गुऱ्हाळ थांबेना; ‘जागावाटपा’चा तिढा सुटेना!

By यदू जोशी | Published: February 23, 2024 10:35 AM2024-02-23T10:35:36+5:302024-02-23T10:36:06+5:30

युती सरकारमधला मोठा भाऊ भाजपकडून उर्वरित दोन लहान भावांना जागा खेचून आणायच्या आहेत आणि महाविकास आघाडीत तर फारच मोठा ताप!

Editorial articles seat allocation of Lok Sabha election parties has not been done yet | गुऱ्हाळ थांबेना; ‘जागावाटपा’चा तिढा सुटेना!

गुऱ्हाळ थांबेना; ‘जागावाटपा’चा तिढा सुटेना!

यदु जोशी सहयोगी संपादक, लोकमत

महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच काही माध्यमांनी या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. महाविकास आघाडीबाबतदेखील तेच केले जात आहे. हे जे फॉर्म्युले येत आहेत, ते निवडणूक अंदाजाप्रमाणे खोटे ठरतील. पूर्वी पक्ष जागावाटपाचे काय ते ठरवायचे आणि माध्यमांना सांगायचे. आता उलटे झाले आहे. वास्तविकता ही की, अजून काहीही ठरलेले नाही. चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जागांबाबत एकमेकांशी अनौपचारिक बोलले आहेत तेवढेच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर गेले होते, तिथे जागावाटपाची चर्चा झाल्याचे पसरविले गेले पण त्यात  तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात होणाऱ्या सभांविषयी थोडी चर्चा झाली. पुढच्या आठवड्यात जागांची चर्चा सुरू होईल, असा अंदाज आहे. 

सत्तेतील तीन पक्षांसाठी जागा वाटून घेण्याचे काम तितके सोपे नाही. मोठा भाऊ भाजपकडून दोन लहान भावांना जागा खेचून आणायच्या आहेत. समोर मोदी-शाह-फडणवीस आहेत. सत्तांतराच्या वेळी शिंदे त्यांच्या आमदारांना म्हणाले होते, चिंता करू नका, आपल्या पाठीशी महाशक्ती आहे. आता जागा खेचून आणण्यासाठी त्यांना याच महाशक्तीशी झगडावे लागणार आहे. कधीकधी विरोधकांपेक्षा मित्रांशी लढणे कठीण असते. बाका प्रसंग असला की ऐनवेळी ताप येणारे अजितदादा जागावाटपाच्या चर्चेवेळी तरी तंदुरुस्त असतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर त्यांच्या बाजूने प्रफुल्ल पटेल यांनाच किल्ला लढवावा लागेल. हिंदी, इंग्रजी नीट येणारे त्यांच्या पक्षात ते एकटेच नेते आहेत. 
आघाडीपेक्षा युतीमध्ये जरा शिस्त दिसते असे वरवरचे चित्र आहे, पण ते पूर्ण खरे नाही. काकांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी स्वत:चे अस्तित्व दाखविण्याची संधी म्हणून अजित पवार या लोकसभा निवडणुकीकडे पाहत असतील तर त्यांना समाधानकारक संख्येत जागा लढवाव्या लागतील तरच पुढची काही संधी असेल. लोकसभेसाठी भाजपच्या सर्व अटी शर्ती मान्य करायच्या आणि विधानसभेसाठी जागांचा वाटा वाढवून घ्यायचा असे काही त्यांच्या मनात असेल तर भाग वेगळा, पण ‘कल किसने देखा?’... विधानसभेला सध्याचेच राज्याचे राजकीय चित्र कायम राहील, याची गॅरंटी काय? मोदींची गॅरंटी असेल तर भाग वेगळा.

दुसरीकडे भाजप आपल्याला किती जागा लढायला देईल याची चिंता त्यांना सतावत आहे. शिंदेंचे खासदार असलेल्या काही जागांवर भाजपचा डोळा आहे. महायुतीतील तीन पक्षांमध्ये वादाचे विषय ठरतील असे मतदारसंघ लिहून घ्या - रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, परभणी, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, शिर्डी, सातारा, माढा, उत्तर-पश्चिम मुंबई. नाशिकमधील तिढा सगळ्यात शेवटी सुटेल. भाजप या जागेसाठी खूपच आग्रही राहील. ‘नाशिक तुम्ही घेत असाल, तर धुळे आम्हाला सोडा’ असा दबाव शिवसेनेकडून आणला जाईल. माढामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर या अनुक्रमे भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना असलेला प्रचंड विरोध ही महायुतीसाठी मोठी डोकेदुखी आहे. या भांडणात ‘ही जागा आम्हाला द्या’ म्हणून अजित पवार दबाव आणतील. स्थानिक सरदारांच्या वादातील आणखी दोन-तीन जागा आहेत. रामटेकची जागा भाजपला हवी आहे आणि नाहीच दिली तर शिवसेनेचा उमेदवार बदलून पाहिजे असल्याची माहिती आहे. ठाणे, भिवंडी भाजपला आणि कल्याण-डोंबिवली व पालघर शिवसेनेला असा तोडगा निघू शकतो. सोलापूरचा उमेदवार ठरविणे हे भाजपसमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे.

महाविकास आघाडीत तर अधिकच ताप आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अवास्तव मागण्यांमुळे काँग्रेस हैराण आहे. उद्धव ठाकरेंनी तर त्यांच्याकडील संभाव्य मतदारसंघांमध्ये सभाही सुरू केल्या आहेत. जिथे आपले सरपंचही फारसे नाहीत अशा ठिकाणी लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेस अडून बसली आहे. तिसरा मित्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अत्यंत सावध खेळी खेळतील. ॲड. प्रकाश आंबेडकरांना सामावून घेणे सोपे नाही. ते १२ जागा मागताहेत. त्यांना समजवता समजवता दमछाक होईल. रामटेकची जागा काँग्रेसला अन् शिवसेनेलाही हवी आहे. तीच स्थिती बुलडाणा, अमरावतीमध्येही आहे. हातकणंगले शिवसेना आणि राष्ट्रवादीलादेखील (शरद पवार) हवी आहे. उत्तर-मध्य, उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-मध्य मुंबई या तीन जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. पुण्याच्या जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांचाही दावा आहे.

नड्डाजी, एवढं सोपं नाही ते!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबईत आले, पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतच त्यांनी सुनावले, महागड्या गाड्या बाळगू नका; दिखाऊपणा तर नकोच. प्रश्न पडला की एक-दीड कोटीच्या गाड्यांमधून फिरणाऱ्या भाजप नेत्यांचे आता काय होईल? वेलफायर, मर्सिडिजसारख्या गाड्या त्यांच्याजवळ आहेत; त्यांचे काय करायचे? एकट्या दरेकर, लाड यांना दोष देण्यात अर्थ नाही, असे बरेच भाजप नेते आहेत. नड्डाजी, आपण सांगितल्यानंतर भाजपचे नेते महागड्या गाड्या विकतील अशी अपेक्षा करावी का? कोणी कुठे काय गुंतवले आहे याचा तपशील शोधला तर विश्वास बसू नये अशी माहिती मिळेल. प्रदेश भाजपमधील एका नाजूक प्रकरणाचीही माहिती आहे;  पण उगाच कशाला छेडायचे? कोणाविषयी अतिरिक्त अन् खासगी जाणून घेण्याची सवय हेदेखील अश्लीलच होय!

Web Title: Editorial articles seat allocation of Lok Sabha election parties has not been done yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.