- बाबू मोशाय
एकेकाळी ‘नमश्कार बहनो और भाईयों, मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ’ असे शब्द रेडिओवर ऐकले, की आम्ही मुले अंगणात खेळत असलो, तरी धावत धावत घरी यायचो... बिनाका गीतमालात ‘वेगवेगळ्या पायदान’वर वाजणारी केवळ गाणीच नव्हे, तर हा कार्यक्रम सादर करणारे अमीन सयानी आम्हाला घरी यायला भाग पाडायचे... त्यावेळी ट्रान्झिस्टरपेक्षा रेडिओचे दिवसच होते आणि घरोघरी मोठ्याने तो लावलेला असे. त्यामुळे शाळेत जातानाही रस्त्यावर ‘कामगार सभा’ ऐकतच आम्ही जात असू.. ‘बिनाका’मध्ये त्यावेळी गाणे समाविष्ट झाले की, ते आपोआप लोकप्रिय होत असे. पहिली पायदान, दुसरी पायदान, सरताज गीत अशी त्याची क्रमवारीही लावली जात असे. बिनाकात गाणे लागले आहे याचा अर्थ ते उत्तमच आहे, असे समजले जाई. या कार्यक्रमात आपले गाणे यावे म्हणून संगीतकारांमध्ये चुरस असायची. शाळेत असताना पडोसन, शागिर्द, आया सावन झुमके, मिलन अशा चित्रपटांतील गाणी बिनाकातूनच ऐकली. त्यांचे वर्णन अमीनभाई ज्या पद्धतीने करत आणि कार्यक्रमाची उत्सुकता व रंगत वाढवत, त्यामुळे आम्ही रेडिओला चिकटलेले असू. संगीततज्ज्ञ अशोक रानडे हे पूर्वी आवाजाच्या कार्यशाळा घेत असत. त्यांचेही अमीनभाई हे अत्यंत लाडके निवेदक होते. आवाजातील चढ-उतार, लय आणि त्याचे प्रोजेक्शन याबाबतीत अमीनभाईंना तोड नव्हती. १९५४ ते १९९४ पर्यंत ‘बिनाका गीतमाला’नंतर ‘सिबाका गीतमाला’, ‘कोलगेट सिबाका संगीतमाला’ ही रेडिओ सिलोन व आणि नंतर विविध भारतीवर चाले. १३ डिसेंबर १९७७ रोजी ‘बिनाका गीतमाला’ने मुंबईला एका मेळाव्यात आपला वर्धापन दिन साजरा केला, त्यास अनेक आघाडीचे संगीतकार, गीतकार आणि गायक हजर होते.
अमीनभाई हे सज्जन आणि अत्यंत सुसंस्कृत गृहस्थ! त्यांच्या आवाजाइतकीच त्यांच्या स्वभावातही कमालीची ऋजुता होती. थोडे जरी नाव झाले, तरी अंगात वारा भरल्यासारख्या वासरागत लोक टणाटणा उड्या मारू लागतात; परंतु, देशविदेशांत इतके नाव असूनदेखील अमीनभाईंच्या वागण्याबोलण्यात अहंकाराचा कणभरही दर्प नव्हता. अमीनभाईंची आई म्हणजे कुलसुमबेन. महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार त्या ‘रहबीर’ या नवसाक्षरांसाठी हिंदी, उर्दू आणि गुजराती भाषेत निघणाऱ्या पाक्षिकाचे संपादन करीत. या कामात अमीनभाई त्यांना मदत करीत असत. साध्या, सोप्या भाषेत कसे लिहावे, याचे प्रशिक्षण अमीनभाईंना त्या कामातून मिळाले. त्यामुळेच ते श्रोत्यांशी एखाद्या मित्राप्रमाणे संवाद साधण्यात यशस्वी ठरले. अमीनभाईंचे आजोबा हे गांधीजी आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे डॉक्टर होते. मुंबई प्रांतात तत्कालीन काँग्रेस सरकारने जी राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन केली होती, त्याच्याशी कुलसुमबेन संबंधित होत्या. अमीनभाई या वातावरणात वाढले आणि त्यामध्ये त्यांनी खारीचा वाटादेखील उचलला.
भारतात रेडिओचे श्रवण करणाऱ्यांची संख्या वाढण्यात आणि हिंदी चित्रपटसंगीत लोकप्रिय करण्यात अमीनभाईंचा मोठा वाटा आहे. कारण ते एखादे गाणे, गायक-गायिका अथवा संगीतकार आणि गीतकाराबद्दल बोलायचे, तेव्हा लोक कान देऊन ऐकत असत. त्यांचा उदार, प्रेमळ आणि आश्वासक आवाज लोकांना एखाद्या अत्तराच्या कुपीत जपून ठेवावा, असे वाटे... त्यांचा गद्यातला आवाज हाच जणू पद्य बनून येत असे...
अमीनभाई आधी इंग्रजीत कार्यक्रम करायचे. ऑल इंडिया रेडिओ लोकप्रिय करण्यात अमीनभाईंचा सिंहाचा वाटा आहे. भूतबंगला, तीन देवीयाँ, बॉक्सर, कातील वगैरे चित्रपटांत अमीनभाई रेडिओ निवेदकाच्या भूमिकेत स्वतः दिसले होते. अमीनभाई हे १९६० ते ६२ या काळात टाटा ऑइल मिल्समध्ये ब्रँड एक्झिक्युटिव्ह होते. हमाम आणि जय या साबणांची जाहिरात करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. अमीनभाईंनी ५४ हजार रेडिओ कार्यक्रमांत भाग घेतला किंवा ते निर्माण केले. लिमका बुक ऑफ रेकॉर्डप्रमाणे अमीनभाईंनी १९ हजार जिंगल्स निर्माण केल्या व त्यात त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. १९५२ साली अमीनभाईंनी ‘रेडिओ सिलोन’मध्ये प्रवेश केला आणि ‘बिनाका’मुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. पूर्वी फिल्मफेअर सोहळ्याच्या डॉक्युमेंटरीज तयार होत असत. एका डॉक्युमेंटरीत बडे बडे कलाकार या सोहळ्यास येत असतानाची अवखळ स्वरातील व मजेदार ढंगातील अमीनभाईंची कॉमेंट्री अजूनही आठवते.
अमीनभाईंचा आवाज नसता, तर माझ्यासारख्या असंख्य लोकांचे बालपण आणि तरुणपण बहारदार झाले नसते. अशी सुसंस्कृत आणि छान माणसे अलीकडे फार अपवादानेच भेटतात.. अमीन सयानींच्या जाण्याने आवाजाची दुनिया पोरकी झाली आहे.. त्यांना माझी श्रद्धांजली.