स्मारक म्हणजे आपल्याकडे प्रतिष्ठतेचा विषय मानला जातो. सरकारवर कर्जाचा कितीही बोजा असला तरी स्मारकांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध केला जातो. आमच्या कार्यकाळात अमूकएक स्मारक झाले हे मिरवण्यासाठीही खटाटोप केला जातो. अशीच काहीशी धडपड शिवसेनेची सुरू आहे. बाळासाहेबांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे परकोटीचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.बाळासाहेबांचे निधन होऊन ५ वर्षे होतील, आणि आता कोठे स्मारकाची जागा निश्चित होत आहे. जागा निश्चित करण्यासाठी महापौर निवास शिवाजी पार्क येथून भायखळा येथील राणीच्या बागेत स्थलांतरीत केले जाणार आहे.
राणीची बाग म्हणजे प्राणी संग्रहालय. संग्रहालयाच्या जागेत आता महापौर राहायला जाणार आहेत. अखेर बाळासाहेबांचे स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला, असे म्हणण्यास तूर्त हरकत नाही. मुंबईसारख्या शहरात स्मारकासाठी जागा मिळणे तशी अवघड गोष्ट होती. त्यामुळे या स्थलांतरावरून बराच वाद रंगला होता. मुळात बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आधी शिवसेनेला जागाच मिळत नव्हती. शिवाजी पार्क येथील कोहीनूर मिलच्या जागेवर हे स्मारक व्हावे अशी चर्चा रंगली. स्मारकासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी जागा देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपप्रत्यारोपांचा फड रंगला. त्यानंतर महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचाही विचार झाला. पण तेथे देखील अडथळे आले. अखेर शिवाजी पार्क येथील भव्य महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी निश्चित करण्यात आली. समुद्र किनारी व उच्चभ्रू, प्रतिष्ठीत लोकवस्तीत असलेला बंगला सोडण्यास शिवसेनेचे महापौर तयार होत नव्हते़. हा मुद्दा म्हणजे सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील खडाजंगीचा ठरला. राणीच्या बागेतील जागा शिवाजी पार्कच्या तुलनेत अगदी दुय्यम, रात्रीच्या वेळेस पूर्णपणे निर्जन, सोयीची नाही, असे सर्व प्रश्न उभे राहिले.
स्मारक तर झालेच पाहिजे, तेही सत्ता असेपर्यंत या एका विवंचनेत असलेल्या शिवसेनेला मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यात भाजपासोबतच युती असूनही एकमेकांवर टीकांचे सत्र सुरूच होते़ एकमेकांना कमी लेखण्याची एकही संधी या दोन्ही पक्षांनी सत्तेत आल्यापासून सोडली नाही. गेल्या काही दिवसांत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. चलो अयोध्या अशी बॅनर बाजी सुरू केली. या बॅनरबाजी प्रत्युत्तर म्हणजे नारायण राणे व अजित पवार यांनी टोला हाणलाच. बाळासाहेबांचे स्मारक बांधू शकत नाहीत आणि राम मंदिर बांधायला निघालेत, अशी टीका या दोन्ही नेत्यांनी केली. ही टीका बहुतेक शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागली असावी. कारण त्यानंतर महापौर निवास स्थलांतरीत होत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले तरी शिवसेनेला सत्तेचा कार्यकाळा संपेपर्यंत हे करावेच लागेल. कारण सत्ता गेल्यानंतर नवीन सत्ताधाऱ्यांची स्मारकासाठी मनधरणी करावी लागेल. विनवणीचा पदर पसरावा लागेल. हे सर्व टाळण्यासाठी शिवसेनेला महापौर निवास स्थलांतरीत करावेच लागेल. हीच तत्परता मुंबईच्या विकासाठी सत्ताधाऱ्यांनी दाखवली तर नक्कीच मुंबई अधिक प्रगतशील होऊ शकेल. स्मारकाला विरोध नाही, पण विकासही हवा हेही सत्ताधाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवे.