चार भिंती, दरवाजा अन् कडी; 'मातोश्री'वरील ठाकरे-शहांच्या भेटीत नेमके घडले काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 07:49 AM2021-02-09T07:49:46+5:302021-02-09T07:50:38+5:30
भाजपने सत्तास्थापनेचे प्रयत्न सोडलेले नाहीत. मोदी-शहा यांना पवार यांच्या सहकार्याने हे शक्य व्हावे, असे वाटत असावे तर राज्यातील भाजप नेत्यांना आजही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करणे हेच स्वीकारार्ह वाटत असावे, असे दिसते.
चार भिंती, एक दरवाजा आणि त्याला घातलेली कडी यामुळे अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळे येतात. संसार तुटतात आणि चारित्र्यावर लांच्छन लागते. सव्वा वर्षापूर्वी महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीच्या तीन दशकांच्या संसारावर विस्तव ठेवण्यास हेच कारण ठरले. अमित शहा युतीची चर्चा करण्याकरिता मातोश्रीवर आले. ‘जिलेबी फाफडा, नरेंद्र मोदी आपडा’ हे म्हणण्याकरिता शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजी केले. उभयतांमध्ये बंद खोलीत अत्यल्प काळ चर्चा झाली, हे शिवसेना व भाजपचे नेते मान्य करतात. मात्र, या चर्चेत शहा यांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचा ठाकरे यांचा दावा आहे, तर आपण मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नसल्याचे शहा यांनी रविवारी सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात जाहीर केले. लागलीच शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरे कधी खोटे बोलत नाहीत, असे भाजपला ठणकावून सांगितले तर शहा यांनी खुलासा केल्यामुळे राज्यातील सत्ताविन्मुख भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची घोषणा करण्याकरिता आयोजित त्या पत्रकार परिषदेत अगदी शेवटचा प्रश्न मुख्यमंत्रिपदाबाबत विचारला गेला, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोबत बसून चर्चेने निर्णय करू, असे थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली होती. त्या पत्रकार परिषदेत युती घडवून आणल्याने केवळ शहा समाधानी दिसत होते. मात्र, ठाकरे-फडणवीसांची अस्वस्थता देहबोलीतून स्पष्ट दिसत होती. बंद खोलीत जे घडले त्याबद्दल कोण खरे व कोण खोटे, याचे उत्तर कुणालाही अखेरपर्यंत सापडणार नाही. वेळ मारून नेण्याकरिता शहा यांनी मुख्यमंत्रिपद देण्याबाबत होकार दिला का?, उद्धव यांनी मुख्यमंत्रिपदाचा विषय काढताच शहा यांनी थेट नकार दिला व युतीकरिता दबाव टाकला का?, मुळात उद्धव यांनी त्यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या विषयाला थेट हात घातला की शहा यांचा कल आडूनआडून समजून घेतल्यावर तेव्हाच भाजपला टांग मारून वेगळे समीकरण जुळवण्याची खूणगाठ मनाशी बांधली, या व अशा असंख्य शक्याशक्यतांची मुहूर्तमेढ त्या बंद खोलीतील भेटीत रोवली गेली.
शहा यांचे दुसरे विधान तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही जर शिवसेनेच्या मार्गाने गेलो असतो तर शिवसेना संपली असती. याचा अर्थ शहा थेट हे सुचवू पाहत आहेत की, जर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले असते तर शिवसेना फुटली असती. अर्थात तसा प्रयत्न भाजपने केला होता. पहाटेच्या वेळी फडणवीस व अजित पवार यांचा झालेला शपथविधी हा त्याच रणनीतीचा आविष्कार होता. मात्र, भाजपबरोबर सत्तेस गेल्यास फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते. फडणवीस हे राजकारणातील मुरब्बी आहेत. शिवाय, भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन या मागील सरकारमधील मंत्र्यांना तोलामोलाची खाती दिल्यावर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा विचार झाला असता तर कदाचित दोन पक्षांचे सरकार असल्याने संख्यात्मक निकषावर दोन-तीन खाती जास्त मिळाली असती. पण, मलईदार खाती भाजपने सोडली नसती.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांची मनमर्जी सांभाळल्यावर बाकी प्रश्न उरत नाहीत. शिवाय भाजपच्या सोबत सरकार बनवले असते तर त्या सरकारचा रिमोट कंट्रोल नरेंद्र मोदी यांच्याच हाती राहिला असता. आता शरद पवार हेच सरकारचे ‘शिल्पकार’ आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पवार यांना फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार नको असेल आणि सत्तालालसेपोटी फडणवीस यांना लागलीच दूर केले, हे मोदी यांना मान्य नसेल, हेही महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होण्याचे कारण असू शकते. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत नसले तरी भेगा पडल्याचे अनेकदा जाणवते.
काही दिवसांपूर्वी मुनगंटीवार यांनी उद्धव यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू नाही, असे वक्तव्य केले. फडणवीस यांनीही शिडीखेरीज पासा पलटवण्याची भाषा केली. भाजपच्या नेत्यांची ही विधाने सत्ता न आल्याने हतबल झालेल्या कार्यकर्त्यांचे महापालिका निवडणुकांकरिता मनोबल वाढवण्याकरिता केलेली आहेत, असाच तूर्त तरी त्याचा अर्थ घ्यायला हवा. मात्र, एक निश्चित आहे की, भाजपने सत्तास्थापनेचे प्रयत्न सोडलेले नाहीत. मोदी-शहा यांना पवार यांच्या सहकार्याने हे शक्य व्हावे, असे वाटत असावे तर राज्यातील भाजप नेत्यांना आजही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करणे हेच स्वीकारार्ह वाटत असावे, असे दिसते. अर्थात याचा निर्णयही चार भिंती, एक दरवाजा आणि बंद कडी याच्याच साक्षीने होईल.