आसाराम बापू नामक साधूच्या वेषात वावरणाऱ्या नीच दानवाने देशभरातील लाखो भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रद्धेचा गेली तीन दशके मांडलेला बाजार अखेर उठला हे चांगले झाले. शिक्षणासाठी आश्रमात राहणाºया एका १६ वर्षाच्या मुलीवर पाच वर्षांपूर्वी बलात्कार केल्याबद्दल जोधपूर येथील विशेष न्यायालयाने आसारामला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली. याहून अधिक कडक शिक्षा देता येत नाही हे कायद्याचे अपयश आहे. जोधपूरजवळील मनाई आश्रमात ही षोडशा आसारामच्या राक्षसी वासनेची शिकार झाली होती. ही मुलगी आजारी होती व तिच्यावर फक्त बापूच उपचार करू शकतील, असे म्हणून आश्रमातील गुरुकुलची वॉर्डन शिल्पी गुप्ता आणि बापूंचा विश्वासू शरश्चंद्र या दोघांनी तिला १५ व १६ आॅगस्ट २०१३ दरम्यानच्या रात्री आसारामच्या शयनगृहात नेऊन सोडले होते. गुन्ह्यातील साथीदार म्हणून न्यायालयाने या दोन आरोपींना प्रत्येकी २० वर्षांचा कारावास ठोठावला. पीडितेच्या वडिलांनी न्याय मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला असला तरी एका परीने हा अपुरा न्याय आहे. बलात्कार करणाºयाहून त्याला मदत करणाºयांना जास्त शिक्षा, असे होणार आहे. हा बलात्कार केला तेव्हा आसाराम ७३ वर्षांचा होता. म्हणजे सामान्य घरातील एखादा आजोबा ज्या वयात मंदिरात भजन-कीर्तनाला किंवा ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीला जाऊन बसतो त्या वयात हा आसाराम कोवळ्या, निरागस मुलींचा उपभोग घेण्यासाठी आश्रम चालवित होता. आता आसाराम ७८ वर्षांचा आहे. शिक्षा होण्याआधी तो १,६६० दिवस म्हणजे सुमारे साडेचार वर्षे कैदेत होता. आता यानंतर तहहयात म्हणजे फार तर आठ-दहा वर्षे तो तुरुंगात राहील. आसाराम बापूची शिक्षा ही एका अर्थाने अशा कुप्रवत्तींना झालेली प्रातिनिधिक शिक्षा आहे. याआधी गेल्या काही वर्षांत हरियाणातील बाबा रामरहीमसह आणखी अशाच पाच-सहा वासनांध लांडग्यांना गजाआड जावे लागले आहे. गेल्या पाच वर्षात या प्रकरणाचा तपास करणाºया पोलीस अधिकाºयास दोन हजारांहून अधिक धमकीचे फोन व पत्रे आली. दोन साक्षीदारांचे खून झाले, आणखी तिघांवर हल्ले झाले. आसारामचे भक्त दंगल करतील म्हणून तीन राज्यांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त करावा लागला. बाबा रामरहीमला शिक्षा झाली तेव्हा त्याच्या भक्तांनी हैदोस घातला होता. लोकांना उल्लू बनविणारे हे दानवी बाबा किती उन्मत्त झाले आहेत, याचे हे द्योतक आहे. ज्या मुठभर पीडितांनी धीराने पुढे येऊन या भोंदूबाबांचे असली रूप जगापुढे आणले त्या कौतुकास पात्र आहेत. परंतु एवढ्याने भागणार नाही. आसारामला शिक्षा झाल्यावर त्याच्या आश्रमांमध्ये धाय मोकलून रडणाºया भक्तांची छायाचित्र वृत्तवाहिन्यांवर दाखविली गेली. बाबा गजाआड गेला तरी त्याने उभारलेली हजारो कोटी रुपयांची मायावी साम्राज्ये अबाधित असल्याचे हे भयसूचक संकेत आहेत. देवाच्या न्यायालयात आमचा बापू नक्की निर्दोष सुटेल, अशी या अंधश्रद्धाळूंना आशा आहे. याच बापूने पृथ्वीवर उभा केलेला नरक त्यांना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाºयांनी लगेच मोदी, वाजपेयी, अडवाणी, राजनाथसिंग, दिग्विजयसिंग यांची आसारामच्या पायी लोटांगण घेतानाची जुनी छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकली. ही नेतेमंडळी अशा लबाडांना जवळ करतात आणि ते पाहून मग भोळेभाबडे लोकही त्यांच्या नादी लागतात. सर्वच पक्षांतील नेत्यांनी अशा बाबांची कुरणे पिकविली आहेत. लाखोंंच्या डोक्यावरून हात फिरवून झाल्यानंतर चार-दोन बाबांना तुरुंगात टाकून समाजास लागलेली ही कीड जाणार नाही. अशा प्रत्येक बाबाला होणारी शिक्षा हे आपल्या डोळ्यात घातलेले झणझणीत अंजन आहे या भावनेने लोकांनीच भाबडेपणाने त्यांच्या मागे धावणे बंद करणे गरजेचे आहे. परंतु हे होणे अशक्य आहे. निदान बाबा तुरुंगात गेला की त्याचे संपूर्ण साम्राज्य खालसा करून सरकारजमा करण्याचा कायदा केला तर अशा बाबांचे भावी पेव तरी कमी फुटेल!
श्रद्धेचा बाजार उठला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:03 AM