प्रिय चंद्रकांतअप्पा,आपण बेळगावी जाऊन, कन्नड भाषेत गाणे म्हणून आलात, हे वाचून, ऐकून आमचा ऊर भरून आलाय. जे कुणालाही शक्य झाले नाही ते आपण केले, आपले कौतुक कोणत्या शब्दात करावे...?अप्पा, याआधी अनेक नेते आले आणि गेले, त्यांनी नुसतीच सीमाप्रश्नावर भाषणे ठोकली. आर.आर. पाटील, छगन भुजबळ, दिवाकर रावते, जयंत पाटील हे सगळे वेडे नेते होते. नुसतेच सीमाभागात जाऊन लाठ्याकाठ्या खाऊन परत आले. मात्र आपण खरे मर्द निघालात... त्यांच्याच गावात जाऊन, त्यांचाच सत्कार स्वीकारून, त्यांच्याच भूमीत जन्म घेणा-यांची थोरवी; त्यांच्याच भाषेत गाऊन आलात... हिंमत लागते अप्पा हे असं करायला. कुणी काही म्हणो, आम्हाला मात्र आपले कौतुक वाटते. बेळगाव महाराष्ट्रात यावा म्हणून वर्षानुवर्षे जे कुणी भांडत बसले त्यांच्या आजवरच्या सगळ्या लढ्यावर आपण जे काही थंडगार पाणी टाकले ना अप्पा, त्याचे मोल या फडतूस लेखातूनही भरून निघणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला जाणार, हे माझं भविष्य तुम्ही कायम लक्षात ठेवा अप्पा... जेव्हा जेव्हा सीमाप्रश्नाचा उल्लेख निघेल तेव्हा तेव्हा सीमाभागात जाऊन कुणी काठ्या खाल्ल्या याची नोंद भलेही घेतली जाणार नाही, पण आपण तेथे जाऊन कन्नडमध्ये जन्माला येणे ही किती थोर गोष्ट आहे, हे गाण्यातून सांगितल्याची नोंद मात्र कायम राहणार... इतिहास घडवावा तर हा असा... म्हणूनच अप्पा आम्हाला तुमचं फार कौतुक वाटते...
काही दिवसांपूर्वी अप्पा आपण असेच एक धाडसी विधान केले, त्याहीवेळी आम्हाला आपले काय कौतुक वाटले होते, पण आपण त्या विधानावर उगाचच माफी मागितली. चांगले, प्रामाणिक कार्यकर्ते शोधूनही सापडत नाहीत, असे आपण म्हणालात. अगदी खरं बोललात आपण... आपल्या सरकारने घेतलेले निर्णय जनतेत नेण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्ते पाहिजेत अप्पा. अहो, कार्यालयात काम करण्यासाठी चांगले, प्रामाणिक अधिकारी भेटेनात म्हणूनच तर आपल्या सरकारमधील अनेक प्रमुख मंत्र्यांचे रिटायर अधिका-यांशिवाय पान हलत नाही अप्पा... ते जाऊ द्या, पण पक्षात खरंच चांगल्या कार्यकर्त्यांची वानवा आहे, हे खरंय... म्हणूनच आपण महामंडळं, समित्या, कमिट्यांच्या पदाचं वाटप केलेलं नाही, हे खरंय ना अप्पा... बरं केलं. नाही दिलं ते.
अप्पा, या मंत्रिमंडळातील मंत्री ना आपल्यावर जळतात. आपल्या कर्तृत्वावर, लोकसंग्रहावर, सभा गाजवण्याच्या कौशल्यावर, आपल्या धाडसी बोलण्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आणि अमितभार्इंच्या रिलेशनशिपवर... म्हणून हा असा पोटशूळ उठतो मधून मधून... आपण या मंत्रिमंडळात दोन नंबरचे मंत्री आहात, हे अनेकांना खूपतं अप्पा...
एक किस्सा आहे अप्पा. आमचे साहेब दोन नंबरचे मंत्री आहेत, माहिती आहे ना तुम्हाला... असं आपल्याच कार्यालयातील आपले सेवानिवृत्त पीए दमात घेऊन दुस-या अधिका-यांना सांगत होते म्हणे. त्यावर पलीकडच्या माणसाने कानडीत त्यांना आपल्याशी असलेले नाते सांगताच त्या पीएने फोन ठेवून टाकला म्हणे...(atul.kulkarni@lokmat.com)