राजकारणी मंडळी उत्तम संघटक असतात, हे मान्य. मात्र, या संघटकांनी विविध क्रीडा संघटनांमध्ये पदाधिकारी होऊन राजकीय गोंधळ घालण्याचे उद्योग सुरू केल्याने त्या खेळांची आणि खेळाडूंची अधोगती होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय कुस्ती क्षेत्रात मस्ती करणारे राजकारणी । भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह या भाजपच्या खासदार महाशयांवर महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने गेली सहा महिने कुस्तीचे मैदानच काळवंडले आहे. त्याचे परिणाम आता जागतिक पातळीवर जाणवू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके पटकावण्याचा भारतीय पहिलवानांचा टक्का वाढत असताना बृजभूषण शरणसिंह यांच्या कृष्ण कृत्यांनी क्रीडा क्षेत्रच हादरले आहे.
भारतीय कुस्तीपटूंनी गेल्या १८ जानेवारी रोजी लैंगिक शोषणाविरुद्ध आंदोलन छेडले. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदक विजेत्या कुस्तीपटूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप करून आंदोलन पुकारले तेव्हा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तातडीने त्याची दखल घेणे आवश्यक होते. शिवाय भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी लावणेही गरजेचे होते. उत्तर प्रदेशाच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जाणारे बृजभूषण शरणसिंह यांना वाचविण्यासाठी कुस्ती क्षेत्रातील भारताची प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली. पुढे डोक्यावरून पाणी गेले, तेव्हा बृजभूषण यांना बाजूला केले गेले मात्र पर्यायी व्यवस्था उभी करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून अस्थायी समिती नियुक्त करण्यात आली तरी या समितीचे प्रमुख तसेच विविध प्रांतातील महासंघाशी संलग्न संघटनांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक कशी लांबणीवर पडेल, यासाठीची कारस्थाने चालू ठेवली. आंध्र प्रदेश, आसाम, हरयाणा आदी प्रांतीय संघटनांनी निवडणूक प्रक्रियेवर वारंवार याचिका दाखल करून आव्हाने दिली. गेल्या १२ ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीला पंजाब- हरयाणा उच्च न्यायालयाने आदल्या दिवशी स्थगिती दिली. दरम्यान, आगामी आशिया चषक कुस्ती स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धा पुढील महिन्यात होऊ घातल्या आहेत. या स्पर्धेत उतरून पात्रता पूर्ण करणाऱ्या कुस्तीपटूंना ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेता येणार आहे.
बरखास्तीनंतर ४५ दिवसांत भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक घेण्याची अट पूर्ण करण्यात न आल्याने जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघास निलंबित केले आहे. परिणामी आगामी विश्वचषक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना भाग घेता येईल मात्र भारताचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. कुस्ती महासंघातील नीच पातळीवरील राजकारणामुळे भारताची नाचक्की होण्याची वेळ आली, तरीदेखील संबंधित पदाधिकाऱ्यांना शरम वाटत नाही. कुस्ती हा क्रीडा प्रकार मस्ती अंगी बाणवण्याचा आहे, मस्ती करण्याचा नाही. केंद्र सरकारने अशा पदाधिकाऱ्यांना खड्याप्रमाणे बाजूला करून क्रीडा क्षेत्रातील उत्तम संघटकांच्या हाती असे महासंघ राहतील, याची दक्षता घ्यायला हवी. राष्ट्रीय, आशिया किंवा जागतिक पातळीवर गाजणाऱ्या क्रीडा स्पर्धेत प्रत्येक देशाची प्रतिष्ठा पणाला लागते. या स्पर्धा सर्व प्रकारच्या दोषांपासून दूर ठेवून पारदर्शी व्हाव्यात यासाठी अखंड प्रयत्न होत असताना भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे वागणे लज्जास्पद आहे. ज्यांना बाजूला करून महासंघाची निवडणूक व्हावी, नवे पदाधिकारी पुढे यावेत, यासाठी होणाऱ्या निवडणुकाच रोखण्याचा प्रकार संतापजनक आहे. राजकारणी संघटक म्हणून उत्तम असतीलही पण त्यांच्यातील दुष्ट राजकारणी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, स्वार्थ आणि गैरवर्तनाने बरबटलेले असतात. त्यांना रोखणारी अत्यंत कडक आचारसंहिता तयार करायला हवी.
बृजभूषण शरणसिंह यांनी कुस्ती महासंघातच नव्हे, तर सार्वजनिक जीवनातही अनेक प्रकारचे कारनामे केलेले आहेत. अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडे खेळाडूंचे भवितव्य सोपविणे हा किती मोठा अपराध आहे. भारतीय कुस्तीपटू आपला प्रिय तिरंगा घेऊन जागतिक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत, याची पूर्व कल्पना असतानाही या निवडणुकांना खो घालण्यात आला. या अवसानघातकी राजकारणामुळे संपूर्ण आयुष्य पणाला लावून स्पर्धेची तयारी करणाऱ्या कुस्तीपटूंना किती वेदना होत असतील, याचा विचार केलेला बरा! अशा पदाधिकाऱ्यांची मस्ती जिरवणे आणि क्रीडा क्षेत्र पारदर्शी करणे अत्यंत आवश्यक आहे.