चिंब पावसानं रान आबादानी झालेलं असताना आणि मनही पावसाळी असतानाच इथला मुक्काम हलवणं, हे त्यांच्या प्रकृतीला साजेलसं. या नभाने या भुईला दान दिल्यानंतर मातीतून चैतन्य गात असताना, जोंधळ्याला चांदणे लगडून जाणं स्वाभाविकच. बाहेर पाऊस जिवाच्या आकांताने कोसळतोय आणि ना. धों. महानोर नावाचा माणूस आता आपल्यामध्ये असणार नाही, या कल्पनेनेच हिंदोळ आभाळभर झाला आहे.
रानात रमलेला आणि शेताने लळा लावल्यानंतर त्या हिरव्या बोलीचा शब्दच होऊन गेलेला हा कवी. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘रानातल्या कविता’ १९६७ मध्ये आला, तो काळ जगभर स्वप्नांचा पाठलाग करण्याचा! पु. शि. रेगे, बा. सी. मर्ढेकरांनंतरची साठोत्तरी कविता आपली वाट शोधत होती. साधीसुधी माणसंही बोलू लागली होती. ‘सारस्वतांनो, माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे’, असं म्हणत नारायण सुर्वेंसारखे कवी लिहू लागले होते.
काहींवर मागच्या पिढीचा प्रभाव होता, तर काहींना युरोप-अमेरिका अथवा सोव्हिएत रशिया खुणावत होती. साठचं दशक हा मराठी साहित्यासाठीचा अभूतपूर्व काळ होता. अशावेळी महानोरांच्या ‘रानातल्या कवितां’नी सगळ्यांना थक्क करून टाकलं. मातीत उगवलेली आणि आकाशाला गवसणी घालणारी ही कविता अनवट तर होतीच; पण अगदीच नवीकोरी होती. घन ओथंबून आल्यासारखी ही कविता आली आणि तिच्यामुळे मराठी कवितेचंच ‘अंग झिम्माड झालं’. ही हिरवीकंच कविता तिची प्रतिमासृष्टी घेऊन मराठी मुलुखात उतरली. असं उधाणवारं ती घेऊन आली की, ‘मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी’ अशी स्थिती व्हावी! रसरशीत निसर्गभान जागवत या कवीने निसर्ग आणि कविता यांच्यात असं अद्वैत निर्माण केलं की, या कवितेसोबत निसर्ग साद घालू लागला आणि निसर्गासोबत असताना त्यात माणूस दिसू लागला.
‘रानातल्या कविता’ आणि ‘वही’ या कवितासंग्रहांनंतर महानोरांकडे सिनेमावाल्यांचं लक्ष गेलंच. कारण महानोरांच्या कवितेची अंगभूत लय! लोकगीतांशी, मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्दकळा आणि नव्या अनुभवासोबत नवं रूप घेणारी चित्रमयताही! गदिमा, पी. सावळाराम, शांता शेळके हे सारे बहरात असताना ‘जैत रे जैत’साठीची गाणी महानोरांनी लिहावीत, असं संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना वाटलं आणि महानोरांसाठी नवं जग खुलं झालं... ‘जैत रे जैत’ अजरामर झाला! भवतालाशी नातं सांगणारा हा कवी फक्त शब्दांचा फुलोरा फुलवणारा नव्हता. ‘सरलं दळण, ओवी अडली जात्यात’ असं दुःख कवितेतून मांडणाऱ्या महानोरांना व्यापक सामाजिक भान होतं. शेतकरी, श्रमिक, कामगार, स्त्रिया यांच्या प्रश्नांचं आकलन होतं. त्यातूनच यशवंतराव चव्हाण, शरद पवारांशी त्यांचे सूर जुळले.
महानोर विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेले आणि त्यांनी अनेक दुर्लक्षित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी शेतीविषयी लिहिलं, पर्यावरणाविषयी लिहिलं, समीक्षा केली, संपादन केलं, ‘गांधारी’सारखी कादंबरी लिहिली; पण कवी आणि गीतकार हे त्यांचं रूप महाराष्ट्राने हृदयात साठवून ठेवलं! भरभरून जगणारा, मुसळधार कोसळणारा आणि मातीशी इमान असणारा असा भन्नाट माणूस होता हा. त्यांचं व्यक्तिमत्त्वही तसंच रांगडं होतं. शेतीत असे रमले की, खूपदा आमंत्रणं येऊनही त्यांनी शहरात ‘सेटल’ व्हायचं नाकारलं. मुळात ‘सेटल’ होणं हा काही महानोरांचा स्वभाव नव्हता. ते सदैव वाहणारे, फुलणारे आणि फुलवणारे. नवे पेरत राहणारे. महानोर आले म्हणजे मैफल सुरू होणार, याची खात्रीच असायची. हातातल्या वहीवर ठेका धरत ते गाऊ लागायचे, तेव्हा अवघे श्रोते जागीच ताल धरायचे. कारण, त्यांच्या कवितेला चव होती. तिला स्पर्श करता यायचा. ती लख्ख दिसायची. जाणवायची. ऐकू यायची.
अशा कवितेवर कोण प्रेम करणार नाही? ‘या जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस की, मोहाच्या झाडालाही मोह व्हावा’, अशी शब्दकळा नि प्रतिमासृष्टी ज्याची असेल, त्याच्या प्रेमात कोण नाही पडणार? बाजिंदी मनमानी करू शकणारा हा असा कवी, प्रेमावरच त्याचं विलक्षण प्रेम होतं... आता महानोर आपल्यासोबत असणार नाहीत...! पण, ते जातील कुठे? फाटकी झोपडी हे ज्याचं काळीज आहे आणि या रानात ज्याचे प्राण गुंतलेले आहेत, ते काळीज आणि प्राण हिरावून नेण्याची हिंमत कोणामध्ये आहे? उतरू आलेलं आभाळ पंखांवरती पांघरुन हा कवी चांदण्यांत न्हाण्यासाठी निघाला आहे... पाऊस कसला कोसळतो आहे!