प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ -महाराष्ट्रात अनेक नामांकित शिक्षणतज्ज्ञ कुलगुरू झालेले आहेत. मात्र, या पदावर असताना मूठभर मोजके कुलगुरू दिशादर्शक काम करू शकले आहेत. शिक्षण हे समताधर्मी असू शकतं व समताद्रोहीही असू शकतं, या विचाराची जाणीव ठेवून त्यातही ‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहोचविण्याचं स्वप्न नि दृष्टी घेऊन उच्चशिक्षण खेड्यापाड्यातील वंचित-बहुजनांपर्यंत पोहोचविणारे व शिक्षणातून सामाजिक व आर्थिक कारणानं गळती झालेल्या महिला व इतर दुर्बल घटकांना उच्चशिक्षणाची कवाडं खोलणारा द्रष्टा असा एकमेव शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले सर होते. त्यांच्या निधनानं एक कल्पक, कृतिशील व कर्तबगार नि समाज परिवर्तनासाठी विद्यापीठाचं कामकाज चालवून दाखविणारा धाडसी कुलगुरू आपण गमावला आहे. ९० वर्षांच्या जीवनात सतत कार्यमग्न राहिलेले कुलगुरू ताकवले सर यांचं या क्षेत्रातलं योगदान अविस्मरणीय असं आहे. उच्चशिक्षण हे समताधर्मी असायला हवं हे त्यांनी कृतीनं, आपल्या ध्येयवादानं नि झपाटलेपणानं दाखवून दिलं.
मुक्त विद्यापीठाचा अभिनव प्रयोगमहाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ जेव्हा काही चिरंतन स्मारक करायचं ठरलं, तेव्हा संस्थापक कुलगुरू म्हणून त्याची धुरा प्रा. राम ताकवले सरांकडे आली व महाराष्ट्रात देशातील दुसरं मुक्त विद्यापीठ ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’ नाशिकला उभं राहिलं. प्राचार्य पी. बी. पाटील व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या कल्पनेला उचलून धरलं व नव संकल्पनेनं उभारणीसाठी पूर्ण स्वातंत्र्य प्रा. ताकवलेंना सरकारनं दिलं. त्यातूनच स्वयंअर्थसाहाय्यित (विनाअनुदानित) असं पहिलं सरकारी विद्यापीठ भारतात उभं करण्याचं धाडस सरांनी केलं. आजही मुक्त विद्यापीठ आपल्या स्वत:च्या उत्पन्नातून व आर्थिक क्षमतेनं प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचा पगार करते. सरकारी अनुदानाच्या कुबड्यांनी विद्यापीठ चालवायला नको, त्यांनी स्वयंपूर्ण व स्वावलंबी व्हायला हवं, हा त्या काळी धक्कादायक वाटणारा विचार त्यांनी रुजविला. आपल्या संपर्काच्या बळावर अनेक विद्वानांना जोडून उत्तम पुस्तकं (सेल्फ लर्निंग मटेरीयल) तयार केली. पहिल्यांदाच स्वावलंबी सरकारी मुक्त विद्यापीठ ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’च्या रूपात उभं केलं नि यशस्वी करून दाखविलं. मग कर्नाटक, बंगाल, राजस्थान व मध्य प्रदेशातही अशीच आपल्या मुक्त विद्यापीठाच्या मॉडेलवर मुक्त विद्यापीठं उभी राहिली.
सरकारी विद्यापीठंही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात नि तेही लाखो शिक्षणवंचितांना दर्जेदार उच्चशिक्षण देऊन शिवाय मराठीसारख्या मातृभाषेत उच्चशिक्षण देऊन हे त्यांनी भारतात करून दाखविलं. भारतीय भाषांत उच्चशिक्षण देण्याचा प्रयोग १९८७ साली म्हणजे ३६ वर्षांपूर्वीच प्रा. राम ताकवले यांनी करून दाखविला, हे आता मान्य करावं लागतं. काळाच्या पुढचा विचार करणारे ते कुलगुरू होते. सामाजिक बांधिलकी जगणारे ते शिक्षणतज्ज्ञ होते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील आगळ्यावेगळ्या प्रयोगात्मक कामानं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची नोंद घेतली गेली. कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगने त्यांचा गौरव केला. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटीचे (इग्नु) कुलगुरू म्हणूनही प्रा. ताकवलेंनी भरीव कामगिरी केली. जगातील मुक्त व दूरशिक्षण क्षेत्रात ज्याला ओडीएल एज्युकेशन म्हणतात, यातील ते आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून मान्यता पावले.
एमकेसीएल मॉडेल ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन’चे (एमकेसीएल) पहिले संस्थापक संचालक व त्या माध्यमातून खेड्यापाड्यात संगणक शिक्षणाचे स्वयंअर्थसाहाय्यित जाळे सर्व विद्यापीठांना भागीदार करून, डॉ. विवेक सावंत या त्यांच्या कर्तबगार संशोधक विद्यार्थ्याच्या माध्यमातून प्रा. ताकवले यांनी अफलातून यशस्वी केले. महाराष्ट्रातील लाखो तरुणांना संगणक साक्षर केले. हजारोंना एमकेसीएलच्या माध्यामातून रोजगार मिळाला. या मॉडेलचे अनुकरण पुढे अनेक राज्यांनी केले. कल्पकता व नावीन्याचा ध्यास म्हणजे प्रा. डॉ. राम ताकवले सर होते.