भारताने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल गमावली. संघाचे कुठे चुकले, याचा खल सुरू झालाय. भारत सातत्याने आयसीसी ट्रॉफीमध्ये बाद फेरीत का ढेपाळतो, याची कारणे शोधली जात आहेत. २०१३ नंतर दहा वर्षांत आठवेळा बाद फेरीत स्थान मिळविले, त्यापैकी चारवेळा फायनल खेळले तरी एकही जेतेपद वाट्याला का येऊ नये? दशकभराचा दुष्काळ संपविण्याची संधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी पराभव केला अन् स्वप्न धुळीस मिळाले, विराट कोहलीकडूनही क्रिकेटप्रेमींना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यानेही निराशा केली. भलेही टीम इंडिया जिंकणार नाही, याची खात्री झाल्यानंतर सामना अनिर्णित कसा राहील, याचा प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, तसेही झाले नाही. भारतीय संघाकडून कोणत्याही प्रकारे लढा दिल्याचे दिसून आले नाही.
अतिशय स्वस्तात फलंदाज बाद झाले आणि शेवटच्या फळीतील फलंदाजांकडून कोणत्याही प्रकारे अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. कर्णधार रोहित शर्मा ते चेतेश्वर पुजारा 'येरे माझ्या मागल्या सारखे बाद झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून रोहितचा फॉर्म हे टीम इंडियासाठी चिंतेचे कारण ठरत आहे. हा पराभव चाहत्यांच्या, क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. कधी भारतीय संघ उपांत्य फेरीत हरतो, तर कधी फायनलमध्ये पोहोचल्यानंतर निराशा करतो. नेहमीप्रमाणे एक-दोन खेळाडू खेळतात आणि बाकीचे हजेरी लावून जातात, असे चित्र कायम होते. 'तुम्ही फक्त आयपीएलमध्येच चमकता, बाकीच्या स्पर्धामध्ये तुम्हाला काही खेळता येत नाही. हे तुम्हीच दाखवून दिले,' असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पाचव्या दिवशी किमान १० षटके खेळायची होती. हातात सात विकेट्स होत्या आणि 'फक्त' २८० धावा हव्या होत्या! या आकडेवारीसमोर भारतीय क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. अनुभवी खेळाडूंनी जबाबदारी उचलली असती तर ही वेळ आली नसती. संघात नामवंत खेळाडू आहेत. त्यांनी मोठ्या सामन्यात जबाबदारी उचलली पाहिजे.
इतरवेळी तुम्ही किती धावा करता, विक्रम करता हे एका बाजूला, पण आयसीसी, आशिया चषकासारख्या मोठ्या सामन्यात जर तुम्ही उच्च कोटीची कामगिरी करत नसाल तर तुमच्या या विक्रमांचा काहीच फायदा नाही. याला आयपीएल जबाबदार आहे काय? कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलचे नियोजन आयपीएलनंतर जून महिन्यात होते. तयारीसाठी किमान २० दिवस मिळायला हवे होते काय? या प्रश्नांची उत्तरे तेव्हाच मिळतील, जेव्हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडतील. भारतीय क्रिकेट बोर्डाला ठरवावे लागले की, पुढील मार्ग कसा तयार करायचा आहे. यासाठी आयपीएलमधील संघांसोबत चर्चा करावी लागले. आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघांसाठी वेगळे नियम करावे लागतील. भारतात संघाच्या तुलनेत खेळाडूंवर वैयक्तिक फोकस करण्याचा प्रकार अपयशाचे प्रमुख कारण ठरते. बरेच लोक हे बोलणार नाहीत, पण हे खरे आहे. हेही जगासमोर यायला हवे.
आपल्या देशाला कोणत्याही संघाचे वेड नाही, तर वैयक्तिक खेळाडूंचे वेड आहे. इथे खेळाडूला संघापेक्षा मोठे मानले जाते. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे देश सांघिक कामगिरीवर फोकस करतात. म्हणूनच आपण बऱ्याच काळापासून आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. उदाहरणार्थ तीन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असेल तर त्यांचेच कौतुक सुरू असते. तो सामना त्यांच्यामुळेच जिंकला, असे लोकांना वाटते, पण हा सांघिक खेळ आहे. भारतीय फलंदाजांनी ४४४ धावांचा पाठलाग करताना लागणारी इच्छाशक्ती तर दाखवली, मात्र सामना केवळ इच्छाशक्तीवर जिंकता येत नाही. भारताने या सामन्यात अनेक चुका केल्या. त्यामुळे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दर्जेदार फलंदाजी पाहता विजयाचा चमत्कार भारतीय संघ करू शकला असता. त्या दृष्टीने भारतीय फलंदाजांनी सुरुवातदेखील केली होती. मात्र, एकाही फलंदाजाला मोठी शतकी खेळी करण्यात यश आले नाही. दोन फलंदाजांनी शतकी खेळी केली असती तर कदाचित सामना जिंकून इतिहास रचता आला असता. खेळपट्टीवर चेंडू असमान उसळतोय किंवा खूप फिरतोय असे काहीही दिसले नाही. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अश्विनला अंतिम एकादशमधून वगळण्याचा निर्णय काही समजलाच नाही. 'टीम इंडिया'ने इतिहास रचण्याच्या आशेवर असलेल्या तमाम भारतीयांची पुन्हा एकदा निराशा केली.