विजय दर्डाचांद्रयान-२’ मोहिमेची अपेक्षेप्रमाणे सर्व उद्दिष्टे साध्य झाली नसली तरी, ही मोहीम फोल ठरली, असे कदापि म्हणता येणार नाही. २२ जुलै रोजी पृथ्वीवरून रवाना झाल्यापासून ‘चांद्रयान-२’ने सुमारे ३.८० लाख किमीचे अंतर विनाविघ्न पार केले. ‘विक्रम लॅण्डर’ने चंद्रावर उतरण्याच्या अखेरच्या टप्प्याची सुरुवातही शानदार केली. ज्या शेवटच्या १५ मिनिटांना वैज्ञानिक ‘धास्तीचा काळ’ म्हणत होते, त्यातील १३ मिनिटे ‘विक्रम’ने अचूक मार्गक्रमण केले. मात्र त्यानंतर काही तरी गडबड झाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किमी उंचीवर असताना हे लॅण्डर काहीसे भरकटले आणि चंद्रावर अलगद उतरण्यास काही अंतर शिल्लक असतानाच त्याचा पृथ्वीवरील नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला. तरीही ‘चांद्रयान-२’ची मोहीम शानदार व जानदार झाली, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे .
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) वैज्ञानिकांना काम करताना मी जवळून पाहिले आहे. त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करण्याचीही मला संधी मिळाली होती. मला या वैज्ञानिकांवर पूर्ण भरवसा आहे व त्याच विश्वासाने मी ठामपणे सांगू शकतो की, चंद्राला आपण लवकरच नक्की गवसणी घालू. वैज्ञानिकांची जिद्द किती बलवत्तर असते याचे एक उदाहरण सांगता येईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात जेथे आजवर कोणताही देश गेलेला नाही तेथे एक ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ पाठविण्यासाठी भारताने सन २००७ मध्ये रशियाशी एक करार केला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सन २००८ मध्ये या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली. यात रशिया भारताला ‘लॅण्डर’ देणार होता. पण न जाणे का, सन २०१६ मध्ये रशियाने स्पष्ट नकार दिला. याने निराश न होता ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी हे एक आव्हान म्हणून स्वीकारले व स्वत:च ‘लॅण्डर’ विकसित करण्याचे ठरविले. अवघ्या दोन वर्षांत त्यांनी हा चमत्कार करूनही दाखविला! आता आपण जो ‘विक्रम लॅण्डर’ चंद्रावर पाठविला तोच हा लॅण्डर.
भारतातून अंतराळ याने सोडण्यासाठी प्रक्षेपण तळ उभारण्याच्या वेळीही ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी असाच अजोड आत्मविश्वास दाखविला होता. जेथून अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणे सुलभ होईल, अशी जागा डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई शोधत होते. शेवटी ते थिरुवनंतपूरमच्या शेजारी थुंबा या मच्छीमारांच्या छोट्याशा गावात पोहोचले. थुंबा हे पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताजवळ आहे म्हणून त्याची निवड केली गेली. पण अडचण अशी होती की तेथे एक प्राचीन चर्च होते. विक्रम साराभाई यांनी राजकीय नेते व अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. पण चर्च तेथून हटविणे शक्य नाही, असे त्या सर्वांचे मत पडले. शेवटी साराभाई त्या चर्चचे प्रमुख बिशप बर्नार्ड परेरा यांच्याकडे गेले व त्यांनी आपल्या योजनेची त्यांना सविस्तर माहिती दिली. बिशप परेरा यांनी लगेच काही आश्वासन दिले नाही, पण त्यांनी साराभाई यांना रविवारच्या प्रार्थनेच्या वेळी हजर राहायला सांगितले! साराभाई रविवारी प्रार्थनेच्या वेळी चर्चमध्ये गेले. प्रार्थनासभेत बिशप परेरा यांनी जमलेल्या भाविकांना सांगितले की, आपल्याकडे एक प्रसिद्ध वैज्ञानिक आले आहेत व त्यांना अंतराळ संशोधनासाठी आपली ही जागा हवी आहे. बिशपने असेही सांगितले की, विज्ञान सत्याचा शोध घेते व मानवी जीवन अधिक चांगले करण्यास मदत करते. मी धर्माच्या माध्यमातून लोकांना मन:शांती देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझे व विक्रम साराभाई यांचे काम तसे पाहिले तर एकच आहे. ही जागा आपण त्यांना दिली तर दुसरे चर्च सहा महिन्यांत बांधून देण्याचे वचन साराभाई यांनी मला दिले आहे. असे सांगून त्यांनी, आपण साराभाई यांना आपल्या गॉडचे हे घर, तुमचे व माझे घर द्यावे का, असा प्रश्न प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांना केला. भाविकांनी लगेच ‘आमीन’ असे म्हणून एकमुखाने होकार दिला!
भारताचे अंतराळ प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे उभे राहण्याचे श्रेय म्हणूनच विक्रम साराभाई यांच्याकडे जाते. सांगायचे तात्पर्य असे की, आपल्या वैज्ञानिकांमध्ये अपार चिकाटी आहे, कमालीची कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. समस्यांनी ते जराही विचलित होत नाहीत. उलट नव्या दमाने, नव्या ईर्ष्येने पुन्हा कामाला लागतात. नासानेही आमच्या वैज्ञानिकांची प्रशंसा केली आहे. मला विश्वास आहे की, यावेळीही आमचे वैज्ञानिक यशस्वी होतील. आॅर्बिटरने ‘विक्रम’चा शोध तर लावलाच आहे, आता त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही ते करीत आहेत.दु:ख अनावर झालेल्या ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. आर. सिवन यांना प्रेमालिंगन देत, सांत्वन करून केवळ त्यांनाच नव्हे तर तमाम वैज्ञानिकांना धीर दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांची नक्कीच प्रशंसा करीन. हा एक भावनाप्रधान क्षण होता पंतप्रधानांनी या भावनात्मक वागणुकीने लोकांची मने जिंकली आहेत. आपणही या धीर देण्यात सामील व्हायला हवे. आपण वैज्ञानिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. या जोरावर ते यापुढेही अनेक चमत्कार करत राहतील!
(लेखक लोकमत समूहच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत)