गुजरातेत भाजपाने सत्ता राखली असली तरी, काँग्रेसमुक्त भारत करण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या व एकापाठोपाठ एक विविध राज्यांत दिग्विजयाची नोंद करणा-या नरेंद्र मोदी व अमित शहा या नेतृत्वाच्या जोडगोळीला त्यांच्याच घरच्या अंगणात वेसण घालण्याचे काम तेथील मतदारांनी केल्याने यापुढच्या राष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ बदलण्याची अपेक्षा करता येणारी आहे.
२०१३च्या हिवाळ्यात राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये सत्ता राखल्याच्या पाठोपाठ गोवा व हरियाणासोबतच उत्तर प्रदेशमध्येही ‘कमळ’ फुलविल्याने भाजपाचा आत्मविश्वास अधिकच दुणावला होता. आता गुजरात पुन्हा राखताना हिमाचलही ताब्यात आल्याने भाजपा व त्याच्या मित्रपक्षांकडे असलेल्या राज्यांची संख्या १९ झाली आहे, तर काँग्रेस केवळ ५ राज्यात उरली आहे. म्हणायला ही भाजपाच्या संकल्पानुसार काँग्रेसमुक्त भारताकडे होत असलेली वाटचाल म्हणता यावी; परंतु ती होत असताना या मोहिमेवर निघालेल्या मोदी-शहांच्या गृह राज्यातच त्यांची जी दमछाक झाली, त्यातून मिळून जाणारे संकेत भविष्यातील राजकारणावर परिणामकारक ठरू शकणारेच म्हणता यावेत. गुजरातमध्ये सर्वार्थाने ‘तगड्या’ असलेल्या भाजपाच्या प्रचार यंत्रणेपुढे काँग्रेसची अवस्था तशी विकलांगच होती.
तीन-चार दशकांचा राजकीय राबता असलेली व देशाचे नेतृत्व करणारी मोदी-शहा यांची जोडी, त्यांच्या सोबतीला संपूर्ण केंद्रीय व राज्यातील मंत्रिमंडळ; तेही कमी म्हणून की काय भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशी मातब्बरांची फौज व त्यापुढे कुचेष्ठेने पप्पू प्रतिमा रंगविले गेलेले काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी, त्यांना लाभलेली हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवानीसारख्या तरुणांची साथ एवढेच काय ते विरोधकांचे बळ होते. त्याला काँग्रेसचे प्रभारी अशोक गहलोत व प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांच्या सूक्ष्म नियोजनाची साथ होतीच; पण २२ वर्षांच्या भाजपाच्या सत्तेमुळे ग्रामपातळीपर्यंतची काँग्रेस तशी मरणासन्नच होती. परंतु तरी तिने उभारी घेत यश मिळविले. प्रचाराच्या पातळीवरच काँग्रेसला जे समर्थन लाभताना दिसले त्यामुळेच पंतप्रधानांना गुजरातेत तळ ठोकावा लागला व तब्बल सुमारे तीन डझन सभा घेण्याची वेळ आली. कोणत्याही पंतप्रधानाने एखाद्या राज्याच्या निवडणुकीत एवढ्या सभा व वेळ देण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तरी भाजपाला अपेक्षित १५०चा आकडा गाठता आला नाही. उलट ११५वरून ते ९९वर घसरले, तर काँग्रेस ६१वरून ७७वर पोहोचली. हे ‘अॅण्टी इन्कम्बन्सी’तून घडून आलेले आहे असे जरी म्हटले, तरी त्यात एक इशारा दडला आहे. भाजपा व तिच्या नेत्यांनी तो गांभीर्याने घेण्यासारखा आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या इशा-याचेही सूतोवाच तसे प्रचारकाळात होऊन गेलेच होते. देशभरातील मोदींच्या सभा या औत्सुक्याचे विषय ठरत असताना गुजरातमधील त्यांच्या काही सभांतील समर्थक ओसरलेले पहावयास मिळाले. अधिक काळच्या सत्तेतून ओढवलेली तेथील राजकीय दहशत चर्चेत असतानाही मेहसाना, राजकोट, नवसारी