कपाळावर हात मारून घेतला. त्यांच्या मते बाबासाहेबांनी २५ रुपयांच्या भाजीपाल्यासाठी ३८ म्हणजे १३ रुपये अधिकचे दिले. रमाई शेवटी वैतागून म्हणाल्या, माझेच चुकले. मी तुम्हाला बाजारात पाठवायला नको होते. तात्पर्य, अर्थशास्त्री बाबासाहेब घरगुती व्यवहारात एक साधे, सरळ व भोळे गृहस्थ होते.रमाईने लिहा-वाचायला शिकले पाहिजे, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. बाबासाहेबांनी रमाईस शिकविण्याचा पणच केला. त्यांनी पाटी-पेन्सिल आणली व ती रमाईच्या हाती दिली. म्हणाले, बस येथे आणि मी सांगतो तसे लिही. रमाई चक्रावून गेल्या आणि म्हणाल्या ‘वा वयात तुम्हाला वेड-बीड लागले की काय? घरात वडीलधारी माणसे आहेत. या वेडाला ते काय म्हणतील?’ बाबासाहेब रागाने लालबुंद झाले. रमाईच्या अंगावर त्यांनी पाटी-पेन्सिल भिरकावून दिली. घरात गेले आणि ते दार बंद करून बसले. संताप व्यक्त करण्याची ही बाबासाहेबांची अनोखी शैली होती. रमाईने फुलांची वेणी माळून आपल्या सोबत फिरावे अशीही त्यांची इच्छा असायची; पण साध्या-भोळ्या, घरंदाज रमाई लाजायच्या. हवे तर तुम्ही दुसरी बायको करा; पण मला शिकण्याचा हट्ट करू नका, असे त्या बाबांसाहेबांना म्हणायच्या. अखेरीस बाबासाहेबांनी रमाईस शिकविण्याचा नादच सोडून दिला.बाबासाहेब सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांचीही आस्थेवाईकपणे चौकशी करीत. औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीचे काम सुरू असताना बाबासाहेबांचे सहकारी बळवंतराव वराळे यांच्या पत्नी राधाबार्इंची प्रकृती बिघडली. कामाच्या व्यापात बळवंतरावांचे राधाबाईकडे दुर्लक्ष झाले. बाबासाहेबांना ही बाब कळली. बाबासाहेब तातडीने वराळेंच्या घरी पोहोचले. त्यांनी मायेने राधाबार्इंची चौकशी केली आणि वराळेंची कानउघाडणी करून त्यांना राधाबार्इंना तातडीने दवाखान्यात नेण्याचे फर्मान सोडले.बाबासाहेब उदार मनाचे होते. गांधी-आंबेडकर संघर्षाने पुष्कळदा कटू टोक गाठले; पण म. गांधींच्या हत्येचा बाबासाहेबांना मोठा धक्का बसला होता. त्यांना चालण्याचे कष्ट होत असतानाही म. गांधींच्या अंत्ययात्रेत ते सहभागी झाले होते. एका मराठी माणसाच्या हातूनच नव्हे, तर कुणाच्याही हाताने म. गांधींची हत्या व्हायला नको होती, अशी शोकभावना त्यांनी व्यक्त केली होती.बाबासाहेबांचा १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला होता. काजरोळकर जिंकले होते. निवडणुकीनंतर काजरोळकर बाबांच्या भेटीस गेले होते. बाबासाहेबांनी आपुलकीने त्यांना जवळ बसवून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती. भाऊराव पाटलांच्या संदर्भातील एक कटू प्रसंग विसरून भाऊराव पाटलांच्या भाचीला बाबासाहेबांनी आपल्या महाविद्यालयात प्राध्यापकपदी नोकरी दिली होती. बाबासाहेब शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी २३ डिसेंबर १९५२ रोजी साताºयास जाणार होते; परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ती सभा उधळून लावली होती. बाबासाहेबांना त्या सभेस जाता आले नाही; पण ही बाब मनात न ठेवता भाऊराव पाटलांच्या भाचीस त्यांनी आपल्या संस्थेत नोकरी दिली. आकस, दीर्घद्वेष, कटुतेपासून बाबासाहेबांचे मन मुक्त होते. महामानव बाबासाहेबांचे ‘माणूस’पणही महानच होते.(आंबेडकरवादी विचारवंत)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘माणूस’पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 1:24 AM