मंगळवारी रेल्वेगाडी अपहरणाची पाकिस्तानातून आलेली बातमी बहुतांश जणांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली; कारण रेल्वेगाडीचे अपहरण फारसे ऐकिवात नसते. नाही म्हणायला भारतासह जगाच्या इतरही भागांत रेल्वे अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत; पण विमान अपहरणाच्या तुलनेत त्यांचे प्रमाण फारच थोडे आहे. त्यामुळे रेल्वेगाडीचे अपहरण झाल्याची बातमी येऊन थडकली, तेव्हा अनेकांचा त्यावर विश्वासच बसला नाही. अर्थात लवकरच हे स्पष्ट झाले की, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देत असलेल्या ‘बलोच मुक्ती सेना’ म्हणजेच ‘बीएलए’च्या बंडखोरांनी खरोखरच प्रवासी रेल्वेगाडीचे अपहरण केले आहे. आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त प्रवाशांपैकी १९० जणांची सुटका झाली असून, ३० बंडखोर ठार झाले आहेत. सुटका झालेल्या प्रवाशांपैकी काहींच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाल्या असून, बंडखोरांनीच त्यांची सुटका केल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.
वस्तुस्थिती काहीही असो; पण सर्वसामान्य नागरिकांची मृत्यूच्या दाढेतून सुटका होणे नक्कीच आनंददायक वार्ता आहे. रेल्वे अपहरणाच्या माध्यमातून बलुचिस्तानच्या मुद्द्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधण्यात ‘बीएलए’चे नेतृत्व यशस्वी झाले, हे मात्र निश्चित! भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा, सध्याच्या बलुचिस्तानचा भाग असलेल्या चार संस्थानांपैकी कलातचे संस्थानिक मीर अहमद यार खान यांनी स्वतंत्र राहण्याची घोषणा केली होती; परंतु वर्षभरातच त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पाकिस्तानात सामील होण्यास भाग पाडण्यात आले. पुढे २००० मध्ये ‘बीएलए’चा जन्म झाला. ही संघटना दक्षिण अफगाणिस्तानातून पाकिस्तानात हल्ले घडवीत असते. विशेषतः पाकिस्तानी सैन्य ‘बीएलए’च्या निशाण्यावर असते. पाकिस्तानातील सर्वांत मोठ्या राज्याला स्वतंत्र करणे, हे ‘बीएलए’चे ध्येय आहे. बलुचिस्तान केवळ क्षेत्रफळानेच मोठे नाही, तर नैसर्गिक साधनसंपत्तीने अत्यंत समृद्ध आहे; परंतु तरीही ते पाकिस्तानातील सर्वांत अविकसित राज्य आहे.
बलुचिस्तानचे दोहन करून इतर प्रांतांचा विकास साधताना, बलुचिस्तानची मात्र सातत्याने उपेक्षा केली जात असल्याची सल, बलुच नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळेच ‘बीएलए’ला सहानुभूती मिळते. त्या बळावर गत काही वर्षांत ‘बीएलए’ शक्तिशाली होत गेली. आधीच जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊन मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू झाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष वाढतो आहे आणि भारतात सामील होण्याची इच्छा प्रबळ होतेय! त्यातच बलुचिस्तानही अशांत झाल्याने भिकेला लागलेल्या पाकिस्तानच्या डोकेदुखीत भर पडली आहे. योगायोगाने चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपेक)चे पाकिस्तानातील एक टोक पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे, तर दुसरे बलुचिस्तानात! बीएलए बंडखोर या प्रकल्पावर काम करीत असलेल्या चिनी नागरिकांनाही सातत्याने लक्ष्य करीत आहेत. मलाक्काची सामुद्रधुनी टाळून थेट अरबी समुद्रात प्रवेश मिळवीत ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने चीनसाठी सीपेक हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे; पण बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील वाढत्या असंतोषामुळे चीन चिंताक्रांत झाला आहे. पाकिस्तानला प्रचंड आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत करूनही पाकिस्तान दोन्ही प्रांतांत शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरत असल्याने चीन पाकिस्तानवर चिडलेला आहे. परिणामी पाकिस्तानच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. त्यातच बीएलएने रेल्वेगाडीचे अपहरण करून संपूर्ण जगाचे लक्ष बलुचिस्तानकडे आकृष्ट केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्या घटनेमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला असला तरी, भारताने पाकिस्तानच्या अंतर्गत भानगडीत नाक न खुपसण्याचे धोरण जोपासले आहे. अर्थात शेजारी देशातील घटनाक्रमाची झळ भारताला पोहोचू लागल्यास भारताला त्याकडे फार काळ दुर्लक्ष करता येणार नाही. यापूर्वी १९७१ मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानात आणि आताच्या बांगलादेशात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि शेवटी भारताला थेट हस्तक्षेप करावा लागला होता, हा इतिहास फार जुना नाही! रेल्वे अपहरणाचा अध्याय आज ना उद्या संपुष्टात येईलच; पण त्याकडे केवळ एक घटना म्हणून बघण्याची चूक पाकिस्तानला महागात पडू शकते. रेल्वे अपहरण हे बलुचिस्तानातील दीर्घकालीन असंतोष, तसेच राजकीय व सामाजिक समस्यांचे प्रतिबिंब आहे. पाकिस्तानी नेतृत्वाने त्या दृष्टिकोनातून त्याकडे बघणे पाकिस्तानच्या अखंडतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. भारतालाही त्याकडे केवळ शेजारी देशातील घटना म्हणून डोळेझाक करता येणार नाही!