‘सकाळी लवकर उठणं’ हे मोठ्यांसाठीही मोठं कष्टप्रद काम असतं. ते काम लहान मुलांना मात्र रोज करावं लागतं. सकाळची शाळा ही बालपणीच्या आठवणीतली एक बोचरी गोष्ट असते. सकाळी साखरझोप मोडून उठायचं आणि भरभर आवरून शाळेत जायचं हे काम तसं ‘नावडीचंच!’ सांग-सांग भोलानाथ शाळा उशिरा भरेल काय? असं काही बालगीत नसलं तरी आता दुसरीपर्यंतच्या मुलांच्या शाळा सकाळी ९ नंतर भरतील आणि मुलांनी अजिबात भल्या सकाळी शाळा गाठू नये, असा निर्णय सरकार दरबारी घेतला जातो आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यपालांनीही मुलांच्या सकाळच्या शाळांविषयी चिंता व्यक्त केली होती. आता मुलांचं शाळकरी जगणंच नर्सरीत असल्यापासूनच सुरू होतं. म्हणजे साडेतीन वर्षांचं मूल सकाळी सात-साडेसात-आठ वाजताची शाळा गाठायला भल्या सकाळी शाळेची बस, रिक्षा, व्हॅन यासारख्या वाहनांत कोंबून रवाना होतं. त्यापूर्वी घरोघर मुलांना झोपेतून उठवण्यासाठी आईबाबा जंगजंग पछाडतात. उठा-उठाचा गजर सुरू असतो; पण मुलांची झोप काही पुरी होत नाही आणि मग रागावणे-मारणे-चिडणे यावळणाने रोज रामप्रहरी घराचं रूपांतर समरांगणात होतं. मात्र, मुळात प्रश्न सकाळी लवकर उठण्याचा आहे का? तर तमाम बालरोगतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सतत सांगतात की प्रश्न गंभीर आहे तो मुलांच्या झोपेचा.
मुलं लवकर झोपतच नाहीत हा खरा प्रश्न आहे. झोपेचे तास कमी होतात, त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर, एकाग्रतेवर, अभ्यासासह सामाजीकरणावर होतो. मुलं पेंगतात, चिडतात, त्यांना ताजंतवानं वाटत नाही, त्यांचा अटेंशन स्पॅन कमी झाला आहे, अभ्यास झेपत नाही यासाऱ्याचं मूळ कमी झोप आणि झोपण्यापूर्वी त्यांच्या समोर सतत हलणारे मोबाइल - टीव्हीचे स्क्रीन्स असतात. या समस्येचं सुलभीकरण करायचं तर सरसकट पालकांना आणि मोबाइलला दोष देता येईल की, पालक मुलांच्या हातात मोबाइल देतातच का? मुलांना टीव्हीसमोर बसवतातच का? मात्र, दोष देऊन प्रश्न सुटले असते तर काय हवं होतं? तसं होत नाही कारण या साऱ्याचं मूळ आजच्या बदललेल्या जीवनशैलीत आहे. पालकांच्या नोकऱ्या किमान आठ तासांच्या, मोठ्या शहरांत तर प्रवासाचा वेळ किमान दोन तासांचा. पालक दिवसाकाठी १२ -१४ तास घराबाहेर असतात. ऑफिस गाठायचं म्हणून सकाळी भरभर आवरून, मुलाला शाळेत रवाना करून आई स्वत: ऑफिसला जाते किंवा मुलांना पाळणाघरात सोडून गाड्यांच्या वेळा गाठते. शाळेत मुलं अडकलेली असतात ते ठीक; पण सकाळी पंच गाठण्यासाठी जिवाची शर्थ करणारे पालक जर मुलांच्या आधी घराबाहेर पडले तर शाळेच्या वेळेपर्यंत मुलं सांभाळायची कुणी? कुठे ठेवायची? आपल्याकडे पाळणाघरांसारख्या सोयी नाहीत. बालसंगोपनासाठी आवश्यक त्या कुठल्याच आधार व्यवस्था नाहीत. भल्या सकाळी तर उपलब्ध असलेलीही पाळणाघरंही उघडत नाहीत. मग मुलांच्या शाळेच्या वेळा बदलताना पालकांची गैरसोय होईल का हा प्रश्न दुर्लक्षितच राहतो.
घरोघर अशा अवघड प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम आईकडेच असतं कारण मुलांचं संगोपन, त्यांचा अभ्यास, शाळा, क्लासेस, खेळादीकलांचे क्लासेस हे सगळं करून संस्कारी मुलं घडवण्याची जबाबदारी आईचीच असते. दमछाक होईपर्यंत आईपालक धावत असतात आणि जरा मुलांना कमी गुण मिळाले किंवा वर्तनसमस्या आढळली की दोषही आईलाच दिला जातो. मात्र, बदलत्या जीवनशैलीत नोकरीसह प्रवासाचे वाढलेले तास, स्वयंपाक-जेवणं, घरकाम, मुलांचं अभ्यास, व्हॉट्सॲपसह घरी येणारे कामाचे ताण आणि वरिष्ठांचे आदेश हे सारं जुळवून घेत जगताना रोज झोपेची वेळ होताहोता मध्यरात्र झालेली असते. हा सगळा ताण अर्थातच मुलांवरही येतो. स्पर्धेच्या काळात आपले मूल मागे पडू नये म्हणून महागड्या शाळांमध्ये त्यांना घालणारे आणि प्रचंड फी भरणारे पालकही तितकेच अगतिक आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे फक्त मुलांच्या शाळेची वेळ बदलली की मुलांना भरपूर झोप मिळेल आणि उशिरा शाळा हे मुलांच्या वाढीसाठी पोषक टॉनिक ठरेल, असा काही हा इन्स्टंट उपाय नाही.
नव्या जीवनशैलीने उभे केलेले हे नवे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं सापडत नाहीत हा खरा प्रश्न आहे. मुलांच्या शिक्षणाच्या आज ज्या अनेक गंभीर समस्या आहेत त्यापैकी काही समस्यांचं मूळ ताणानं पिचलेल्या नव्या जीवनशैलीतही आहे हे किमान मान्य केलं तर ही अवघड प्रश्नपत्रिका सोडवण्याचं सूत्र सापडेल. तोवर हा ताळा अपुराच राहणार...