एकेकाळी स्वत:ला कट्टर समाजवादी म्हणवून घेणारे राम विलास पासवान हे कायमच काँग्रेस आणि भाजप यांचे वर्णन नागनाथ आणि सापनाथ असे करीत. हे पक्ष लोकविरोधी आहेत आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपला विरोध आहे, असे बोलून दाखवत. प्रत्यक्षात मात्र डॉ. मनमोहन सिंग, इंदरकुमार गुजराल, देवेगौडा, वाजपेयी अशा सर्वांच्या मंत्रिमंडळात ते होते. केवळ स्वार्थ हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला, त्यामुळेच ते रामदास आठवले यांच्याप्रमाणे कुठेही उड्या मारणारे राष्ट्रीय नेते बनले. ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आहेतच. ते सध्या आजारी असून, त्यांचे हेच स्वार्थी राजकारण पुढे नेण्याचे काम त्यांचे पुत्र खा. चिराग पासवान सध्या वेगाने करीत आहेत.बिहारमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकांत त्यांच्या पक्षाचे दोन जणच निवडून आले. तरीही त्यांनी यावेळी एकूण २४३ पैकी १४३ जागा लोक जनशक्ती पार्टी म्हणजेच लोजपाला मिळाव्यात, अशी मागणी केली. ती मान्य होणे शक्यच नव्हते. त्यांनाही ते माहीत होते. पण रालोआमध्ये राहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे राजकारण संपविण्याची सुपारी त्यांनी घेतली असून, भाजप त्यांना चाप लावते का, हे पाहायला हवे. भाजप आणि जदयू एकत्र असताना त्यातील केवळ जदयूविरोधात आपण सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. नितीश आणि भाजप एकत्र, राम विलास पासवान भाजप सरकारमध्ये आणि त्यांचे पुत्रच बिहारमध्ये नितीश यांचे राजकारण संपवू पाहत आहेत, हे विचित्र आहे.भाजप नेते आतापर्यंत त्याविषयी काहीच बोलायला तयार नव्हते. नितीश यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढविणार असल्याचे भाजपने घोषित केले आहे. त्यामुळे त्यात अडथळे आणणाऱ्या पासवान यांना भाजपने दूर करायला हवे. जदयू व नितीश यांच्याविरोधात भूमिका म्हणजे रालोआलाच विरोध. त्यामुळे पासवान आणि त्यांच्या पक्षाला भाजप नेत्यांनी ताबडतोब रालोआतून आणि पासवान यांना सरकारमधून बाहेर काढायला हवे. तसे न केल्यास भाजपच्या सांगण्यावरूनच चिराग पासवान ही वाकडी चाल खेळत असल्याची शंका खरी ठरेल. चिराग पासवान यांच्या पक्षाने आणि उमेदवारांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागू नयेत, असे भाजपने बजावले आहे.भाजपला खरेच नितीश यांचे नेतृत्व मान्य असेल तर पासवान यांना असले भलते उद्योग बंद करा वा केंद्र सरकारमधून बाहेर पडा, असे स्पष्टपणे सांगावे लागेल. पण चिराग यांच्या राजकारणात भाजप नेते स्वार्थ पाहणार असतील तर ते तोंडघशी पडतील. नितीश हेही मग गप्प न राहता, भाजपची अडचण करतील. त्यात तेही वाकबगार आहेत. बिहारमध्ये नितीशना कमजोर केल्याचे श्रेय मिळेल, असे चिराग यांना वाटते, पण दोन चार जागाच पुन्हा मिळाल्यास लोजपाही फुटेल. भाजपचे काहीच बिघडणार नाही आणि नितीश यांचे अधिक आमदार आलेच तर भाजप दुय्यम स्थान घ्यायला तयार आहेच. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि नितीश यांनी दुय्यम स्थान मान्य केले नाही तर महाराष्ट्राप्रमाणेच तिथेही राजद नेत्यांना फोडून सरकार बनविण्याचा खेळ भाजप नेते नक्कीच खेळू शकतील.नितीश कुमारही सत्तेसाठी राजद व काँग्रेस यांच्या महाआघाडीशी जवळीक करू शकतील. या सर्वात वाकडी वा तिरपी चाल खेळणाऱ्या चिराग पासवान यांच्या हाती फारसे काही लागणार नाही. चिराग यांच्यामुळे आपला फायदा होईल, याची खात्री भाजपलाही दिसत नाही. तरीही काही भाजप नेते पाहुण्याच्या काठीने जनावर मारण्याचे प्रयत्न करीत आहेत. नितीश यांची लोकप्रियता गेल्या पाच वर्षात कमी झाली आहे, त्याचा फायदा उठविण्याचा चिराग यांचा प्रयत्न आहे. पण नाराज असलेले लोक अजूनही मुख्यमंत्री या पदासाठी नितीश यांनाच पसंती देत आहेत. त्यांच्या खालोखाल लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी लोकप्रिय आहेत. त्यामुळे सत्तासोपान गाठण्यासाठी भाजपला चिराग नव्हे, तर नितीशच महत्त्वाचे आहेत. उंटाप्रमाणे तिरप्या खेळीने पुढे जाणाऱ्या चिराग पासवान यांना भाजपने आताच अडवले नाही, तर सारा खेळच उलटून जाईल. तुमच्या पक्षावर केंद्रातील सरकार अवलंबून नाही, याची जाणीव या छोट्या पासवान यांना भाजपने करून द्यायलाच हवी.
चिराग यांची वाकडी चाल; नितीश यांना कमजोर करण्यासाठी भाजपचा डाव?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 5:32 AM