- जोसेफ तुस्कानो मराठीतील एक आघाडीचे विज्ञानलेखक डॉ. बाळ फोंडके यांचा आज सहस्त्रचंद्रदर्शन दिन. रम्य कल्पनासृष्टी आणि वास्तवनिष्ठ विज्ञानसृष्टी यांचा सुरेख संवाद साधून विज्ञाननिष्ठ साहित्यनिर्मिती करणाऱ्या फोंडके यांच्यावरील हा लेख विज्ञान कथा लेखनातील त्यांचे वेगळे स्थान अधोरेखित करतो.प्रसन्न, आकर्षक आणि उमदे व आदरणीय असे व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. बाळ फोंडके यांचा जन्म २२ एप्रिल, १९३९ रोजी झाला. त्यांचे बालपण सुशेगात गेले. लहानपणापासून त्यांचे भरपूर वाचन झाले. त्यांच्या वडलांनी छोट्या ‘बाळ’ (खरे नाव गजानन)ना खेळण्याऐवजी पुस्तके आणून दिली. त्यामुळे लहानपणीच ह. ना. आपटे, नाथमाधव, ना. धो. ताम्हनकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांचे साहित्य त्यांनी वाचले होतं. बाबुराव अर्नाळकरांनी त्यांना झपाटून टाकले होतं. वय वाढत गेले, तसं त्यांना गाङगीळ, गोखले, माडगुळकर, भावे, चिं. वि. जोशी, अत्रे, कोल्हटकर यांच्या साहित्याने रिझविले. लेखक होण्याचे बीज तिथूनच त्यांच्या मनी रुजले होते. पुढे महाविद्यालयीन शिक्षणाच्या उंबरठ्यावर असताना, मारी क्युरीचे चरित्र त्यांच्या वाचनात आले आणि आपण संशोधक व्हावे, असा त्यांनी ध्यास घेतला. विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली.
मुळात डॉ. फोंडके वैज्ञानिक आहेत. बायोफिजिक्स, इम्युनॉलॉजी आणि कॅन्सर बायोलॉजी या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळविली आहे. डोळसपणे स्वीकारलेल्या एखाद्या व्यवसायात किमान एकदा तरी दिशा बदलली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला ते पूर्णपणे वैज्ञानिक होते. विज्ञानसंशोधन हे त्यांचे प्रमुख कार्य होते. विज्ञानलेखन हा पूरक, फावल्या वेळेतला छंद होता. कालांतराने तो व्यवसाय बनला. संशोधन आणि लेखन यांनी आपल्या जागा बदलल्या. अलीकडे विज्ञानकथांना चांगले दिवस आले आहेत व हा वाङ्मयप्रकार लोकप्रिय करण्यात डॉ. बाळ फोंडके आघाडीचे लेखक आहेत. वाचकांमध्ये विज्ञानसाहित्याबद्धल रुची निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वसाधारण वाचकाला झेपेल, अशा सोप्या तरीही मनोवेधक, मोहक भाषेत ते लेखन करतात व गेली चार दशके ते सातत्याने विज्ञान लिखाणाद्वारे समाजप्रबोधन घडवून आणत आहेत. रम्य कल्पनासृष्टी आणि वास्तवनिष्ठ विज्ञानसृष्टी यांचा सुरेख संवाद साधून विज्ञाननिष्ठ साहित्यनिर्मितीत ते समरस झालेले आहेत.लुभविणाºया भाषाशैलीत लेखन करणारे डॉ. बाळ फोंडके, आज मराठीतील एक आघाडीचे विज्ञानलेखक आहेत. विषयाचे वैविध्य, त्याला दिलेली मानवतेची जोड, विशेष म्हणजे ‘परिस्थिती’ला नाटक बनवून लिहिलेल्या त्यांच्या कथातील आशय मानवी मूल्याशी, भाव-भावनांशी निगडित असतो. त्यांच्या कथा विज्ञानाधिष्टीत असल्या क्लिष्ट नसतात. संवादाच्या माध्यमातून विषयाची मांडणी करण्यात ते प्रवीण आहेत. त्यांच्या व्यासंगी व सुबोध लिखाणामुळे विज्ञान कथा लेखनाच्या दालनात त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विज्ञानकथा ही माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्र ज्ञान, अंतराळशास्त्र, पर्यावरण या कुठल्याही विषयावर असली, तरी ती मानवी स्वभाव वैशिष्ट्ये, इच्छा-आकांक्षा आणि जीवनशैलीशी निगडित हवी, हे त्यांचे प्रांजळ मत होय. ते केवळ वैज्ञानिकच नाहीत, ते पत्रकारही आहेत. त्यामुळे बहुश्रुतता, तत्परता, तात्कालिकता आणि कमीतकमी शब्दात, पण अतिशय वाचनीय शैलीत आशयघनता त्यांच्या कथांतून आढळून येते. त्यांच्या सोप्या, सुबोध, अकृत्रिम भाषाशैलीमुळे त्यांच्या विज्ञानकथा रंजक व कलात्मक होतात, हे खचितच.डॉ. फोंडके यांच्या व्यवसायिक व्यक्तिमत्त्वाला विविध कंगोरे आहेत. ते भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये १९६२ ते १९८३ मध्ये न्यूक्लियर बायोलॉजिस्ट म्हणून संशोधक होते. त्यानंतर, एका इंग्रजी नियतकालिकाचे १९८३ ते १९८६ या काळात संपादक होते. त्यानंतर, १९९९ पर्यंत त्यांनी नवी दिल्ली येथील पब्लिकेशन अँड इन्फॉर्मेशन डायरेक्टोरेट या राष्ट्रीय संस्थेत डायरेक्टर पद भूषविले होते. संपादक, संशोधक, अतिथी प्राध्यापक, पीएच.डी. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत. त्यांचा वैज्ञानिकाचा व्यवसाय आणि विज्ञानलेखन परस्परपूरक ठरले.आजघडीला मराठीत विज्ञानसाहित्याची निर्मिती करणाºया लेखकांची मांदियाळी कार्यरत आहे. त्यांचा यथोचित सन्मान व्हायला हवा. डॉ. बाळ फोंडकेसारख्या विज्ञान साहित्यिकाची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून निवड करून असा योग साधता येईल. फोंडके म्हणतात, ‘दहशतवाद, जागतिकीकरण, जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापणारे माहिती-तंत्रज्ञान आणि सामाजिक व संस्कृतिक जीवनप्रणालीत आमूलाग्र बदल घडविणारे जैवतंत्रज्ञान यांचा जोमदार प्रभाव येणाºया शतकात जाणवणार आहे.’ ते किती खरंय!(जोसेफ तुस्कानो विज्ञान लेखक आहेत)