तीन-साडेतीन दशकांच्या विलंबानंतर का होईना, पण ईडीने (सक्तवसुली संचालनालय) ॲमवेसारख्या मल्टी लेव्हल मार्केटिंग करणाऱ्या कंपनीला दणका दिला. या निमित्ताने झटपट श्रीमंत होण्याच्या धुंदीत अनाहूतपणे आपण लोकांची फसवणूक करत आहोत, हे या उद्योगातील सर्वसामान्य विक्रेत्यांना उमजेल ही अपेक्षा!
गेल्या तीन दशकांपासून भारतात मल्टी लेव्हल मार्केटिंगचा भूलभुलैया जोमाने फोफावत असताना, अचानक आताच कारवाई कशी झाली हा प्रश्न आहेच; पण त्याहीपेक्षा ॲमवेवर कारवाई करताना ईडीने जे मुद्दे उपस्थित केले, त्यांचा परामर्श घेणे क्रमप्राप्त आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्या पिरॅमिडसारखी एक रचना उभी करून त्याद्वारे आपल्या उत्पादनांची विक्री करतात. वरच्या श्रेणीत असलेली व्यक्ती खालील प्रत्येक व्यक्तीला उत्पादनांची विक्री करून कसे पैसे मिळवता येतील आणि श्रीमंत होता येईल याचे आमिष दाखवत राहते. या आमिषाला बळी पडून सर्वसामान्य लोक आपल्या ओळखीपाळखीत, नाते संबंधात शब्द खर्ची घालतात.
या पिरॅमिडची रचना अशी आहे की, उत्पादनाच्या विक्रीतून आलेल्या पैशाचा काही भाग विक्रेत्याला मिळतो; पण त्यातीलच एक मोठा अर्थभाग हा पिरॅमिडच्या शीर्षस्थ घटकाला मिळतो. जो माणूस हे उत्पादन विकत घेतो, त्याच्या माध्यमातून आणखी नेटवर्क जोडण्यासाठी मग विक्रेता त्याला कमिशनच्या माध्यमातून श्रीमंत होण्याच्या शिडीचा मार्ग दाखवतो. मग ती व्यक्तीही आणखी चार लोकांना ती उत्पादने विकत आपले मुद्दल काढण्याचा प्रयत्न करू लागते. याचा थेट फायदा शीर्षस्थ घटकालाच होत राहतो. या चक्रव्यूहात तुम्ही एकदा शिरत गेलात की, मग अभिमन्यू व्हायला फारसा वेळ लागत नाही. परतीचे दोर कापले गेलेले असतात. त्यामुळे पुढे लढल्याशिवाय पर्याय राहत नाही. लढाई मधेच सोडली तर तुमच्या वर-खाली असलेला साराच डोलारा कोसळतो.
अमेरिकी अर्थतज्ज्ञ डॉ. जॉन टेलर यांनी मांडलेल्या अभ्यासानुसार, मल्टी लेव्हल मार्केटिंगमध्ये पैशांची गुंतवणूक केलेल्या ९९ टक्के लोकांचे पैसे बुडतात, तर ९५ टक्के लोक या उद्योगातून घायाळ होऊनच दहा वर्षांच्या आत बाहेर पडतात. ॲमवेमध्ये हा पिरॅमिड साडेपाच लाख लोक जिवाच्या आकांताने सांभाळत आहेत. देशभरातल्या मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्यांच्या पिरॅमिडचा विचार केला तर तब्बल साडेतीन कोटी लोक या उद्योगात आहेत. हा दोरीवरून चालण्याचा खेळ आहे. तोल कधी जाईल याचा नेम नाही.
जागतिकीकरणानंतर अनेक कंपन्यांना भारताची प्रवेशद्वारे खुली झाली. मल्टी लेव्हल कंपन्याही आल्या. आपल्या भपकेबाज सादरीकरणानंतर अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्नरंजन त्यांनी लोकांना विकले. लोक भुलले. धबधब्यासारख्या वेगाने मनावर कोसळणाऱ्या मार्केटिंगच्या तंत्राने मनातील विवेकी विचारांची जागा लीलया धुवून टाकली. अशा स्थितीत ‘प्रथम मी आणि माझे पैसे’ हा विचार, यामुळे इतरांची फसवणूक होणार आहे या विचारांना जन्मच देत नाही. नेमके तिथेच मल्टी लेव्हल मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांचे फावते. लोकांच्या या लालसी वृत्तीला लक्ष्य करत आपले इप्सित साध्य करण्याच्या विचारातून ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ नावाची बनवाबनवी फोफावली. साधारणपणे कोणतीही व्यक्ती जेव्हा नवा व्यवसाय सुरू करते, तेव्हा उत्तम नेतृत्व, उत्तम दर्जाचे उत्पादन, उत्पादनाविषयी ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता, उत्पादनाला आवश्यक सेवा, आदी घटकांवर काम करते. सुरुवातीला व्यवसाय रुळेपर्यंत जरी वेळ लागत असला, तरी कालांतराने त्याचा शाश्वत म्हणता येईल असा जम बसतो. उत्तम व्यवसायांच्या याच सूत्राला मल्टी लेव्हल मार्केटिंगमधे मात्र हरताळ फासला जातो. पारदर्शकता आणि संयम हे व्यवसायाचे गुणसूत्र; त्याला छेद देण्याचे काम मल्टी लेव्हल कंपन्यांकडून होते.
वास्तविक पाहता मल्टी लेव्हल मार्केटिंग या प्रकाराला शास्त्रीय आधार नाही. उलटपक्षी जेव्हा जेव्हा मल्टी लेव्हल मार्केटिंगचा पिरॅमिड कोसळतो, त्या त्या वेळी ‘प्रत्येक क्रियेला तितक्याच उलट प्रतिक्रिया लाभते’, या शास्त्रज्ञ न्यूटन यांच्या नियमाची आठवण होते. १९२० च्या दशकांत चार्ल्स पॉन्झीने लोकांच्या लालसेत दडलेली झटपट श्रीमंतीची भावना ओळखली आणि पैसे दुप्पट करण्याची योजना अमेरिका, कॅनडात राबवली. सुरुवातीच्या काही लाभार्थ्यांनंतर हा डोलारा कोसळला आणि काळाच्या पटलावर पॉन्झी या नावाला फसवणूक या समानार्थी शब्दांत परावर्तित करून गेला. काळ बदलला; पण मानवी वृत्तीत विवेकाची उत्क्रांती झाली नाही. त्यामुळेच पॉन्झीचा वंशविस्तार आजही सुरूच आहे.