कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगालाच वेठीला धरले आहे. अनेक विकसित देशांच्या मते हे संकट चीनमुळेच आले आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे अनेक ठिकाणी उत्पादन बंद पडले असून, रोजगार बुडाला आहे. कोरोनाच्या कारणामुळेच जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब अशी ओळख असलेल्या चीनमधून बाहेर पडून आपले उत्पादन अन्य देशांमध्ये सुरू करण्याचा विचार अनेक देशांनी सुरू केला आहे. जपानसारख्या काही देशांनी तर आपल्या कंपन्यांना चीनमधून बाहेर पडण्यासाठी पॅकेजही जाहीर केले आहे. या सर्व घडामोडी म्हणजे भारतासाठी एक चांगली संधी आहे. सुमारे एक हजार कंपन्या भारतामध्ये आपले उत्पादन सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठीची बोलणीही सुरू झाली असून, तसे झाल्यास भारतामध्ये रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.अनेक उत्पादक कंपन्यांना आपले उत्पादन चीनबाहेर सुरू करावयाचे असून, त्यांच्यासमोर भारत हा एक उत्तम पर्याय आहे. भारतामध्ये उपलब्ध असलेली मोठी बाजारपेठ, तरुणांची मोठी संख्या, तंत्रज्ञानाची असलेली ओळख, अन्य देशांपेक्षा स्वस्तात मिळणारे भरपूर मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता या जमेच्या बाजू आहेत. या सर्व बाबींमुळेच आग्नेय आशियातील अन्य देशांपेक्षा भारताला विविध कंपन्यांची पसंती मिळण्याची मोठी शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जागतिक व्यापारात चीनने स्वीकारलेल्या काहीशा आडमुठ्या भूमिकेमुळेही या देशाचे अन्य देशांशी संबंध फारसे सौहार्दाचे राहिलेले नव्हतेच. अमेरिका, जपान या देशांबरोबरचे चीनचे संबंध ताणलेलेच आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोरोनाचे निमित्त मिळाल्याने अनेक विकसित देशांनी आपल्या उत्पादकांना चीनमधून बाहेर पडण्याला प्रोत्साहन देणे सुरू केले आहे.जपानने आपल्या उद्योगांना चीनमधून अन्य ठिकाणी उत्पादन हलविण्यासाठी २.२ अब्ज अमेरिकन डॉलरचे पॅकेजच जाहीर केले आहे. यातील मोठी रक्कम ही मायदेशामध्ये उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी राखीव ठेवली आहे. यामागे या देशांचा स्वार्थही दडलेला आहेच. चीनमधून बाहेर पडून उत्पादकांनी आपल्या मायदेशामध्ये उद्योग सुरू करावेत आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, ही त्यामागची खरी भावना आहे. आशियामध्ये स्वस्तात उपलब्ध असणारा कामगारवर्ग ही उद्योगांसाठी सर्वांत महत्त्वाची बाब आहे. विकसित देशांमध्ये उद्योग सुरू केल्यास कामगारांवरील खर्चात वाढ होऊन उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता असल्याने अनेक कंपन्या या पर्यायाचा विचार करीत नाहीत. चीननंतर या उत्पादकांपुढे असलेला दुसरा पर्याय हा भारतच आहे.गेली काही वर्षे भारतात सातत्याने होत असलेली थेट परकीय गुंतवणूक ही अन्य देशांमध्ये भारताबाबत असलेला भरवसा दाखवून देत आहे. १३५ कोटी लोकसंख्येच्या भारतामध्ये तरुणांची असलेली मोठी संख्या, तसेच उपलब्ध असलेली मोठी बाजारपेठ या महत्त्वाच्या बाबी आहेत. विशेष म्हणजे येथील तरुणवर्ग साक्षर आणि तंत्रस्नेही असल्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यामध्ये त्यांना फार वेळ लागत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये भारतामधील पायाभूत सुविधांमध्येही मोठी वाढ झालेली आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते आणि उडान योजनेंतर्गत देशातील अनेक शहरांमध्ये सुरू झालेली विमानसेवा यामुळे भारतामध्ये वेगवान दळणवळण शक्य होत आहे. याचा फायदाही नव्याने येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनेही अलीकडेच एफडीआयच्या धोरणात काही बदल करून भारतीय कंपन्या बळकावण्याच्या प्रयत्नांना पायबंद घातला आहे.कोरोनानंतरच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देऊन थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. जागतिक मंदीची भीती भेडसावत असून, त्यामुळे रोजगारांवर गंडांतर येण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये येऊ इच्छिणारे उद्योग ही मोठीच सुसंधी ठरण्याची शक्यता आहे. या उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच उत्पादन आणि निर्यात वाढून अर्थव्यवस्थेचा विकासदरही वाढण्याला मदत मिळणार आहे. आता खरी गरज आहे ती, सरकारने आपली मुत्सद्देगिरी दाखवून अधिकाधिक उद्योगांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची.
CoronaVirus: कोरोनामुळे चीनची कोंडी; भारत साधणार का सुवर्णसंधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 6:38 AM