- विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव हे आज पंचाहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत. ते आमचे ज्येष्ठ बंधुतुल्य स्नेही आहेत. जाधव कुटुंबीयांशी आमचा तीन पिढ्यांचा संबंध. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बाबूजी तथा स्व. जवाहरलाल दर्डा यांची बाळासाहेब यांच्याशी मुंबईत नेहमी भेट होत असे. तेथून आम्हा दोघा बंधूंशी बाळासाहेब यांचे मैत्र जमले. हा स्नेहाचा धागा तिसऱ्या पिढीपर्यंत अतूट राहिला. बाळासाहेब यांचे चिरंजीव डॉ. योगेश आणि देवेंद्र, करण, ऋषी यांनी हा स्नेह जपला आहे. त्यांच्या व्यवसायानिमित्त व इतर विषयांवरही चर्चा होत असतात, भेटी-गाठी होत असतात.
बाळासाहेब यांचे पिताश्री पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. महात्मा गांधी यांचा त्यांना सहवास लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात भाग घेतला होता. १९४३ साली मुंबईत डॉ. आंबेडकर यांचा जाहीर सत्कार झाला, तेव्हा या साेहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. ग. गो. जाधव होते. याच ध्येयवादातून आणि सामाजिक बांधीलकीच्या भूमिकेतून त्यांनी १९३९ साली कोल्हापुरात ‘पुढारी’ची मुहूर्तमेढ रोवली. ध्येयवादी पत्रकारिता आणि सामाजिक बांधीलकी यांचा हा वारसा आणि वसा बाळासाहेब जाधव यांनी जोपासला आणि आपल्या सव्यसाची कर्तबगारीने त्यांनी ‘पुढारी’चा सर्वदूर विस्तार केला.
बाळासाहेबांनी परदेशात पत्रकारितेचे धडे घेतले. फिलिपाइन्स येथील आशियाई संपादक परिषदेत ते सहभागी झाले. परिषदेतील ते सर्वांत तरुण संपादक. या अनुभवातून पत्रकारितेतील त्यांची दृष्टी विस्तारली. १९६९ साली त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे हाती घेतली. गेली ५० वर्षे ते संपादकपदाची सक्रिय जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. एवढी वर्षे सलग संपादकपदाची धुरा सांभाळणारे ते कदाचित एकमेव संपादक असावेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी पत्रकारितेत नवे मानदंड निर्माण केले.
लोकमतने कधी स्पर्धक वृत्तपत्र समूहांना शत्रू मानले नाही. स्पर्धक मानले. लोकमतने विदर्भातून सुरुवात करून संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोव्यात विस्तार केला. सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून सर्वत्र प्रथम क्रमांक मिळवला. ज्या ज्या ठिकाणी आवृत्ती काढली तेथील स्पर्धकांशी गुणात्मक स्पर्धा करीत स्वत:मध्येही बदल केले. तसेच स्पर्धक दैनिकांनी सकारात्मक बदल करून वाचकांना अधिक सकस बातम्या, लेख आणि पुरवण्या देण्याचा प्रयत्न केला. पुढारीच्या माध्यमातून बाळासाहेब जाधव यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला. तसे अनेक उपक्रम लोकमतनेदेखील संपूर्ण महाराष्ट्रात राबविले.
समाजातील उपेक्षित, असंघटित, दलित, आदिवासी, शेतकरी, कामगार, आदी घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. स्वर्गीय बाबूजी यांनी वाचकांप्रति बांधीलकी मानून काम करण्याचा आदर्श आमच्यासमोर ठेवला. तसाच वारसा बाळासाहेब जाधवदेखील जपत आहेत. पद्मश्रीने त्यांना राजमान्यता दिली, तरी लोकमान्यता मिळवण्यासाठी ज्या सचोटीने त्यांनी आपला वृत्तपत्र व्यवसाय सांभाळला, त्यासाठी ते कौतुकास पात्र आहेत. लोकमतने आपला विस्तार करताना ज्या ज्या विभागात आवृत्त्या काढल्या तेथे सकारात्मक भूमिकेने स्पर्धा केली. लोकमतच्या क्षेत्रात इतर वृत्तपत्रे आली तेव्हाही हीच भूमिका कायम स्वीकारली. त्यातून वृत्तपत्रांमध्ये निखळ स्पर्धा झाली आणि वाचकांना अधिक चांगले वृत्तपत्र देण्यास पूरक वातावरण तयार झाले.
