विश्राम ढोले
कल्पना करा की, तुम्ही एका मोठ्या टेबलाकडे पाठ करून बसलाय. तुमच्या हातात एक बॉल आहे आणि मागे न बघताच तुम्ही तो टेबलावर टाकताय. आता जर विचारलं की, टेबलावर तो बॉल नेमका कुठाय तर तुम्हाला काही सांगता येणार नाही. मग अजून एक बॉल टेबलावर टाकला आणि तुम्ही टाकलेला बॉल या नव्या बॉलच्या तुलनेत कुठे आहे, हे सांगितलं तर तुम्हाला ढोबळ का असेना, अंदाज बांधता येईल. मग आणखी एक बॉल टाकला, पुन्हा त्याबद्दल माहिती दिली तर पहिल्या बॉलच्या स्थानाबद्दलचा अंदाज थोडा अजून सुधारता येईल. असे जितके बॉल टाकाल तेवढा तुमचा अंदाज सत्याच्या जवळ सरकत राहील.
अंदाज बांधण्याच्या आणि नव्या माहितीनुसार तो सुधारून घेण्याच्या याच प्रक्रियेला सांख्यिकी तर्कामध्ये बांधले की मिळते ते बेझचे सूत्र. वरकरणी साधेसे वाटते; पण संख्याशास्त्राला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला या सूत्राने एक नवा दृष्टिकोन दिला. हे सूत्र मांडणारे थॉमस बेझ होते अठराव्या शतकातील ख्रिश्चन धर्मगुरू. याच शतकातील आणखी एका ख्रिश्चन धर्मगुरूने - पिअरे लाप्लास यांनी- हा विचार आणखी पुढे नेला. बेझ ब्रिटिश तर लाप्लास फ्रेंच. आज जे बेझचे सूत्र म्हणून ओळखले जाते ते खरेतर बेझ व लाप्लास यांच्या एकत्रित मांडणीतून सिद्ध झाले आहे. भूतकाळाबद्दलच्या समजातून आलेली गृहीतके आणि नव्याने समोर आलेली माहिती यांचा मेळ घालून पुढे काय होईल याचा सांख्यिकी अंदाज बांधणे आणि तो सुधारत नेणे हा या सूत्राचा आत्मा. आणि एकाच वेळी अनेक गृहीतकांची सांगड घालून देणे हे याचे सामर्थ्य. आपले दैनंदिन जगण्यातील अंदाजांचे अनुभव तरी यापेक्षा काय वेगळे असतात ? आपण कधीच अगदी कोरी पाटी घेऊन अंदाज बांधत नाही. काहीतरी गृहीतकांनीच आपली सुरुवात होत असते. माहितीचा एखादा तुकडा हाती येतो आणि पुढे काय होईल याचा आपण अंदाज बांधतो. बेझियन सूत्र याच मानवी वृत्तीला गणिताचे रूप देते. संख्यांच्या स्वरूपात व्यक्त करते. म्हणूनच अनेक क्षेत्रांत ते वापरले जाते.
चालकविरहित वाहनाचे क्षेत्र त्यापैकीच एक. मागच्या लेखामध्ये चालकविरहित कारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेपुढील आव्हानाचा मुद्दा आला होता. कारमधील विविध सेन्सर्समधून येणाऱ्या विदेचा मेळ कसा घालायचा आणि त्याआधारे ‘आपण नेमके कुठे आहोत?’ व ‘कुठे असले पाहिजे?’ याचा अंदाज कसा सुधारत न्यायचा या कळीच्या प्रश्नांवर गाडी अडली होती. बेझच्या सूत्राने तो मार्ग मोकळा झाला. पण तेवढ्याने सुटेल तर ती मानवी समस्या कशी? चालकविरहित कारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘आता कुठे आहोत?’ हे बेझच्या सूत्राने कळेलही; पण ‘आता काय केले पाहिजे?’ याचे उत्तर वाटते तितके सोपे नसते. उदाहरणार्थ, चालकविरहित कारसमोर सिग्नल लाल झालाय; पण कारमध्ये अचानक काही तरी यांत्रिक बिघाड झाल्याने ब्रेक लागत नाहीय आणि समोरून नेमका एक पादचारी रस्ता ओलांडतोय. आता पर्याय दोनच. वेगाने जाणारी कार शेजारच्या दुभाजकावर आपटून थांबवायची की थेट त्या पादचाऱ्याला उडवायचे? कार आपटवली की आतला प्रवासी मरणार; आणि तशीच समोर नेली तर पादचारी मरणार. - अशावेळी कारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेने आता कोणता निर्णय घ्यायचा?
तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ‘ट्रॉली प्रॉब्लेम’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एका नैतिक पेचाचे हे व्यावहारिक रूप. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रश्न नाही. हा तिला प्रशिक्षित करणाऱ्या मानवी निवडीचा प्रश्न आहे. बहुतेक जण म्हणतील की कारने इतरांना मारू नये. याचा अर्थ कारने प्रवाशाचा जीव धोक्यात घालावा; पण असे म्हणणाऱ्यांना ‘तुम्ही अशा पद्धतीने प्रशिक्षित केलेली कार विकत घ्याल का?’ असा प्रश्न विचारला तर बहुतेकांचे उत्तर पूर्ण नकारार्थी असेल. एवढेच कशाला, ॲम्ब्युलन्स येत असेल तर प्रसंगी गाडी थोडी फुटपाथवर चढवून किंवा सिग्नल थोडा तोडून तिला वाट मोकळी करून दिली पाहिजे इतके साधे शहाणपण चालकविरहित कारमध्ये कसे आणायचे?
किंवा अजून एक विचित्र स्थिती बघा. कारमध्ये कोणी मानवी चालक नाही असे पाहून एखाद्या डामरट सायकलस्वाराने अशा कारसमोर सायकल मुद्दाम हळूहळू चालवली, कारण नसताना थांबूनच ठेवली तर? समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखायचे, धडकायचे नाही हे कारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला शिकवलेले मध्यवर्ती सूत्र. त्यामुळे सायकल हलत नाही, गती पकडत नाही तोपर्यंत अशी कार जागेवरच गुरगुरत राहणार. एरवी मानवी चालकांच्या कारसमोर सायकस्वार घाबरतात.जिवाला जपून राहतात; पण चालकविरहित कारला मात्र तेच सायकलस्वार सहज दमात घेऊ शकतात. त्यांचे चालणे मुश्कील करू शकतात. आता या परिस्थितीत आपल्या रस्त्यांवरील पादचारी, गायी-म्हशी, खड्डे, फ्लेक्स वगैरे घटक मिसळा. परिस्थिती किती गुंतागुंतीची असते याची कल्पना येईल. वाहन चालवताना नियम कधी पाळायचे, कधी वाकवायचे, कधी गुंडाळायचे आणि कधी तोडायचे याचे एक सूक्ष्म आणि विवेकी भान सतत ठेवावे लागते हे लक्षात येईल. - चालकरहित कारमध्ये हे भान आणणे अगदीच अशक्य नसले तरी फार अवघड आव्हान आहे. म्हणूनच बेझ-लाप्लास सूत्राने चालकविरहित कारचा मार्ग मोकळा झाला असला तरी पूर्णपणे स्वयंपूर्ण कार सिद्ध करण्याचे गाव अजून बरेच दूर आहे.
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत)vishramdhole@gmail.com