शिक्षेमुळे मुलांच्या मनावर उमटणाऱ्या ओरखड्यांचा, त्यांच्या भावविश्वावर होणा-या परिणामांचा विचार करून शाळांत यापुढे मुलांना छडी न मारण्याचे, कोणतीही शिक्षा न करण्याचे आदेश शिक्षण खात्याने काढले आहेत. शिस्त लावण्याच्या नावाखाली अनेक शाळांत मुलांना कठोर शिक्षा केल्या जातात. त्यातून मुले किती सुधारतात हे ठाऊक नाही; पण त्यांच्या मनात शाळेबद्दल भीती बसते आणि शिक्षेबद्दल नकारात्मक भावना. ज्या कारणासाठी शिक्षा केली आहे, ते समजावून न सांगितल्याने तशाच चुका वारंवार घडतात आणि मुलांकडून चुकांचे, शाळेकडून शिक्षांचे प्रमाण वाढत जाते. हातावर पट्टी मारणे, धपाटा घालणे, वर्गाबाहेर काढणे, बाकावर उभे करणे, उठाबशा काढायला लावणे, अंगठे धरून उभे करणे अशा वेगवेगळ्या शिक्षा मुलांना केल्या जातात. एखादा अभ्यास केला नसेल, तर तो तीन ते पाच वेळा लिहून आणायला सांगितला जातो. कधी भर वर्गात अपमान केला जातो. अशा साºया शिक्षांचा, त्यांच्या परिणामांचा अभ्यास करून राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने शाळेतून शिक्षा हद्दपार करण्याची सूचना केली होती. शिक्षा न करता कसे शिकवावे, यासाठी शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी शाळांना जबाबदार धरले जाणार आहे. खरे तर याबाबत गेले वर्षभर चर्चा सुरू आहे. शिक्षकांच्या क्रौर्याबाबत त्यांना शिक्षा करण्याची तरतूद नसल्याने त्यांनी मुलांना केलेली कोणतीही शिक्षा एकतर्फी होते, असे मत बालहक्काचे संरक्षण करणारे मांडतात. मुले निष्पाप असतात. ती स्वत:हून शिस्तीचे पालन करतात. सध्याच्या काळात त्यांच्यासमोर विरंगुळ्याचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्यांचे लक्ष विचलित होते. त्यातही शिकवण्याच्या पद्धतीत अनेक दोष असल्याने, त्यात रट्टा मारण्यावर भर दिल्याने मुले अभ्यासाचा कंटाळा करतात, अशी मते मांडत अभ्यासासाठी मुलांना शिक्षा करण्यास विरोध केला जातो. वारंवार सांगूनही मुले ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील, दंगा करत असतील तर शिक्षा न करता त्यांना शिस्त कशी लावायची हा शिक्षकांचा प्रश्न आहे. मुले निष्पाप असतात, स्वत:हून शिस्त पाळतात यावर शिक्षकांचे एकमत नाही. त्यामुळे शिक्षा करणाºया शिक्षकांनाच शिक्षा करण्याचा कायदा अस्तित्वात आला; तर शिक्षण संस्था, शाळा, पालक, विद्यार्थी त्याचा दुरुपयोग करतील, हा त्यांचा युक्तिवाद आहे. परिणामी, सारी जबाबदारी पालकांवरही टाकण्याचा प्रयत्न होईल, तोही पुरेसा समर्थनीय नाही. त्यामुळे आताच्या आॅनलाइन, डिजिटल शिक्षणाच्या जमान्यात विद्या घमघम यायची असेल तर शिक्षेशिवाय अन्य पर्याय तपासून पाहावे लागतील. त्यावर चर्चा घडवावी लागेल. शिक्षेविना शिक्षणाचा हा नवा धडा आधी शिक्षकांना आणि नंतर विद्यार्थी-पालकांना गिरवावा लागेल.
छडी न लागे छमछम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 5:15 AM