शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

संपादकीय लेख : मुलांना अध्ययन दारिद्र्याच्या खाईत ढकलू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 6:03 AM

शाळांचे दरवाजे बंद राहिल्याने एकलकोंड्या झालेल्या मुलांचे नुकसान मोजता येणे अशक्य ! त्यांचा भावनिक बुद्ध्यांक घसरण्याची भीती मोठी आहे.

विजय दर्डा

हिरोशिमा, नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात गमावलेले प्राण ही एक मोठी आपत्ती होती, त्यानंतर जे वाचले ते विविध रोगांचे बळी ठरले. त्यांचे जगणे कठीण झाले. लोक विचार करू लागले की अशा जगण्याचा काय उपयोग? नंतरच्या पिढ्यांवर झालेला त्याचा घातक परिणाम आजही दिसून येतो. माझ्या जपान भेटीत लोकांच्या वेदना अतिशय जवळून अनुभवताना माझे डोळे पाणावले आणि हृदय गहिवरुन आले. कोरोनानंतर आपल्या मुलांचे भविष्य त्याच मार्गाने जाईल का?

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून मला सगळ्यात जास्त काळजी वाटते आहे, ती शाळकरी मुलांची !मुलांच्या व्यक्तित्वावर या साथीचे काय परिणाम होतील याविषयी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांशी आणि मनोवैज्ञानिकांशी मी सातत्याने बोलत आलो आहे. जागतिक बँकेचे शैक्षणिक संचालक जिमी सावेद्रा यांच्या अलीकडच्या वक्तव्याने माझी चिंता आणखीच वाढवली आहे. शाळकरी मुलांच्या शिक्षणावर कोरोना महामारीचे नेमके काय परिणाम होतील याच्या अंदाजांपेक्षाही प्रत्यक्षातले परिणाम अधिक गंभीर असतील, हे सावेद्रा यांचे विधान आहे. जगभरात अध्ययन दारिद्र्याची स्थिती निर्माण होत आहे. दहाव्या वर्षांपर्यंत साधे वाक्य वाचता न येणे किंवा न समजणे म्हणजे अध्ययन दारिद्र्य. सामान्य भाषेत आपण याला शैक्षणिक दारिद्र्य म्हणू शकतो. मुलांच्या मानसिक स्थितीकडे माझे कायम लक्ष असते. मुलांना सर्वाधिक त्रास होत आहे, पण त्यांना तो व्यक्त कसा करावा हेही समजत नाही, हा खरा प्रश्न आहे. केजी आणि प्राथमिक शाळेतील मुलांवर वयानुसार वेगवेगळा परिणाम झालेला असू शकतो, तर माध्यमिक शाळेतल्या मुलांवर झालेला परिणाम आपल्याला दिसतोच आहे.

बालवाडी आणि प्राथमिक शाळेतल्या मुलांना तर असे वाटू लागले आहे की, शाळा वगैरे काही नसतेच; ती ऑनलाइन असते आणि घरूनच करायची असते. वाटेल तेव्हा अभ्यास करा, टॅबलेटसमोर बसा आणि काहीतरी करा.... हे बदलायला, या मुलांना शाळेत जाण्याची सवय लागायला वेळ लागेल.खूप काही बदलले आहे हे तर खरेच; पण ते कायमस्वरूपी आहे असे मी म्हणणार नाही. मात्र कोविड गेल्यानंतरही पुढली काही वर्षे मुलांसाठी कठीण जातील, हे नक्की ! उदाहरणार्थ कोविड सुरू झाला तेव्हा मुले केजीमध्ये जाऊ लागली होती आणि शाळा बंद झाल्या. आता ती मुले दोन वर्षांनी मोठी झाली आहेत. शाळेत गेल्यावर जुळवून घेणे आता त्यांना कठीण जाईल. शाळेचे एक वातावरण असते. शाळेची म्हणून एक शिस्त तर असतेच. त्या शिस्तीचा व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम होतो. दोन वर्षे मुले त्यापासून वंचित राहिली आहेत. घरात सगळे आहेत, पण प्रत्येक जण स्वत:मध्ये मग्न. मुलांकडे घरातली माणसे किती लक्ष देतात हे अजून स्पष्ट झालेले नाही. काही लोक लक्ष देतात, पण बरेच आई-वडील स्वत:च चिडचिडे झाले आहेत. ते दोघे मिळून मुलांवर राग काढत आहेत असे चित्रही अनेक घरात दिसते आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. मोठी मुले वेगळ्या प्रकारच्या समस्यांची शिकार झाली आहेत. शाळा बंद होण्याच्या सुरुवातीच्या काळात बऱ्याच माता पित्यांनी मुलाना संगणक, मोबाइलकडे ढकलले. त्यांनी गेम खेळत राहावे, आपल्याला त्रास देऊ नये, म्हणुन ही युक्ती होती, पण मुले आणखी काय काय पाहत आहेत, याकडे त्यांचे लक्षही गेले नाही. अनेक मुलांना पोर्न पाहण्याची सवय लागलेली असू शकते. 

शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे यात शंका नाही. तो होतही आहे, पण समोरासमोर शिकवण्याला तो पर्याय नाही होऊ शकत. वर्गात होणारी शिक्षक आणि मुलांची नजरानजर वेगळा परिणाम करत असते. वर्गात इतर मुले असतात; त्यांच्याशी बोलणे होते. यातले काहीच आता होत नाही. ऑनलाइन शिक्षणातून ही भावनात्मक शक्ती मिळवता येत नाही. शिक्षक आणि मुलांमध्ये भावनात्मक नाते निर्माणच होत नाही. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया खुंटल्यासारखी झाली आहे. काही वर्षांनी परिस्थिती सामान्य होईल तेव्हा त्याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसतीलच.मुले कॉलनीत खेळायला जाऊ शकत नाहीत. मित्रांना भेटत नाहीत. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेत फरक पडेल. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय याचे उदाहरण देतो. एखादा अपघात होतो तेव्हा पुष्कळ लोक जमतात, पण त्यातले मोजकेच लगेच कामाला लागतात, रुग्णवाहिका बोलावतात... काही पाहून न पाहिल्यासारखे करतात... काही घटनेची खिल्ली उडवतात... भावनिक बुद्धिमत्तेनुसार प्रत्येकाचे वर्तन होते. या गोष्टी घरात बसून नाही शिकता येत. दुसऱ्याबरोबर राहण्यानेच ही कौशल्ये शिकता येतात. स्पर्शातूनही मुले बरेच शिकतात. गेल्या दोन वर्षांत भावनिक बुद्धीच्या बाबतीत खूप मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात वेगळे नुकसान झाले आहे. अनेक मुलांकडे इंटरनेटचे चांगले कनेक्शन, स्मार्टफोन आणि टॅबलेट नाहीत. साहजिकच ही मुले अभ्यासापासून लांब गेली. आता वेळ निघून चाललाय आणि अभ्यास झालेला नाही याचे दडपण त्यांच्यावर आहे. परिणामी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मानसिक बदल होत आहेत. पूर्ण देशात शाळा उघडण्याची वेळ आता आली आहे. काही राज्यांनी शाळा सुरू केल्या किंवा सुरू करण्याच्या तारखा जाहीर केल्या ही चांगली गोष्ट आहे. 

कोरोना महामारीचे मुलांवर गंभीर आणि दूरगामी परिणाम झाले आहेत. दीर्घकाळ ते राहणार असतील तर मुलांना सामान्य स्थितीत आणण्यासाठी भावनात्मक बळ कसे द्यायचे याचा विचार करावा लागेल. यासाठी मनोवैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ आणि अन्य विशेष जाणकारांचे मत, मदत घ्यावी लागेल. त्यानुसार सुधारणात्मक पावले उचलावी लागतील. सरकारला विशेष पावले उचलावी लागतील. जगातील सर्वात तरुण राष्ट्र आपले आहे. आपली मुले हेच आपले भांडवल, शक्ती आणि उद्याचे भविष्य आहेत. आपणच त्यांना जपले पाहिजे. भविष्याची यथायोग्य राखण करणे ही आपली जबाबदारी आहे!

(लेखक लोकमत एडिटोरियल बोर्ड आणि लोकमत समुहाचे चेअरमन आहेत)

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याcollegeमहाविद्यालय