- किरण अग्रवाल
यंदा एकतर पाऊसच विलंबाने आला, आणि तो येताच नेहमीप्रमाणे पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर वाहून गेले. जागोजागच्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे कंबरडे तुटायची वेळ आली आहे, तेव्हा या रस्त्यांच्या गुणवत्ता निकषांची कागदपत्रे या निमित्ताने तपासली जाणे गरजेचे आहे.
लांबलेला पाऊस एकदाचा सुरू झाल्याने बळीराजाचा काहीसा जिवात जीव आला आहे, परंतु या पहिल्याच पावसाने रस्ते कामांची जी कल्हई उडवून ठेवली आहे त्याने वाहनधारकांना कंबर व पाठदुखीच्या वेदना दिल्या तर आश्चर्य वाटू नये.
यंदा मान्सून थोडाथोडका नव्हे, तर तब्बल महिनाभर लांबल्याने खरिपाच्या पेरणीला विलंब झाला आहे. अजूनही काही भागांत पुरेसा समाधानकारक पाऊस नाही, पण उशिरा का होईना तो आल्याने बळीराजा कामाला लागला आहे; पण शेती कामांसाठी शेतात जायचे तर पहिल्याच पावसाने रस्त्यांची हालत अशी काही करून ठेवली आहे की विचारता सोय नाही. विशेषत: पाणंद रस्त्याची कामे अनेक भागांत झालेली नाहीत. त्यामुळे बैलगाडीवर साहित्य वाहून न्यायचे तर शेतकऱ्याचीच नव्हे, मुक्या प्राण्यांचीही मोठीच कसरत होत आहे.
अजून खऱ्या पावसाळ्याला सामोरे जायचे आहे, पण तत्पूर्वीच रस्त्यांची ‘वाट’ लागली आहे. अकोला काय, किंवा बुलढाणा, वाशिम काय; सर्वच ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने त्यातून वाट काढणे दुचाकीस्वारांसाठी जिकिरीचे बनले आहे. पावसाळा सुरू झाला, परंतु अनेक ठिकाणच्या पावसाळी गटारी स्वच्छ केल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यांवर व घरादारात शिरून नुकसानीस सामोरे जावे लागल्याचाही अनुभव आला आहे. अजून म्हणावा तसा पाऊस नाहीच, तरी अकोला शहरातील व रेल्वे रुळाखालील अंडरपास पाण्याने तुडुंब भरली आहेत. यातील पाण्याचा निचरा होऊन जाईलही, पण अशा कामांमधील परसेंटेजचा जो निचरा ज्याच्या कुणाच्या खिशात झाला आहे, त्याची चर्चा झाल्याखेरीज राहू नये.
मध्य प्रदेश व अकोट तालुक्याला अकोला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल ९६ वर्षे जुना झाला, त्याला तडे पडले म्हणून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तो वाहतुकीस बंद केला गेला. यामुळे स्थानिक नागरिकांची होणारी कुचंबना लक्षात घेता तातडीने सुमारे चार कोटी खर्च करून एक तात्पुरता पूल उभारला गेला, पहिल्याच पावसाचा पूर या पुलावरून ओसंडून वाहिला. यामुळे अकोला व अकोटचा संपर्क खंडित होऊन प्रवाशांचे खूपच हाल होतात. आता जेव्हा जेव्हा नदीला पाणी येईल त्यावेळी अशीच स्थिती ओढवणार, त्यामुळे लांबच्या दर्यापूरमार्गे प्रवासाखेरीज पर्याय उरलेला नाही. शेजारी असलेल्या गोपालखेडच्या पूलावरून पुढे जायचे तर त्यासाठीचा पोहोच मार्गही अद्याप पूर्ण झालेला नाही. पातुर ते महानचा अवघा अठ्ठावीस किलोमीटरचा रस्ता, पण त्याची अवस्था अशी झाली आहे की अर्धा तासाऐवजी तेथे चक्क दोन दोन तास लागत आहेत. म्हणजे एकतर वेळ जातो, आणि दुसरे म्हणजे कंबरडे तुटते. पण बोलायचे कुणाला?, कारण ऐकणारे आहेत कुठे?
रस्त्याची कोणतीही कामे करताना त्यासाठी गुणवत्तेचे निकष ठरलेले असतात व ते तपासून बिले काढली जाणे अपेक्षित असते. एकाच पावसात डांबर वाहून गेलेले असे जे जे काही रस्ते आहेत त्यांच्या गुणवत्तेची तपासणी कोणी केली, हे रस्ते कधीपर्यंत टिकणे अपेक्षित होते याचा शोध घेऊन जरा त्या गुणवत्ता प्रमाणपत्रांवरची धूळ यानिमित्ताने झटकायला हवी. लाखो रुपये खर्चाचे रस्ते दरवर्षी असे पावसात उघडे पडताना दिसतात, पण त्यासाठी कुणीच जबाबदार धरला जाताना दिसत नाही. पाऊस व अतिवृष्टीत हे होणारच असे गृहीत धरून यंत्रणाही संबंधित ठेकेदारांना क्लीन चिट देतात, हेच आश्चर्याचे व ओघानेच परस्परांमधील मिलीजुलीचे प्रत्यंतर आणून देणारे म्हणावयास हवे.
सारांशात, पावसामुळे झालेली रस्त्यांची बिकट अवस्था पाहता या रस्ता कामांच्या गुणवत्तेचे ‘रिऑडिट’ केले जाणे गरजेचे ठरावे. ज्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत तेथे ठिगळं जोडून वाहनधारकांची अपघात प्रवणता कमी करण्याचे प्रयत्न तातडीने व्हायला हवेत.