सोनिया गांधी पुढे काय करतील? गांधी कुटुंबातला किंवा बाहेरचा पर्यायी नेता देतील का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 08:41 AM2024-02-22T08:41:53+5:302024-02-22T08:45:48+5:30
मोठ्या कष्टाने उभा केलेल्या पक्षाचा इमला पुन्हा ढासळताना सोनियांना पाहावे लागले, त्या गांधी कुटुंबातला किंवा बाहेरचा पर्यायी नेता देतील का?
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
१४ मार्च १९९८ रोजी शांततेत झालेल्या बंडाद्वारे सीताराम केसरी यांना बाहेरचा रस्ता दाखवून सोनिया गांधी त्यांची इच्छा नसताना काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडल्या गेल्या. त्यावेळी गटबाजीने ग्रासलेल्या पक्षाला एकत्र आणून त्यात नवचैतन्य निर्माण करणे हे त्यांच्यापुढचे सर्वांत मोठे आव्हान होते. २१ मे १९९१ रोजी सोनियाजींचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर पक्षनेते/कार्यकर्त्यांनी वारंवार विनंती करूनही पक्षात सामील व्हायला त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या त्यांच्या निर्णयाचा सर्वांना धक्का बसला.
१९९१ साली पंतप्रधानपदासाठी त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांना पाठिंबा दिला होता. १९९७ साली पक्षात अध्यक्षपदासाठी त्यांनी शरद पवार यांच्याऐवजी सीताराम केसरी यांच्या पारड्यात आपले वजन टाकले होते. काँग्रेसमध्ये त्यावेळी अंतर्गत बंडाळी उफाळून आल्यामुळे त्यांच्यापुढील आव्हाने वाढली होती. दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष बळकट होत चालला होता. सोनिया जन्माने विदेशी असल्याचा मुद्दा हा त्यांच्या वाटेतला मोठा अडसर! नंतर ऑगस्ट २००० मध्ये पक्षाचे उपाध्यक्ष जितेंद्र प्रसाद यांनी बंड केले आणि पक्षाध्यक्षपदासाठी ते सोनिया गांधी यांच्याविरुद्ध उभे राहिले. त्यावेळीही सोनिया यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. पुढे त्यांनी उण्यापुऱ्या सहा वर्षांच्या काळातच पक्षाची पुनर्बांधणी केली. २००४ साली डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपद दिले; पुढे १० वर्षे ते सरकार चालले. सोनिया गांधी यांच्याबद्दल आदर वाढला. त्यांच्या सार्वजनिक वर्तनाची प्रशंसा झाली. बदलत्या परिस्थितीत प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राज्यसभेत जायचे ठरवले. मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या पक्षाचा इमला ढासळताना त्यांना पाहावे लागले. आता पुन्हा सावरून त्या गांधी कुटुंबातला किंवा बाहेरचा एखादा पर्यायी नेता देतात की आपल्या प्रिय पुत्रावरच विसंबून राहतात हे आता पाहावे लागेल. खात्री कोणालाच देता येत नाही.
आत्मघाताची कहाणी
२००२ साली राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासाठी सगळे काही ठीकठाक होते. दोन वर्षांच्या कालावधीत पक्ष सत्तेवर आला आणि २००४ साली तेही अमेठीतून लोकसभेवर निवडून गेले. पक्षातील शहाण्यासुरत्या लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांनी स्वतःचेच म्हणणे रेटायला सुरुवात केली. ए. के. अँटनी यांच्यासारखे त्यांचे गुरुजी इतकेच नव्हे, तर त्यांच्या मातोश्रींचेही ते ऐकेनात. खरेतर मंत्रिपद स्वीकारले असते, तर सरकार कसे चालवले जाते याची कल्पना त्यांना आली असती; पण त्यांनी ही जबाबदारी घ्यायला नकार दिला. सार्वजनिक सभेत कसे बोलावे, याचे प्रशिक्षण आणि हिंदी सुधारणे, याकरिता शिकवणीवर्गाला जायचेही त्यांनी नाकारले. त्यांच्या मातोश्रींनी हिंदीतला लिहून दिलेला मजकूर वाचणे पसंत केले. राहुल मात्र उत्स्फूर्त बोलण्याच्या नादात आत्मघात करून घेत राहिले.
अंत:स्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि मित्रपक्ष राहुल गांधी यांनी २०११-१२ मध्ये पंतप्रधानपद स्वीकारावे, यासाठी अनुकूल होते. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह यांना राष्ट्रपती करण्याचे घाटत होते; परंतु आपल्या नेतृत्वाखाली लढवली गेलेली निवडणूक जिंकूनच आपण पंतप्रधान होऊ, असे सांगून राहुल यांनी त्यावेळी नकार दिला.
प्रसंगवशात डिसेंबर २०१७ मध्ये राहुल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले आणि २०१९ साली लोकसभेत दारुण पराभवाला सामोरे गेले. अमेठी हा बालेकिल्लाही त्यांनी गमावला. जुलै २०२१ मध्ये राहुल यांनी अचानक पक्षाध्यक्षपद सोडून दिले. मल्लिकार्जुन खर्गे यांना पुढे करून मागच्या सीटवर बसून गाडी चालवण्यात राहुल यांना सध्या आनंद वाटतो आहे.
प्रियांका गांधींचे आजारपण
काँग्रेसच्या शीर्षस्थ कुटुंबात सगळे काही ठीक चाललेले नाही, असे आतून आलेल्या बातम्यांवरून दिसते. १४ जानेवारी २०२४ रोजी राहुल गांधी यांनी मणिपूरहून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू केली तेव्हा त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वद्रा उपस्थित नव्हत्या. त्या परदेशात निघून गेल्या. येथे अस्वस्थतेची पहिली चाहूल लागली. यात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश करील, त्यावेळी त्या सामील होतील, असे सांगण्यात आले; परंतु अद्याप तरी त्या आलेल्या नाहीत.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता सोनिया गांधी जयपूरला गेल्या तेव्हाच काय त्या प्रियांका त्यांच्याबरोबर दिसल्या; मात्र काहीतरी बिनसलेले आहे, हेच त्यांची देहबोली सूचित करीत होती. ‘त्यांची प्रकृती ठीक नसल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे,’ असे आठवडाभरानंतर जाहीर झाले. पुढच्या आठवड्यात त्या इस्पितळातून घरी येऊन कामाला लागतील, असे त्यांच्या निकटवर्तीय नेत्याकडून सांगण्यात आले आहे.
आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका यांना रायबरेलीत निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी राज्यसभेतील जागा हवी होती; पण तसे झाले नाही. राहुल यांना लोकांचा विश्वास कमावता आलेला नाही; या पार्श्वभूमीवर प्रियांका यांना पक्षाचा चेहरा करावे, असे काही ज्येष्ठ नेत्यांना वाटते! गांधी कुटुंबाच्या या कहाणीचा पुढचा अध्याय काय; हे पाहावे लागेल.