इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्रातील ‘प्ले ऑफ’चे चार संघ निश्चित झाले आहेत. दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता संघ. याच क्रमाने ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान निश्चित करतील. तथापि, आयपीएल चाहत्यांसाठी सर्वांत मोठी धक्का देणारी बाब ठरली ती पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी. हा संघ यंदा अव्वल चार संघात पोहोचू शकला नाही. हा जगभरातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जातो. पाच वेळा चषक उंचावणाऱ्या मुंबईला यंदा जेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण करण्याची संधी होती. रोहित शर्मा हा मुंबईचा कर्णधार आहे. विराट कोहलीनंतर भारताचे नेतृत्व करण्यास सक्षम खेळाडू या नात्याने त्याच्याकडे पाहिले जाते. अशावेळी मुंबई संघाचे साखळी फेरीतच बाहेर पडणे चाहत्यांना निराश करणारे आहे. मुंबईच्या कामगिरीवर नजर टाकल्यास हा संघ यूएईत पोहोचल्यानंतर त्याची कामगिरी ढेपाळत गेली.
प्ले ऑफपर्यंत ज्या लढती झाल्या त्यात एकदाही मुंबईच्या खेळाडूंकडून शतकी खेळी झाली नाही. या संघात रोहितसह किरोन पोलार्ड, इशान किशन, क्विन्टन डिकॉक, हार्दिक आणि कृणाल हे पांड्या बंधू असे दिग्गज असताना मोठी धावसंख्या उभारणे मुंबईला कठीण गेले. गोलंदाजांबाबत सांगायचे तर जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, पांड्या बंधू प्रभावहीन जाणवले. दडपणाखाली कामगिरी उंचावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईला यंदा त्यांच्या हुकमी खेळाडूंनीच गंडवले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीपर्यंत त्यांना ‘चमत्कार’ आणि ‘नशिबाची साथ’ यामुळे इथंपर्यंत येता आले. डिकॉकनंतर एकटा पोलार्ड लढला; मात्र सूर्यकुमार, इशान किशन या मधल्या फळीने दगा दिला. धावगती ढेपाळण्याचे हे मोठे कारण आहे. केवळ मोठमोठी नावे पुरेशी नाहीत. त्यांच्याकडून कामगिरीही होणे आवश्यक असते. याचे मोठे उदाहरण ठरले ते आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर. आवेश दिल्लीचा वेगवान गोलंदाज, तर व्यंकटेश केकेआरचा सलामीवीर. इंदूरच्या या दोन्ही खेळाडूंची कामगिरी अधोरेखित करणारी आहे. ऋषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स मात्र लक्षवेधी ठरला.
दिल्लीची मुसंडी हे सकारात्मक संकेत ठरावेत. ऋषभला भारतीय संघाचे भविष्य मानले जाते. दोन- चार वर्षांनंतरचा कर्णधार या नात्याने अनेकजण ऋषभकडे बघतात. ऋषभने दिल्लीला ज्या पद्धतीने विजय मिळवून देत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर नेले, ते भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी उपयुक्त मानले पाहिजे. युवा कर्णधार म्हणून ऋषभचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. रविचंद्रन अश्विनवरून मोठा वाद झाला. इंग्लंड दौऱ्यात त्याला सर्वच सामन्यांत बाहेर ठेवण्यात आले. यूएईत आल्यानंतर त्याचा इयोन मोर्गनसोबत वाद झाला. त्यानंतरही दिल्ली संघ दमदार कामगिरीसह पुढे सरकला. सर्वच खेळाडूंनी सांघिक योगदान दिले. प्रश्न उरतो तो ऋषभच्या नेतृत्वात दिल्लीला आयपीएलचे पहिले जेतेपद मिळविणार का? असे झाल्यास भारतीय क्रिकेटच्या हितासाठी तो शुभसंकेत ठरावा. प्ले ऑफमध्ये ज्या संघांनी धडक दिली त्यांच्या कर्णधारांचा विचार केल्यास सर्वांत आधी नाव येते ते धोनीचे. धोनीने टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसी स्पर्धांचे जेतेपद मिळवून दिले आहे. विराट कोहलीने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताला अनेक महत्त्वाच्या मालिका आणि सामने जिंकून दिले. इयोन मोर्गननेदेखील २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले आहे, असे असताना ऋषभ पंत तीनही दिग्गजांपुढे आपल्या संघाला अव्वल स्थानावर घेऊन आला आहे.
केकेआरच्या कामगिरीचीही दखल घ्यावीच लागेल. केकेआरने यूएईत आल्यानंतर सातपैकी पाच सामने जिंकले. ज्या पद्धतीने हा संघ खेळतो आहे, त्यावरून त्यांची कामगिरी चमत्कारिकच मानायला हवी. चौथ्या स्थानावर पात्र ठरलेला हा संघ यंदा आयपीएल चॅम्पियन झाल्यास नवल वाटायला नको. व्यंकटेश अय्यरच्या समावेशानंतर केकेआरमध्ये नवी ऊर्जा संचारली. शिवम मावीची गोलंदाजी धडकी भरविणारी ठरली, तर शुभमन गिल फलंदाजीत सतत धडाका करीत आहे. केकेआर संघ करिष्मा करण्यास सज्ज आहे. दुसरीकडे धोनी हा क्रिकेटमध्ये ‘जादूगार’ मानला जातो. विराट कोहलीचा संघदेखील पहिल्या जेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे. एकूणच काय, तर चारही संघ आयपीएलचा चषक उंचावण्यास उत्सुक आणि जिकिरीचे प्रयत्न करणार असल्याने आता नवा संघ चॅम्पियन बनेल यात शंका नाही.