१९८९ची गोष्ट. हार्वर्ड विद्यापीठात पहिल्यांदाच अर्थशास्त्र शिकविण्यासाठी एका महिलेची निवड झाली. क्लॉडिया गोल्डीन त्यांचे नाव. अमेरिकेत-अगदी हार्वर्ड स्कॉलर म्हणवणाऱ्यांचेही त्याकाळी असे मत होते की, बाईला अर्थशास्त्रातले काय कळते, ती काय अर्थशास्त्र शिकवणार? आता २०२३. त्याच क्लॉडिया गोल्डीन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या जगातल्या आजवरच्या त्या फक्त तिसऱ्या महिला. केवळ एकट्या महिलेला (कुणाही पुरुषासोबत वाटून न घेता) अर्थशास्त्रासाठी मिळालेले तर हे पहिलेच नोबेल!
पुरस्कार जाहीर झाल्यावर क्लॉडिया यांनी केलेले विधान महिलांच्या आजवरच्या संघर्षाची आणि बदलांसाठी आस लावून बसलेल्या प्रयत्नांची गाथा एकाच वेळी सांगते. त्या म्हणतात, ‘उत्तुंग स्वप्ने आणि दीर्घकालीन बदलांच्या इच्छेला हा पुरस्कार समर्पित आहे!’ दीर्घकालीन आणि मूलभूत बदल ही गोष्ट सोपी नसतेच. काही शतकं जातात मानवी समाज आणि वर्तनात बदल व्हायला. क्लॉडिया यांनी २०० वर्षांचा अमेरिकन श्रमविश्वाचा अक्षरश: खणून काढलेला इतिहास हेच सांगतो. अमेरिकन श्रमविश्वात महिलांचे बदलत गेलेले स्थान, मिळालेल्या संधी, महिलांना पुरुषांइतकेच वेतन मिळते का आणि महिला श्रमविश्वात प्रगती करत टिकून राहतात का, असा प्रदीर्घ अभ्यास क्लॉडिया यांनी केला. ‘डिटेक्टिव्ह’च्या शिस्तीने त्यांनी आपले तपशील पुन्हा पुन्हा तपासले.
अमेरिकेसारख्या प्रगत देशातले श्रमविश्व आणि सामाजिक बदलांचा इतिहास यांची गेल्या दोन दशकांतली कहाणी त्यातून उलगडली. मात्र, ती फार सुखद नाही. कालानुरूप बदल होत गेले, पण ते बदल समाजाने केलेले किंवा व्यवस्थात्मक नव्हते, तर अनेकदा परिस्थितीचा रेटा त्याला कारणीभूत ठरला. गेल्या दोन शतकांत श्रमविश्वात महिलांचा सहभाग वाढला किंवा कमी झाला याची कारणेही विभिन्न आहेत. क्लॉडिया यांचा अभ्यास सांगतो की १८०० मध्ये औद्योगिक क्रांतीनंतर आणि त्याकाळी श्रमविश्वात होत्या त्यातल्या अनेक महिला त्या क्रांतीनंतर बाहेर गेल्या. महिलांचा कामगार विश्वातला सहभाग कमी झाला. त्याउलट १९०० नंतर सेवाक्षेत्राचा उदय झाला आणि महिलांचे काम करण्याचे प्रमाण वाढले. त्याला जोड मिळाली अजून दोन गोष्टींची. महिलांना शिक्षणाच्या संधी मिळू लागल्या आणि त्याचकाळात गर्भनिरोधक गोळ्या सहजी उपलब्ध होऊ लागल्या म्हणून महिलांच्या नोकरीच्या शक्यता अधिक वाढल्या.
क्लाॅडिया यांचा दोन शतकांचा अभ्यास सांगतो की, मुलं झाली की महिलांच्या नोकरीच्या आणि नोकरीत प्रगतीच्या शक्यता कमी होतात, कारण मुलं सांभाळणं ही सर्व काळ आईचीच जबाबदारी मानली जाते. त्यातूनही संघर्ष करून ज्या महिला नोकरी, व्यवसायात टिकून राहतात, त्यांना उच्च पदांवर जाण्यासाठी अपार संघर्ष करावा लागतो आणि अनेकींना प्रयत्नांची शर्थ करूनही ते साधत नाही. केवळ उच्चपदस्थच नाही, तर अधिक वेतनाच्या आणि समवेतनाच्या शक्यता कमी करणारं अजून एक कारण म्हणजे ऐन तारुण्यात तरुणींना आजही तरुणांइतक्या उच्च शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्या प्रगतीसह उत्पन्नावर होतो. महिलांना पुरुषांइतकेच वेतन न मिळण्याची कारणे या दोन गोष्टींच्या पोटात आहेतच, सोबत सामाजिक धारणाही महिलांना पुरुषांपेक्षा कमीच लेखतात. बाकी समाजाची चर्चा जाऊ द्या, ज्या हार्वर्ड स्कॉलर्सना जगभर मान दिला जातो, त्या स्कॉलर्सना अजूनही वाटते की अर्थशास्त्र हा विषय बायकांना समजत नाही!
२०१८ मध्ये म्हणजे पाच वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत क्लॉडिया स्वत:चाच अनुभव सांगतात. हार्वर्डमध्ये शिकायला येणाऱ्या पुरुषांना अजूनही वाटते की, अर्थशास्त्र म्हणजे केवळ व्यवस्थापन आणि वित्त व्यवहार. त्यात महिलांना गती नसते. क्लॉडिया म्हणतात, त्यांना समजावून सांगावे लागते की, अर्थशास्त्र म्हणजे केवळ एवढेच नाही, तर आरोग्य, असमानता, आर्थिक असामनता, सामाजिक वर्तन या साऱ्याचा अर्थशास्त्रात समावेश होतो.
आजही अमेरिकन श्रमविश्वात एकूण महिलांपैकी केवळ ५० टक्के महिला कार्यरत आहेत. प्रगत जगातलं जर हे चित्र असेल, तर विकसनशील आणि मागास देशात महिलांच्या वाट्याला किती संधी येत असतील याची कल्पनाच केलेली बरी! अर्थशास्त्राचे हे नोबेल सामाजिक इतिहास आणि भविष्यातील बदलांची आस म्हणूनही फार मोलाचे आहे. दीर्घकालीन शाश्वत बदलांची उमेद त्याने बळकट केली!