व सुरत परिसरातील सुमारे चार हजार गावांत भाजपा नेत्यांना प्रचारास संचारबंदीच्या पाट्या झळकलेल्या दिसून आल्या, ते कशाचे लक्षण होते? विकासाच्या गुजरात मॉडेलचा देशभर डंका पिटला गेला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्याच आधारे केंद्रातील सत्ता काबीज केली गेली; पण या निवडणुकीतून विकासच हरवल्याचे दिसून आले. विकासाऐवजी औरंगजेब, खिलजींची नावे घेऊन प्रचार केला गेला. राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिर भेटीप्रसंगी कोणत्या रजिस्टरमध्ये सही केली, यासारखे मुद्दे उपस्थित करून व पाकिस्तानलाही प्रचारात ओढून पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणाचे फंडे वापरले गेले. इतकेच नव्हे तर दभोई या मतदारसंघातील भाजपा उमेदवाराने ‘दाढी-टोपींच्या व्यक्तींची संख्या कमी करावी लागेल’ अशी वक्तव्ये केल्याने त्याला नोटीस बजावण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली. हे सर्व का करावे लागले, याचे उत्तर जेव्हा शोधायला घेतले जाते तेव्हा काँग्रेसला लाभणाºया समर्थनाने भाजपात व्यक्त झालेली चिंताच त्यामागे राहिल्याचे प्रकर्षाने दिसून येते. या चिंतेतूनच हार्दिक पटेलचे काही आपत्तीजनक व्हिडीओ प्रसारित करण्याच्या घाणेरड्या खेळीपासून तर काँग्रेसचे सौराष्ट्रातील प्रभारी, खासदार राजीव सातव यांना बेदम मारहाण करेपर्यंतच्या घटना घडून आलेल्या दिसल्या. ही भाजपाचा धीर सुटल्याचीच लक्षणे होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व २६ जागा खिशात घालणारा व देशात एकूण २७६ खासदार असलेला पक्ष व त्याचे नेते अवघ्या ४६ खासदारांचा पक्ष असलेल्या काँग्रेस व राहुल गांधींमुळे एवढा चिंताक्रांत व्हावा? हेच पुरेसे बोलके होते.
गुजरातेत भाजपाने कशीबशी सत्ता राखली ती नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेच्या बळावर हे निर्विवाद सत्य आहे. परंतु खुद्द मोदींच्या जन्मगावाचा समावेश असलेल्या उंझा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. २०१४ मध्ये पंतप्रधान होईपर्यंत मोदी ज्या मणीनगरमधून तीनवेळा विधानसभेत गेले होते, त्या मतदारसंघातील भाजपा उमेदवार धापा टाकत म्हणजे अवघ्या ७५ मतांच्या फरकाने विजयी झाला. शिवाय, गुजरात मंत्रिमंडळातील चार मंत्री पराभूत झाले. कधी नव्हे ते राज्यातील सुमारे सव्वापाच लाख मतदारांनी कोणताही उमेदवार पसंत नसल्याचा ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला तसेच भाजपा व काँग्रेसमधील मतांच्या टक्केवारीचे अंतर घटून ९ वरून ७ टक्क्यांवर आले. या सा-या बाबी भाजपाला सत्ता मिळूनही आनंद लाभू न देणा-याच आहेत. नव्हे, भाजपाच्या दिग्विजयाचा जो वारू देशभर उघळू पाहात आहे, त्याला त्या वेसण घालणा-याही आहेत. त्यामुळे पुढीलवर्षी आठ राज्यांमध्ये होणा-या निवडणुकांत काँग्रेस अशीच आत्मविश्वासाने सामोरी गेली व सोशल इंजिनिअरिंग घडवून आणण्याच्या दृष्टीने आतापासून कामाला लागली तर गुजरातच्या निकालाची परिणामकारकता तेथेही अनुभवयास मिळू शकेल. तेव्हा, सारांशात मांडायचे तर‘देश बदल रहा है’ असे म्हणणाºयांना अगोदर घराकडे लक्ष द्या; तुमचा ‘गुजरात बदल रहा है....’ असा इशारा देणारीच ही निवडणूक ठरली आहे.