विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 05:23 AM2024-09-21T05:23:43+5:302024-09-21T05:24:46+5:30

विनेशबाबतीत झालेल्या चुका भाजपने आता तरी सुधारायला हव्यात. निवडणुकीच्या विजयाची वाट सोपी करणे, हा परिमार्जनाचा एक मार्ग असू शकतो!

Editorial articles Vinesh phogat took the ticket from the Congress, that's it! | विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!

विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!

अभिलाष खांडेकर, रोव्हिंग एडिटर, लोकमत

विनेश फोगटनेकाँग्रेस पक्षात प्रवेश करून हरयाणा विधानसभा निवडणुकीला उभे राहण्यावर भाजपकडून खरेतर प्रतिक्रिया यायला नको होती; पण ती आली. ऑलिम्पिकचे सुवर्णपदक असो वा नसो, भारतीय क्रीडा पटलावर विनेशचा चाहतावर्ग मोठा आहे. पॅरिसमध्ये पदक न मिळणे हे तिचे आणि भारताचे केवळ कमनशीब. उभा देश त्यावेळी पॅरिसवर नजर लावून होता. जागतिक स्तरावर आवश्यक असते तेवढी क्षमता किंवा कौशल्य तिच्याकडे नव्हते म्हणून तिचे पदक हुकले नाही; तर केवळ १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिची संधी गेली. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील एक पुढारी ब्रिजभूषण शरणसिंग यांनी मात्र नैतिकतेच्या नावाने तिच्यावर तोंडसुख घेतले. जणू ते आणि त्यांचे पक्ष सहकारी या सगळ्यांना विनेश अपात्र ठरल्याने आनंदाचे भरतेच आले होते.

भारतीय राजकारण असेच आहे. विनेशने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याबरोबर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील नेतेमंडळी यात पुढे होती. विनेशने राजकीय पक्षात प्रवेश केला किंवा निवडणुकीला उभे राहायचे ठरवले यात तिचे काय चुकले? राजकारणात प्रवेश केल्या-केल्या अचानक ती आता भारताची बेटी राहिली नाही हे कसे?

लिंग समानतेसाठी लढा द्यायचा असेल तर वेगवेगळ्या खेळांत महिलांचे स्वागत केले पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये पी. टी. उषा हिचे पदक थोडक्यात हुकले होते. १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या वेळी भारतात थोड्याच घरात टीव्ही होते. ॲथलेटिक्स या खेळाविषयी लोकांना फारसे माहीतही नव्हते. आजच्या हरियाणाप्रमाणे त्यावेळी केरळने खेळांना, विशेषतः स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले होते. मुंबईने मोठमोठे क्रिकेटपटू निर्माण केले, बरीच दशके पंजाबने हॉकीला आश्रय दिला, त्याचप्रमाणे कुस्ती हा क्रीडा प्रकार हरियाणाने जोपासला. हरियाणातील मुलींनी (प्रामुख्याने महावीरसिंग फोगट यांच्या परिवारातील) या खेळात चांगलेच नैपुण्य दाखवले. आजवर कुस्ती हा पुरुषांचा खेळ मानला जात होता. भारतासारख्या देशातील सामाजिक रचना लक्षात घेता मुलींनी कुस्तीच्या रिंगणात उतरणे कधीच सोपे नव्हते. तरीही भारतीय मुली जिद्दीने कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या आणि यशस्वी झाल्या.

क्रीडांगण गाजवणाऱ्या कर्तबगार स्त्रियांची परंपरा भारताला नवी नाही. मेरी कोम, सानिया मिर्झा, अंजली भागवत, दीपा कर्माकर, गीता आणि बबिता फोगट, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, मिताली राज, कर्णम मल्लेश्वरी, जलतरणपटू बुला चौधरी अशा किती जणींनी भारताचे नाव जगभरात गाजवले आहे. बुला चौधरी तर डाव्या पक्षाच्या तिकिटावर पश्चिम बंगालमधून निवडूनही आली. त्यावेळी कोणता वाद झाल्याचे मला आठवत नाही. भाजपनेही आजवर अनेक क्रीडापटू निवडणुकीला उभे केले आहेत.

विनेशच्या उमेदवारीवरून भाजपने उठवलेले रान या पार्श्वभूमीवर अनाठायी वाटते. भारतीय कुस्ती महासंघावर ताबा मिळवून बसलेल्या गुंडांशी तिने लढा सुरू केला, तेव्हा जणू पहिलवान मंडळी भाजपवरच तुटून पडली आहेत असा कांगावा करण्यात आला. महिला कुस्तीपटूंकडून विनयभंगाचे आरोप पहिल्यांदा करण्यात आले तेव्हा भाजपने वास्तविक कुस्ती महासंघापासून दूर राहायला हवे होते. योग्य ती चौकशी, पोलिस तपास होऊ द्यायला हवा होता. मात्र, अनुरागसिंह ठाकूर यांचे क्रीडा मंत्रालय, त्याचप्रमाणे पी. टी. उषा यांच्या नेतृत्वाखालील ऑलिम्पिक  असोसिएशनने कुस्तीगिरांविषयी फारच थोडी सहानुभूती दाखवली. पी. टी. उषा यांना मिळालेली राज्यसभेची जागा तिरक्या चर्चेचा विषय ठरली, ती उगाच नव्हे.

भाजपने ब्रिजभूषण यांची पाठराखण करत राहण्याऐवजी विनेश फोगटची बाजू घेतली असती तर आज चित्र कदाचित वेगळे दिसले असते. विनेशला पॅरिसमध्ये पदक कदाचित मिळालेही असते. पॅरिसला जाण्यापूर्वी ती अत्यंतिक तणावाखाली सराव करत होती, हे वास्तव लपून राहिलेले नाही. सिंग आणि इतरांच्या टोळीने तिच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण केली होती आणि सरकारकडूनही आधार मिळाला नाही.

तिला गरज होती तेव्हा सत्तारूढ पक्ष आणि सरकार यांनी तिची पाठराखण केली असती, तर अनेक आघाड्यांवर आज चित्र वेगळे दिसले असते. विनेशच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कदाचित तिला भाजपच्याच तंबूत घेऊन आल्या असत्या. तिच्याबाबतीत झालेल्या चुका भाजपने आता तरी सुधारायला हव्यात. विनेशविरोधात उमेदवार उभा न करता, तिच्या विजयाची वाट सोपी करणे, हा परिमार्जनाचा एक मार्ग असू शकतो!

Web Title: Editorial articles Vinesh phogat took the ticket from the Congress, that's it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.