मनेका गांधी या मोदींच्या सरकारमध्ये पर्यावरणमंत्रिपदावर असल्या तरी सरकार व पक्ष यात त्यांना फारसे वजन नाही. त्यांचे चिरंजीव वरुण गांधी हे खासदार आहेत आणि त्यांना पक्षाने पुन: तिकीटही दिले आहे. परंतु त्यांनाही मोदी, शहा वा भाजपचे अंंतस्थ वर्तुळ फारसे मोजत नाही. कधीकाळी त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने दाखविली गेली, पण ती मोदींनी देशाला दाखविलेल्या अनेक स्वप्नांप्रमाणे तशीच हवेत विरली. काही काळ वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशाही अफवा जोरात पसरल्या गेल्या. सोनिया गांधी व मनेका गांधी यांच्यात फारसे सख्य नसले तरी वरुण गांधींचे प्रियंका गांधींशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याचमुळे या अफवांना बळही आले होते.पक्ष फारसे मोजत नाही, आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वा वजनाचा फायदा करून घेत नाही, अशी भावना असणाऱ्या वरुण गांधींची तशी प्रतिमा अनेकांना खरी वाटणारीही होती. परंतु तसे काही झाले नाही. मनेका व वरुण हे दोघेही मायलेक भाजपमध्ये राहिले. पक्षाने त्यांच्या पदरात तेवढे बाकी काही न घालता केवळ त्यांच्या जागा बदलविल्या. सुलतानपूरची वरुणची जागा मनेकांना आणि मनेकांची पिलीभीतची जागा वरुणला दिली. खरे तर या दोघांपैकी एकालाच उमेदवारी द्यावी, असा दबाव पक्षात सुरुवातीला निर्माण केला गेला; पण भाजपमधील गांधी घराणे असल्याने थोडी खळखळ करून का होईना, त्या दोघांनाही संधी दिली गेली. त्यातही मध्यंतरी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने काही काळ वरुण काहीसे दूर होते. ते प्रकरण निवळल्यानंतर, त्यातील आरोप-प्रत्यारोपांची राळ उडून गेल्यानंतर त्यांनी पुन्हा राजकीय वाटचाल सुरू ठेवली.आताही दिल्लीत मोदी आणि अलाहाबादेत योगी असेपर्यंत त्या दोघांना फारशा मोठ्या आशा करता येण्याजोग्या नाहीत. शिवाय ते पक्षात ‘बाहेरून आलेले’ व ‘संघाचे नसलेले’ आहेत. पक्षातील जुनी माणसे त्याचमुळे त्यांच्यापासून दूर राहतानाही दिसली आहेत. वरुण गांधी अभ्यासू आहेत. पर्यावरणापासून शिक्षणापर्यंतचे त्यांचे अभ्यासपूर्ण लेख निरनिराळ्या नियतकालिकांतून प्रकाशित होत असतात. मात्र भाजप या एकूणच पक्षाला ज्ञान व अध्ययन वगैरेचे कौतुक नाही. नेतृत्वनिष्ठा व संघनिष्ठा या दोन गोष्टी असल्या, की त्यात कुणीही खपून जातो. मग गोंविदाचार्यही विद्वान होतात आणि उमा भारतीही साध्वीच्या रूपाने सर्वज्ञानी होतात. दुर्दैवाने वरुण व मनेका यांच्याजवळ या दोन्ही निष्ठा नाहीत. त्यामुळे त्यांना ‘बाहेरचे’ म्हणून वागविले जाणे भाजपमधील अनेकांना न्यायाचे वाटते. तशी जाणीव त्या दोघांनाही आहे.शातच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुलतानपूर या मनेका गांधींच्या मतदारसंघाला भेट दिली. त्या क्षेत्रात काँग्रेसचे संजय सिंह हे प्रभावी उमेदवार रिंगणात आहेत. मुळात तेथे राहुल गांधींची जाहीर सभा ठरली होती व त्या सभेत ते भाजपसह मनेकाचाचींवर टीकाही करणार होते. (त्याआधी मनेकांनी पक्षाने सांगितले, तर मी राहुल यांच्याविरोधात प्रचाराला जाईन, असे म्हटले होते हे महत्त्वाचे.) परंतु राहुल गांधींनीच मनाचा मोठेपणा व नात्यातली आत्मीयता मनात आणून आपली सुलतानपूरची सभा रद्द केली. त्याऐवजी कार्यकर्त्यांची बैठक घेऊनच त्यांनी आपला तो दौरा संपविला.मनेका गांधी मनातून एकूणच गांधी घराण्यावर रुष्ट आहेत. त्या बोलण्या-वागण्यातही फटकळ आहेत. ‘मला मत देणार नसाल, तर मी तुमची कामे करणार नाही’ हे आपल्या मतदारसंघातील मुस्लीम मतदारांना त्यांनी बजावले आहे. त्याची तशी तक्रारही निवडणूक आयोगाकडे झाली आहे. पण हा आयोगच कणखर नसल्याने त्याची फारशी दखल घेतली गेलेली नाही. असो. या घटनाक्रमातून स्पष्ट झालेल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राहुल गांधींच्या मनात अजून कुटुंबाच्या ऐक्याविषयीची आस्था आहे. आपल्या काकूविरुद्ध प्रचारकी राजकारणातील आरोप-प्रत्यारोप करण्यास ते धजावत नाहीत. दुसरी बाब ही की भाजपमध्ये मनेका व वरुण या दोघांनाही परक्यासारखे वागविले जाते व त्यांची त्यात घुसमट होत आहे. राजकारण हा खेळच अशा फसवणुकीचा व आशा-निराशेचा आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर तरी मनेका व वरुण गांधी यांची घुसमट थांबते का, ते आता बघायचे...
भाजपामधील गांधींची घुसमट थांबणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 4:44 AM