डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक
जागतिक शेअर बाजारात कालच्या सोमवारी मोठी घसरण झाली. खरे तर गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी हा ‘ब्लॅक मंडे’ होता. मागील शुक्रवारी अमेरिकन बाजार घसरून बंद झाले होते. याचा परिणाम सोमवारी आशिया खंडातील बाजार सुरू होतानाच दिसला. तांत्रिक परिभाषेत सांगायचे तर बाजार गॅप डाऊनने सुरू झाले आणि घसरून खालच्या स्तरावर बंद झाले. जपानचा निकी तब्बल साडेतेरा टक्क्यांनी घसरून बंद झाला. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर झाला. निफ्टी आणि सेन्सेक्स गॅप डाऊनने सुरू होऊन खालच्या स्तरावर व्यवहार करू लागले. शेअर बाजार हा फारच संवेदनशील असतो. नकारात्मक आणि सकारात्मक घटना त्यास खाली आणि वर नेत असतात. एकूणच जागतिक मंदी येणार अशी चर्चा, अस्थिरता, इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती, अमेरिकेतील रोजगार उपलब्धतेची निराशाजनक आकडेवारी, जपानमधील महागाई आणि त्यांच्या येन या चलनात आलेली मोठी घसरण अशी अनेक नकारात्मक कारणे त्या-त्या देशांतील शेअर बाजारांना खाली खेचत आहेत. याचा परिणाम इतर देशांतील बाजारांवर होत आहे.
बाजारांसाठी हे नवीन नाही. अशा बऱ्या-वाईट अनेक घटना बाजार अनुभवत असतो. ‘अमुक लाख कोटी बुडाले’, ‘गुंतवणूकदार तमुक लाख कोटींनी श्रीमंत झाले’ अशा बातम्या आपण वाचतो. खरेतर जे दीर्घकालीन गुंतवणूकदार असतात त्यांची संपत्ती बाजार वाढतो तेव्हा वाढत असते आणि बाजार घसरतो तेव्हा घटत असते. मग नेमके नुकसान आणि फायदा कोणाचा होतो, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. कालच्या सोमवारी बाजार घसरले किंवा अजून घसरतील या भीतीने ज्यांनी शेअर्स नुकसानीत विकले असतील अशा गुंतवणूकदारांचे प्रत्यक्ष नुकसान झाले, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा असे नुकसान फक्त कागदावरच राहते. जेव्हा बाजार सावरतात आणि खरेदीदार येऊन पुन्हा वाढतात तेव्हा नुकसानीत असलेल्या शेअर्सचे भाव वधारतात. पुढे फायद्यातही येतात. जोपर्यंत फायद्यात किंवा नुकसानीत शेअर्स विक्री होत नाही तोपर्यंत असा फायदा आणि तोटा प्रत्यक्ष नसतो. आता जे ट्रेडर्स फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये व्यवहार करतात अशांनाच प्रत्यक्ष फायदा किंवा तोटा सहन करावा लागतो. कारण अशा व्यवहारांना एक्सपायरी डेट असते. बाजार वाढतील या आशेने ज्यांनी ‘कॉल ऑप्शन्स’ घेतले आहेत असे ट्रेडर्स अशा घसरणीच्या काळात बेअरच्या जाळ्यात अडकतात आणि शेवटी नुकसान सहन करून बाहेर पडतात; परंतु हेच पैसे कोणाच्या तरी खिशात जात असतात. ज्यांनी बाजार पडतील या आशेने ‘पुट ऑप्शन्स’ घेतलेले असतात ते मात्र उत्तम फायद्यात राहतात. यातही ज्या-त्या वेळेस फायदा काढून घेणेही महत्त्वाचे ठरते.
यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाढवला आहे. याचबरोबर ऑप्शनमधील व्यवहारांवरील करही वाढविला आहे. ‘सेबी’ने अर्थसंकल्पापूर्वीच एका अहवालात नमूद केले होते की ऑप्शन्समधील व्यवहार करणाऱ्या एकूण ट्रेडर्सपैकी ८९ टक्के नुकसान सहन करून बाहेर पडतात. गेल्या आर्थिक वर्षात हा नुकसानीचा आकडा ५४ हजार कोटींच्या घरात होता. यामागचा उद्देश हाच आहे की, सर्वसामान्य गुंतवणूकदार जुगारी व्यवहार करून अशा अस्थिर बाजारात नुकसानीत जाऊ नये. सोमवारी भारतीय शेअर बाजाराचा संवेदनशील इंडेक्स म्हणजेच इंडिया विक्स चाळीस टक्क्यांनी वाढला. याचाच अर्थ बाजारातील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोठे गुंतवणूकदार होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ऑप्शन्सचा आधार घेत असतात आणि त्यात अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करतात. मोठ्या प्रमाणात ऑप्शन्स खरेदी आणि विक्री यातून निफ्टी आणि सेन्सेक्स संवेदनशील आणि अस्थिर राहतात. शेवटी बाजारातील पैसे एका खिशातून दुसऱ्या खिशात जात असतात. जाणे-येणे सुरू राहते. नफा वसुली केल्यावरही गुंतवणूकदार पुन्हा त्याकडेच वळतात. नफ्याचे पैसे पुन्हा बाजारात येतात. खाली आलेला बाजार पुन्हा वर जाण्यास सज्ज राहतो आणि अमुक तमुक लाख कोटींचा फायदा आणि तोटा हा मोठ्या प्रमाणावर कागदांवरील आकड्यांचा खेळ राहतो.