लोकसभा निवडणुकीतील पीछेहाट पाठीवर टाकून महाराष्ट्रातील महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुन्हा सरसावला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. गांधीभूमी वर्ध्यात पीएम विश्वकर्मा योजनेची वर्षपूर्ती पंतप्रधानांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. अमरावती येथे होणाऱ्या पीएम मित्रा टेक्सटाइल पार्कचे भूमिपूजन त्यांनी वर्ध्यातून केले. त्यासाठी जीतनराम मांझी, जयंत चौधरी या मंत्र्यांना घेऊन पंतप्रधान वर्ध्याला आले. ग्रामस्वराज्याची कल्पना ज्यांच्या कौशल्यावर बेतली अशा विविध कारागीर समुदायांना अर्थसहाय्याची ही योजना गेल्यावर्षी सुरू झाली. आता सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील १४ लाख ७२ हजार कारागिरांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पंतप्रधानांनी योजनेच्या वर्षपूर्तीसाठी निवडलेले स्थळही वैशिष्ट्यपूर्ण आहे. वर्धा ही महात्मा गांधींची कर्मभूमी. वर्धा, सेवाग्राम, पवनार या स्थळांना गांधी काळात तीर्थक्षेत्राचे स्थान होते. गांधीजींची ग्रामस्वराज्याची, स्वावलंबी खेड्याची सगळी कल्पना पांरपरिक कौशल्यावर, कारागिरांनी उभारलेल्या कुटीर उद्योगांवर आधारलेली होती. तिचा योग्य तो उल्लेख पंतप्रधानांनी केला. तथापि, त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे हे की, मोदींनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराचा नारळ या कार्यक्रमात फोडला. प्रचाराची दिशा निश्चित केली. महाराष्ट्रातही काँग्रेस हाच आपला प्रमुख विरोधक असल्याची पुरती जाणीव भाजप, तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्टार प्रचारक या नात्याने पंतप्रधानांना आहेच. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक तेरा जागा जिंकून काँग्रेस हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनला. अन्य प्रांतांपेक्षा या पक्षाची ताकद विदर्भात आहे. विदर्भातील दहापैकी पाच जागा काँग्रेसने तर आणखी दोन जागा उबाठा व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकल्या.
वर्धा लोकसभा मतदारसंघात तर मूळ काँग्रेसचे माजी आ. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढले व जिंकले, हे सगळे संदर्भ लक्षात घेत पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. 'हा देशातील सर्वाधिक भ्रष्ट व बेईमान पक्ष आहे. या पक्षांच्या नेत्यांची भाषा व दिशा देश जोडणारी नव्हे तर तोडणारी आहे. काँग्रेसचे नेते विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. देशाची संस्कृती व आस्थांचा अपमान करतात. संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सवात तल्लीन असताना शेजारच्या कर्नाटकात मात्र गणपतीची मूर्ती पोलिस व्हॅनमध्ये होती. कारण, मुळात हा पक्ष देशाचे तुकडे तुकडे करू पाहणारी टोळी, तसेच अर्बन नक्षल चालवितात', अशी थेट व घणाघाती टीका पंतप्रधानांनी काँग्रेसवर केली. अर्थातच, भाजप आणि महायुतीमधील मित्रपक्षांचे नेते आता यापुढे प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत आणि निवडणूक प्रचारकाळातही याच मुद्द्यांवर महाविकास आघाडीवर, त्यातही काँग्रेसवर टीका करीत राहतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या निमित्ताने याचेही पुन्हा स्मरण करून द्यावे लागेल की, लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यानंतर अशीच आक्रमक टीका पंतप्रधान व त्यांच्या सहकारी नेत्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांवर केली होती. विशेषतः काँग्रेसच्या 'न्यायपत्र' नावाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील काही आश्वासनांचा आधार घेऊन, जादा बच्चे पैदा करनेवाल्यांना संपत्तीचे वाटप, मंगळसूत्र, मुजरा वगैरे भाषा वापरली गेली होती. त्या टीकेचे काही प्रमाणात बुमरँग झाले, असे लोकसभेच्या निकालाचे खोलात विश्लेषण केले तर म्हणावे लागेल. राजस्थानातील बांसवाडापासून उत्तर भारतातील अनेक ठिकाणी मतदारांना ही भाषा आवडली नाही. त्यांनी विरोधात मतदान केले. त्यामुळेच चारशे जागांचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला २४० जागांवर समाधान मानावे लागले. बहुमतासाठी युनायटेड जनता दल व तेलुगू देसम पक्षांची मदत घ्यावी लागली.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात निवडणुकीचे खरे मुद्दे कोणते असतील आणि प्रचार कोणत्या मुद्यांवर होईल यासंदर्भाने पंतप्रधानांच्या आक्रमक टीकेकडे पाहावे लागेल. ग्रामीण भागात सोयाबीन व कापूस या नगदी पिकांचे दर कोसळल्याचा फटका बसू शकतो, हे वेळीच ओळखून महायुती सरकारने केंद्राच्या मदतीने हमीभावापेक्षा अधिक दराने शेतमालाच्या खरेदीची उपाययोजना केली आहे. अन्य राज्यांप्रमाणेच प्रचंड बेरोजगारी आणि राज्यातील नव्या उद्योगांची स्थिती हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरू शकेल. महागाई व गरिबीच्या मुद्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सत्ताधारी महायुती करीत आहे. अशावेळी संस्कृती, आस्था, देशभक्ती वगैरे भावनिक मुद्यांवर आक्रमक टीकेचा मार्गच पंतप्रधानांनी कायम ठेवला, हे उल्लेखनीय.