पत्रकारितेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करीत असताना बाळासाहेब यांनी सामाजिक भानही जपले. परखड आणि निर्भीड लिखाणातून त्यांनी अन्यायाला, अत्याचाराला, चुकीच्या धोरणांना वाचा फोडली. महापूर, भूकंप अशा अनेक अस्मानी-सुलतानीत ‘पुढारी’ने मदतनिधी उभारला. आपद्स्तांना दिलासा दिला. किल्लारी भूकंपावेळी मदत दिली. कच्छमध्ये झालेल्या भूकंपावेळी भुज येथे ‘पुढारी’ने मदत निधीतून हॉस्पिटल उभारून दिले. १९९९ मध्ये कारगील युद्ध झाले. त्यावेळी आर्मी सेंटर वेल्फेअर फंडाने निधी उभारण्याचे आवाहन केले होते. ‘पुढारी’ने अडीच कोटी रुपयांचा निधी जमा केला. सियाचीन ही उत्तुंग रणभूमी !
शत्रूबरोबर कडाक्याच्या थंडीला जवानांना तोंड द्यावे लागत असे. हिमदंशासारख्या आजाराला बळी पडावे लागत असे. उपचारासाठी चंदीगढला जावे लागे. बाळासाहेब यांनी सियाचीन येथे हॉस्पिटल उभारण्याची संकल्पना मांडली. तत्कालीन संरक्षणमंत्री जाॅर्ज फर्नांडिस यांनी ती उचलून धरली. जगातील उत्तुंग आणि बर्फाच्छादित रणभूमीवर हे एकमेव हॉस्पिटल ! याच स्वरूपाचे सामाजिक काम् लोकमतनेही उभे केले. त्यासाठी आर्थिक निधी उभारला. याही अर्थाने लोकमत आणि पुढारीचे अंतःस्थ नाते आहे असेच म्हणावे लागेल.१९८९मध्ये ‘पुढारी’चा सुवर्णमहोत्सव मोठ्या थाटाने पार पडला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर २०१५मध्ये जनसागराच्या साक्षीने अमृतमहोत्सव सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दोन्ही पंतप्रधानांनी ‘पुढारी’ तसेच पुढारीकार ग. गो. जाधव आणि बाळासाहेब जाधव यांच्या सामाजिक बांधीलकीचा गौरव केला.
१९९९ साली भारतरत्न स्वरसम्राज्ञी लतादीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पुढारी’चा हीरकमहोत्सव झाला. १९६३ मध्ये ‘पुढारी’चा रौप्यमहोत्सव झाला होता. या सोहळ्याला त्या उपस्थित होत्या. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल बाळासाहेबांना पद्मश्री हा बहुमानाचा नागरी सन्मान बहाल करण्यात आला. नचिकेता प्रतिष्ठानच्या वतीने पांचजन्य नचिकेता पुरस्कार दिला जातो. पुलित्झर तोडीचा हा पुरस्कार. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देण्यात येऊन, त्यांच्या देशभक्तीच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अहिंसा ट्रस्टसह अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. हिमाचल विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट दिली.
बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व असे समृद्ध आहे. पत्रकारितेतील ते दीपस्तंभच आहेत. यापेक्षा कितीतरी कमी भांडवलावर कोणीही राजकारणात उडी घेतली असती, त्यांना दिग्गज नेत्यांकडून तशा ऑफर आल्याही होत्या; पण त्यांनी त्या नाकारल्या. त्या मोहात ते पडले नाहीत. समाजाभिमुख, सव्यसाची संपादक ही आपली ओळख त्यांनी कायम ठेवली. अमृतमहोत्सवानिमित्त आमच्या या बंधुतुल्य स्नेह्यांना उदंड आयुरारोग्य लाभो. त्यांच्या हातून आणखी कार्यकर्तृत्व घडू दे, हीच विनम्र प्रार्थना !