दिलीप वसंत बेतकेकर, शिक्षणतज्ज्ञकल करे सो आज कर, आज करे सो अभी। लहानपणापासून आपण हे मोठ्या मंडळींकडून सतत ऐकत आलो आहोत. मोठे झाल्यावर लहानांना पण हे सतत सांगत आलो आहोत, पण प्रत्यक्ष त्याप्रमाणे आचरण करणारे विरळाच. इतरांचे सोडा, आपण आपल्या मनाने ठरवलेल्या (इतरांनी सांगितलेली नव्हे) गोष्टी, कामं तरी वेळच्यावेळी पूर्ण करतो का? अनेक कामं आपण ठरवतो; अगदी साधी, सोपी, छोटी कामं. ती आपल्यावर कोणी लादलेलीही नसतात. तरीही ती ठरल्यावेळी, ठरल्याप्रमाणे करतोच असं नाही. काही ना काही निमित्त काढून आणि अनेकवेळा निमित्त नसतानाही पुढे ढकलली जातात. असं अळंटळं करता करता अनेक छोटे प्रश्न अक्राळ विक्राळ रूप धारण करतात आणि प्रचंड धावपळ, आटापिटा केला जातो.
ही असते केवळ चालढकल. इंग्रजीत यासाठी एक मोठा आणि भारदस्त शब्द आहे- Procrastination. (प्रोक्रॅस्टीनेशन) बहुसंख्य माणसं चालढकल करत असतात. A stitch in time saves nine असं म्हणतात. वेळच्या वेळी फाटलेल्या ठिकाणी टाका घातला तर पुढचं नुकसान टळतं. हे कळतं, पण वळत नाही. अलिकडे व्यावसायिक लोकांसाठी व्यवस्थापकीय कौशल्ये शिकवण्यासाठी भरपूर कार्यशाळा होत असतात. भरपूर शुल्क भरून मंडळी या कार्यशाळांना जातात. कार्यक्षमता, योजना कौशल्य वाढावं, असा या कार्यशाळांचा हेतू असतो. त्यात जे अनेक विषय मांडले जातात त्यात 'चालढकल' कशी टाळावी हेही शिकवलं जातं. काम पूर्ण केल्यामुळे जो शीण येतो त्यापेक्षा खरं तर अधिक शीण तेच काम वारंवार पुढे ढकलल्यामुळे येतो. एक छोटीशी, सुंदर इंग्रजी कविता आहे. त्या कवितेतली व्यक्ती म्हणते (तो आता बालक आहे) मी मोठा झाल्यावर सुखी होईन. मोठा होऊन शाळा कॉलेजमध्ये जाऊ लागल्यावर त्याला वाटतं हे शिक्षण संपून मी नोकरीला लागलो की मग मी सुखी होईन, नोकरीला लागल्यावर तो म्हणतो लग्न झाल्यावर खऱ्या अर्थाने सुखी होईन. मग लग्न होतं. तो पुढे म्हणतो, मुलं झाल्यावर मी सुखी होईन. मुलं होतात, मग त्याला वाटतं मुलांचं शिक्षण, नोकरी झाली की मी जबाबदारीतून मोकळा होईन आणि आनंदाने जगेन. मुलांचं शिक्षण होतं, ती नोकरीला लागतात, स्थिरस्थावर होतात. त्याला वाटतं एकदा का मी नोकरी धंद्यातून निवृत्त झालो की अवघा आनंदी आनंद. पण कुठचं काय? निवृत्तीनंतरही नाही सुख, नाही आनंद. आता आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर आल्यावर त्याला जाणीव होते 'जगता जगता जगायचंच राहून गेलं.' चालढकल करताना त्याचं समर्थनही करण्यात लोक पटाईत असतात. कोणी म्हणतो मी विषयांचा, प्रश्नाचा, कामाचा अभ्यास करतोय, विश्लेषण करतोय, दिवसामागून दिवस 'अभ्यास' (?) करण्यातच जातात. शिव खेरा या रोगाला 'पॅरलिसीस ऑफ अॅनालिसीस' म्हणतात. अभ्यास, विश्लेषण कामात मदत करतात, पण कृती न करता केवळ अध्ययनच करत राहिलं तर काम कधीच पूर्ण होत नाही. संत कबीर सांगतात- मारग चलते जो गिरै, ताको नाही दोष। कहे कबीर बैठा रहै, ता सिर करडै कोस। (मार्ग चालता चालता कुणी पडला तर तो त्याचा दोष नाही, पण जो आळसाने बसून आहे त्याचा मार्ग मात्र कठीण आहे.) 'द पॉवर ऑफ नाउ' (now), हे एक गाजलेलं पुस्तक. आत्ताचा क्षण (now) सर्वात महत्त्वाचा. मागचा क्षण हातातून गेलेला असतो. येणाऱ्या क्षणाची काही खात्री देता येत नाही. आत्ताचा क्षणच आपल्या हातात, त्याचा सुंदर उपयोग करायला हवा. हे आत्ताच्या क्षणाचं भानच सर्वात महत्त्वाचं. समर्थ रामदास तर व्यवस्थापन शास्त्राचे तज्ज्ञच. ते म्हणतात - कोणी ये काम करिता होते न करिता ते मागे पडते। याकारणे ढिलेपण ते असोचि नये ।
एखादं काम 'नंतर करू' असं म्हणून बाजूला ठेवलं तर ते हळूहळू इतकं बाजूला आणि मागे पडतं की नंतर ते दिसतही नाही आणि आठवतही नाही. ही ढिलाई, ढिलेपण खूप मारक ठरतं. इंग्रजीत 'इटींग द फ्रॉग' (बेडूक) असा वाक्य प्रयोग आहे. व्यवस्थापन शास्त्रात याचा खूप वापर होतो. आपल्यासमोर अनेक कामं असतात. काही साधी, सरळ, सोपी, तर काही कठीण, किचकट, क्लिष्ट. सर्वात अवघड, क्लिष्ट काम सर्वप्रथम निपटायचं असा 'इंटींग द फ्रॉग'चा अर्थ. एकदा हे अवघड काम हातावेगळं झालं की पुढची कामं लवकर आणि सुकर होतात. कामांचा विचार जरूर करावा, नियोजन करावं. पण दिवसामागून दिवस आणि आठवड्यामागून आठवडे फक्त विचार आणि नियोजन करण्यातच घालवले तर हाती येईल फक्त भोपळा. म्हणून म्हणतात -
Plan your work and work out your plan 'कल्पना करी उदंड काही। प्राप्तब्ध तो काहीच नाही', समर्थांचा इशारा ध्यानात ठेवायला हवा. हा 'चालढकल' या विषयावर शेफिल्ड विद्यापीठात फ्यूशिया सिरॉईस यांनी पंधरा वर्षं अध्ययन केलं, त्यांना आढळलं की, कामे पुढे ढकलण्यामागे भावनांचा मुद्दाही असतो, आपण अपयशी होऊ या भीतीनेही कामं पुढे ढकलली जातात. हे एक दुष्टचक्र आहे. ज्याने हे भेदले तो जिंकला. चालढकल केल्यामुळे वेळ तर वाया जातोच, त्याच्याच जोडीला मानसिक आणि शारीरिक त्रासही होतात. टालमटोल की आदतें, छोड रे मानव अनजान। टालमटोल में समय घटे, व्यर्थ रहे परेशान । मग काय करायची ना आजची कामं आजच !