-डॉ. रामचंद्र देखणेसंस्कृत साहित्यात नाटक आणि नाटककार ही संकल्पना खूप व्यापक अर्थानी आली आहे. नाटककार हा केवळ नाट्यलेखक नसून तो कवी आहे. आणि नाटक ही केवळ संवादात्मक गद्यरचना नसून ते एक महाकाव्यही आहे. संस्कृत साहित्यात भास हा नाटककार म्हणून ख्यात असला तरी भास हा महाकवी म्हणूनही संबोधला गेला आहे.भासाचे स्वप्न वासवदत्त ही नाट्यकृती अजरामर ठरली आहे. इ.स. १९१० साली टी. सी. गणपतीशास्त्री हे विद्वान संशोधक पूर्वीच्या त्रावणकोक संस्थानात ग्रंथाचे संशोधन करीत असताना पद्मानाथ पुराजवळ मनाल्लीकर मठात त्यांना ३०० वर्षांपूर्वीचे मल्याळी लिपीतील जुने ग्रंथ सापडले. त्यात भासाची १३ नाटके भुर्जपत्रावर लिहिली होती. ‘मृच्छकटिक’ हे सर्वात प्राचीन नाटक समजले जाते. कालिदासाचे मालवीकाग्नि मित्रम् विक्रमोवर्षीयम आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके संस्कृत नाट्यसृष्टीला उंचीवर नेऊन ठेवतात. या नाटकांमुळेच ‘काव्येशू नाटक रम्य तत्ररम्या शकुंतला!’ हे वचन नाट्य परंपरेत रूढ झाले. संस्कृत साहित्यात नाट्य आणि काव्य ही उत्तुंग प्रतिभेची दर्शने आहेत. संस्कृत साहित्यात नाटक हे साहित्याचे असे एक अंग आहे की, त्यात काव्य डोळ्यांनी पाहता येते. काव्यातील पात्रांसाठी मनोभूमिकेवर जसा कल्पनेने रंगमंच करावा लागतो तशी नाटकाला गरज नसते. तिथे कलेचा रंगमंच उभा असतो. म्हणून नाटकाला दृश्य काव्यही म्हटले जाते. नाटकाला साहित्यशास्त्रात रूपक असे म्हणतात. संत एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून लोकांमध्ये रूढ असणारी अनेक रूपके मांडली आणि वासुदेव, गोंधळी, बैरागी, वेडा, मुका एडका, विंचू अशा बहुविध रूपकांमधून अंगाअंगात रंगमंच उभा केला. नाटकात पात्रांचा अभिनय घडविणारा प्रसंग आणि रंगमंच पाहायचा असतो आणि पात्रांचे संवाद आणि संगीत ऐकायचे असते. त्यापैकी जे दृश्य असते, तेच प्राधान्ये करून अभिनय असते. या अभिनय दृश्यांचे मूळ नाव रूपक असे आहे. एका अर्थाने नाटक हे महाकाव्यच आहे. भरताने नाटकाचे लक्षण सांगताना म्हटले आहे की, ‘‘देवता मनुष्य, राजे आणि लोकप्रसिद्ध महात्मे यांच्या पूर्ववृत्तानुचरित नाटक नाम तद्भवेत!’’ पूर्ववृत्ताचे अनुकरण म्हणजे नाटक होय. कोणत्याही कलाकृती या एकीकडे मनोरंजनासाठी तर दुसरीकडे समाजाला ज्ञान देण्यासाठी उभ्या असतात. त्या दृष्टीने अभिज्ञान, अभिनय आणि अभिव्यक्ती यांचे एकत्रिकरण म्हणजे नाटक होय. नाटक नसते तर मानवी मन व्यक्तही झाले नसते आणि मुक्तही झाले नसते. त्यासाठी संवाद घडावा लागतो. हा संवाद जेव्हा पात्रा-पात्रांशी आणि रसिकांशी होतो तेव्हा दृश्य रंगमंच उभा राहतो आणि हा संवाद जेव्हा स्वगत स्वरूपात मनाशी संवाद घडवितो तेव्हा मानवी मनातही एक अदृश्य रंगमंच साकारतो.
नाटक दृकश्राव्य आणि रूपक
By admin | Published: June 08, 2017 12:03 AM