संपादकीय: तवा आणि भाकरी! राष्ट्रवादी काँग्रेसमधील चलबिचल अन् पवारांचे अचूक गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 08:31 AM2023-06-12T08:31:24+5:302023-06-12T08:32:06+5:30
अजित पवार यांनाही माहीत आहे की, तवा साहेबांचा आहे. त्याचा वापर कसा करायचा, हे ते जाणतात.
तव्यावरील भाकरी फिरवली नाही की करपते, हे वाक्य ज्यांनी सुप्रसिद्ध केले ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घरचा तवा आणि घरचीच भाकरी परतवली आहे. काँग्रेसमधल्या नेतृत्वाच्या वादातून पक्षाबाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्याला पंचवीस वर्षे झाली. या काळात पक्षाचे नेतृत्व अध्यक्ष म्हणून त्यांनी कायम स्वत:कडे ठेवले. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल चालू झाली. घरचाच तवा अन् भाकर तक्रार करू लागली. आता ही भाकर फिरवली नाही तर करपणार आणि आपल्याही हाताला चटके बसणार, याची जाणीव झालेल्या चाणाक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेतृत्व सोडून देण्याची घोषणा केली. तो खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपच होता. त्याने घरच हादरून गेल्यावर तवा अन् भाकरीची गोष्ट कोण काढणार? सारे एका ओळीत आले आणि पवार साहेबांशिवाय आपले अस्तित्वच नाही, याची जाणीव सर्वांनाच झाली. त्या वातावरणाच्या निर्मितीचे जनक स्वतः पवारच होते.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पंचविशीत प्रवेश करताना खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. आता अजित पवार यांचे काय? हा प्रश्न विचारला जाऊ लागला. वास्तविक तवा अन् भाकर घरचीच असल्याने अजित पवार यांचे काय? ही काळजी प्रसारमाध्यमांनी करायची गरज नव्हती. मात्र, बहुतेकांना पवारांचा तवा एकीकडे आणि भाकरी दुसरीकडे अशी अवस्था पाहण्याची इच्छा असल्याने ही चिंता पडली असावी. अजित पवार महाराष्ट्राच्या पातळीवर काम करत राहणार आणि वेळ येताच तेच नेतृत्वही करणार, हे स्पष्ट आहे. पक्षाचे देशपातळीवर नेतृत्व करण्याची वेळ येताच सुप्रियाताई पदर खोचून तयारच असणार, हेच पवार यांनी स्पष्ट केले आहे. प्रफुल्ल पटेल सोबत करणारे आहेत. त्यामुळे पवार यांनी अस्वस्थ झालेल्या आमदार-खासदार तथा नेत्यांना स्पष्ट आश्वासित करून टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता तो गेला आणि पुन्हा मिळेलदेखील! हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील मैलाचा दगड आहे. त्याला ओलांडताना विचार करावाच लागणार आहे. अन्यथा पुढे जातो म्हणणाऱ्यांची दिशा चुकू शकते. शरद पवार ही एक विचारशक्ती आणि ताकद आहे.
गेल्या पाच दशकांची त्यांची मेहनत आहे. एकही दिवस वाया न घालविता त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण केले आहे. एकवेळ भाकरी नीट भाजली जाणार नसेल तर ती करपून टाकण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यातून त्यांची वैचारिक बैठक ही जमेची बाजू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर वाढण्यास मर्यादा आहेत. ती जबाबदारी घेऊन काम करण्याची कोणत्याही नेत्याची तयारी नाही. खासदार पदासाठी लढता का? अशी विचारणा करताच विद्यमान आमदार तोंड लपवून बसतात. वास्तविक महाराष्ट्र पातळीवर शरद पवार यांनी नेत्यांची एक मोठी फळी निर्माण केली. मात्र, त्यांची उंची वाढत नाही. त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर पडायचेच नाही आणि तरीदेखील आपला पक्ष राष्ट्रीय झाला पाहिजे, अशी भाषा मात्र चालू असते. या नेत्यांना पवार यांच्या माघारी महाराष्ट्रातही विस्तार करता येत नाही. ती धमक केवळ छगन भुजबळ, आर. आर. पाटील आणि अजित पवार यांच्यातच. त्यामुळेच भुजबळ यांना चौकशांच्या फेऱ्यात अडकविले गेले. आर. आर. आबा यांचे दुर्दैवाने निधन झाले आणि अजित पवार यांच्यात तशी धमक आहे. त्यांनी पुणे आणि नगर जिल्ह्यांत मागील विधानसभा निवडणुकीत धमाका केला, तर त्यांनाही बेजार करण्याचा उद्योग भाजप करत आहे. भाजपच्या इशाऱ्यावरच प्रसारमाध्यमेही अजित पवार यांना उचकवत असतात. ते स्पष्ट बोलत असल्याने एका बातमीचे चार अर्थ काढण्यात येतात. मात्र, अजित पवार यांनाही माहीत आहे की, तवा साहेबांचा आहे. त्याचा वापर कसा करायचा, हे ते जाणतात. महाराष्ट्र हाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आधार आहे. तेथेच पक्ष कसा वाढेल, यासाठी पक्ष नेतृत्वाने अधिक काळजी घेतली पाहिजे. राज्यपातळीवरील नेत्यांना दिल्लीला पाठवून नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे अन्यथा भाकरी करपणारच आहे. बदलत्या काळाची आव्हाने पेलावी लागणार याचे भान शरद पवार यांना असेलच असेल. त्यासाठी पवार यांनी थोडी तयारी केली आहे, असे वाटत असले तरी मोठा बदल अपेक्षित आहे! आहे तेवढाच तवा अन् तीच भाकर पुरणारी नाही.