शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 7:39 AM

जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट म्हणतात, खर्च केल्यावर उरलेल्या शिलकीची बचत करू नका, तर बचत केल्यावर जे उरले ते खर्च करा! भारतीयही अगदी तसेच होते...

जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट म्हणतात, खर्च केल्यावर उरलेल्या शिलकीची बचत करू नका, तर बचत केल्यावर जे उरले ते खर्च करा! वैयक्तिक आणि कौटुंबिक अर्थसंकल्पाचा हा मूलमंत्र भारतीय पिढ्यानपिढ्या गिरवीत आले आहेत; परंतु अलीकडील काळात भारतीय या बाबतीतही पाश्चात्त्यांचे अनुकरण करू लागले आहेत, असे दर्शविणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. भारतीय कुटुंबांची नक्त आर्थिक बचत २०२३-२४ या आर्थिक वर्षात १४,२०० अब्ज रुपयांपर्यंत खाली घसरली असून, हा गत पाच वर्षांतील नीचांक आहे. बचतीचा हा आकडा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच ‘जीडीपी’च्या ५.२ टक्के असून, ही पाच दशकांतील नीचांकी कामगिरी आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत भारतीय कुटुंबांच्या बचतीमध्ये तब्बल २९०० अब्ज रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे त्याच कालावधीत कमी मुदतीची कर्जउचल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कर्ज मोठ्या प्रमाणात आणि सहज उपलब्ध झाल्यामुळे भारतीयांचा उपभोगावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्याचेच प्रतिबिंब बचत कमी होण्यात उमटलेले दिसते, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

फार पूर्वीपासून भारत हा बचतकर्त्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भविष्यकालीन सुरक्षेसाठी भारतीय उत्पन्नाचा मोठा भाग बचत करतात. प्रसंगी पोटाला चिमटा काढूनही भारतीय बचतीला प्राधान्य देत आले आहेत. मग शतकानुशतकांपासून चालत आलेली सवय मोडून भारतीय कर्ज का काढू लागले आहेत आणि बचतीकडे का दुर्लक्ष करू लागले आहेत? ऋण काढून सण साजरी करण्याची भारतीयांची ही नवी प्रवृत्ती भविष्यासंदर्भातील वाढत्या आशावादाचे प्रतीक आहे की, घटते उत्पन्न, वाढती महागाई आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक तणावाचे द्योतक आहे? काही अर्थतज्ज्ञांच्या मते, भारतीयांची ही नवी प्रवृत्ती काही प्रमाणात पाश्चात्त्यांचे अनुकरण आणि काही प्रमाणात भविष्यासंदर्भातील आशावादातून निर्माण होत आहे. नव्या पिढीतील तरुणांवर पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव आहे, हे उघड सत्य आहे. गत काही दशकांतील वैश्विकीकरणामुळे, सहज उपलब्ध आंतरजालामुळे, तो प्रभाव वाढतच चालला आहे. पूर्वीच्या तुलनेत हल्ली कामानिमित्त किंवा पर्यटनासाठीही जास्त प्रमाणात विदेश भ्रमण होते. स्वाभाविकच युरोप-अमेरिकेतील जीवनशैली बघून आपणही तसेच जगावे, ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. अमेरिकेत पूर्वीपासून कर्जे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे शिक्षण पूर्ण होताच, कर्ज घेऊन गाडी, घर आणि आवश्यक ती सर्व घरगुती उपकरणे विकत घ्यायची आणि नंतर त्यांचे हप्ते फेडत बसायचे, ही अमेरिकेतील रूढ पद्धत आहे. शिवाय प्रत्येक पिढीने आपले बघावे, त्यांच्यासाठी आई-वडिलांनी तरतूद करून ठेवायची गरज नाही, ही पाश्चात्त्यांची विचारसरणी आहे.

दुसऱ्या बाजूला, आधी उत्पन्न मिळवायचे आणि मग बचतीतून हळूहळू जमेल त्याप्रमाणे गरजा पूर्ण करायच्या, मुलाबाळांसाठी तरतूद करायची व शेवटी जमलेच तर हौसमौज करायची, ही भारतीयांची पूर्वापार चालत आलेली पद्धत! जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे आपणही पाश्चात्त्यांप्रमाणे तरुण वयातच सर्व भौतिक उपभोग का घेऊ नयेत, हौसमौज का करू नये, जे तरुणपणी करायचे ते करण्यासाठी म्हातारपणाची वाट का बघायची, ही तरुण भारतीयांची मानसिकता होत चालली आहे. त्याचीच परिणती वाढत्या कर्जात आणि घटत्या बचतीत होऊ लागली आहे, असे मानण्यास जागा आहे. आता भारतातील कर्जांच्या आकडेवारीचे जर विश्लेषण केले तर असे दिसते की, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन इत्यादी देशांतील नागरिकांच्या तुलनेत भारतीयांच्या शिरावरील सरासरी कर्ज बरेच कमी आहे; परंतु उत्पन्नापैकी किती भाग कर्ज परतफेडीसाठी खर्च होतो याच्या प्रमाणात, म्हणजेच ‘डीएसआर’मध्ये, भारतीय बरेच पुढे आहेत. त्यामागील कारण म्हणजे मुळात त्या देशांतील नागरिकांच्या तुलनेत भारतीयांचे सरासरी उत्पन्न बरेच कमी आहे. शिवाय भारतातील व्याजदर तुलनेत जास्त आणि कर्जाचे कालावधी तुलनेत कमी आहेत.

कर्ज काढून घर, गाड्या विकत घेण्याची भारतीयांची मानसिकता उज्ज्वल भविष्यासंदर्भातील वाढत्या विश्वासाचे निदर्शक आहे, असे भारत सरकारचे म्हणणे आहे; पण काही अर्थतज्ज्ञ मात्र सावधगिरीचा इशारा देत आहेत. ऋण काढून सण साजरे करण्याच्या पाश्चात्य मानसिकतेचे अनुकरण करताना भारतीयांनी तो विचारात घेतलेला बरा; अन्यथा हाती धुपाटणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही!

टॅग्स :MONEYपैसाInflationमहागाई