गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या महायुतीच्या जागावाटपाच्या उत्कंठावर्धक नाटकावर आता पडदा पडला आहे. नाटकाचा शेवट अपेक्षित असाच आहे; पण तो अनपेक्षित असेल असे भासविल्याशिवाय उत्कंठा निर्माण होत नाही. त्यामुळे या नाट्याला रंगत चढली. काहींच्या मते हे मुळी नाट्य नव्हतेच, तर तमाशा होता आणि हे मत खरे आहे असे मानण्यास जागा आहे. कारण, या तमाशाच्या निमित्ताने त्यात सामील झालेल्यांची बरीच शोभा झाली. त्यातला त्यात एकच बरे की, लोकांसाठी हा फुकटचा तमाशा होता. त्यामुळे पैसेही खर्च झाले नाहीत आणि वेळही बरा गेला; पण त्यामुळे आपल्या राजकारणाची पातळी काय आहे, हे स्पष्ट झाले. या पातळीचे राजकारणी निवडून देऊ न आपण कशा प्रकारचे सरकार सत्तेवर आणणार आहोत, याचा लोकांनी विचार करणे योग्य राहील. गेल्या आठवडाभरात या महाराष्ट्र देशात जागावाटपाखेरीज दुसरा कोणताच महत्त्वाचा प्रश्न नाही, असे वातावरण होते व त्याला प्रसारमाध्यमांनीही हातभार लावला. या सगळ्या प्रकारात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, नक्षलवाद्यांचे सह्याद्रीत हातपाय पसरणे, मंगळयानाचे यश या सगळ्या महत्त्वाच्या घटना बिनमहत्त्वाच्या ठरल्या होत्या. महाराष्ट्राला राजकारणाचे आणि नाटकाचे वेड आहे हे खरे. पण, त्यामुळे राजकारणाचेच नाटक सादर करण्याची ही कला काही औरच म्हणावी अशी होती. हल्ली २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या असतात. त्यांना त्यांचे २४ तास भरून काढणाऱ्या नाटक अथवा तमाशांची गरज असतेच. तीही या जागावाटपाच्या तमाशाने भरून काढली. एका महायुतीच्या नाटकाचा अंक मध्येच संपला, तर पंचाईत होऊ नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने मधल्या ब्रेकच्या काळात हा तमाशा पुढे चालविण्याची खबरदारी घेतली; पण त्यांना या तमाशाची शोकांतिका होऊ नये, याची काळजी घेतच पुढे जावे लागले. जागावाटपाचा हा केवळ तमाशाच नव्हता, तर आकड्यांचा जुगारही होता. त्यामुळे आकडे लावून खेळ खेळणाऱ्यांचाही वेळ बरा गेला. पितृपक्ष असल्यामुळे दुसरे काहीच करता येणार नव्हते आणि वेळही जात नव्हता. तिकडे श्रीहरीकोटात काही वेडे शास्त्रज्ञ भारताने मंगळाकडे पाठविलेल्या यानाची कक्षा बदलण्यासाठी बुद्धी पणाला लावून आकडेमोड करीत होते. मंगळावर जाणाऱ्या यानाला पृथ्वीवरून आदेश देण्याचे कसब ते लढवित होते. हे कसब यशस्वी झाले तर आपला भारतदेश म्हणे जगातला चौथा तंत्रदृष्ट्या प्रगत देश ठरणार होता. पण, त्याचे काय महत्त्व? आपला देश गोंधळ घालणाऱ्या राजकारणात जगातला सर्वांत अव्वल देश आहे, हे महत्त्वाचे नाही काय? या सर्व घटनाक्रमाने राजकारणी मंडळीचे वास्तवाचे भान कसे सुटत चालले आहे, हेच पुढे आले आहे. त्यांच्या राजकारणाचा हेतू काय, हा प्रश्नही त्यामुळे निर्माण झाला आहे. सत्तेवर आल्यानंतर जनहिताची कोणती कामे करायची, ‘अच्छे दिन’चा अजेंडा पुढे कसा न्यायचा, याचा विचार करण्याऐवजी महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोणी व्हायचे, आणि त्यासाठी आकड्यांचे गणित कसे जमवायचे, याचीच जाहीर भांडणे सुरू होती. ही राजकारणाची कदाचित अपरिहार्य अशी गरज असेलही; पण ती अशी चव्हाट्यावर मांडण्याची गरज काय होती. ही सर्व चर्चा पडद्याआडही करता आली असती; पण दबावाचे राजकारण हे जाहीरपणेच खेळावे लागते. त्यात माध्यमांना, लोकांना सामील करून घेतल्याशिवाय पुरेसा दबाव निर्माण होत नाही. असो. आता सर्व वाद मिटल्याचे सांगण्यात येत आहे; पण एकदा निवडणूक संपली आणि सरकार स्थापनेचा खेळ सुरू झाला, की याच तमाशाचा उत्तरार्ध सुरू होणार आहे. तो पाहण्याची तयारी या महाराष्ट्र देशीच्या प्रेक्षकांना करावी लागणार आहे. आता १३0 की ११८ असा जागांचा वाद असला, तरी निवडणुकीनंतर प्रत्येकाला आपली जागा कळेल. त्या वेळी जो घोडेबाजार होईल तोही असाच काहीस मनोरंजक आणि काहीसा वैताग आणणारा असेल. शिवाय, खातेवाटपावरून होणारे रुसवे, फुगवेही पाहण्याजोगे असतील. एकंदर हा सगळा प्रकार राजकारण्यांचे वास्तवाचे भान हरपत चालले आहे, हे सिद्ध करणारा आहे. देशापुढील, राज्यापुढील समस्या सोडविणे हे राजकारण्यांचे काम असताना स्वत: राजकारणीच एक समस्या बनू लागल्याचे हे दृश्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आघाडीचे सरकार होते. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात फार काही फरक पडला नाही आणि आता महायुतीचे सरकार आले, तरी त्यात फरक पडणारा नाही. त्यामुळे सर्व काही मागील पानावरून पुढे चालू राहणार आहे, हेच या नाट्यातून दिसून आले आहे.
नाटकावर पडदा
By admin | Published: September 24, 2014 5:39 AM