शरद पवारांसह सहकार क्षेत्रातील ७० नेत्यांवर ऐन निवडणुकीच्या काळात केंद्रीय आर्थिक अन्वेषण विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावण्याचा मोदी सरकारचा विचार स्तुत्य व त्याला असलेले आर्थिक स्वच्छतेचे प्रेम प्रगट करणारा आहे. या विभागाचे वैशिष्ट्य त्याच्या एकाक्ष असण्याचे व एकारलेल्या दृष्टीचे आहे. त्याला फक्त भाजपविरोधी राजकीय नेत्यांचा ‘भ्रष्टाचार’ दिसतो. भाजपश्रेष्ठींमधील त्या दुर्गुणविशेषाचा त्याला साक्षात्कार होत नाही. नाही म्हणायला एकट्या पवारांना आणि त्यांच्या पक्षातील लोकांना आरोपी बनवणे तर पक्षपाताचा आरोप होईल, म्हणून त्या खात्याने त्या ७० जणांत इतर पक्षांतील काही लहान व बिनकामाच्या लोकांचाही समावेश केला आहे. त्यात भाजपचेही काही लोक असले, तरी त्याचा खरा रोख पवारांवर आहे. या विभागाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्यावर केलली कारवाई आज आपण पाहत आहोतच. त्याने भुजबळांची केलेली सूडोत्तर सुटका व राणेंवर ठेवलेली टांगती तलवारही आपल्याला दिसते.काँग्रेसमधील माणसे ४० वर्षांत धनवान झालेली दिसली हे खरे आहे. मात्र, भाजपमधील अनेकांनी त्यांना अवघ्या पाच-सहा वर्षांत मागे टाकले हेही खरे आहे. मात्र, काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर ती या विभागाच्या मते लाच ठरते, भाजपच्या लोकांनी घेतली, तर ती मात्र दक्षिणा ठरते. सबब तो पुण्यकृत्याचा मोबदला मानला जातो. या घटनेमुळे ७८ वर्षांचे वय असलेल्या पवारांवर काही परिणाम व्हायचा नाही. चालू निवडणुकात त्यांच्या सभांना जमणारी गर्दी पाहिली की, गेली ६० वर्षे राज्याचे राजकारण करणाऱ्या या नेत्याची लोकप्रियता अद्याप कायम आहे, हे कुणालाही समजते. ज्या कामाखातर आज त्यांच्याविरुद्ध हा ससेमिरा लावला जात आहे, ते सहकार क्षेत्रातील कुरण गेली ४० वर्षे तसेच आहे व त्यावरील चर्चाही तेवढीच आहे.
सध्याच्या पवारांवरील आरोपांचा आरंभ काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अल्पकालीन कारकिर्दीतच झाला, असे आजचे सरकार सांगत असले, तरी या कारवाईचा मुहूर्त पाहता, त्याचे राजकीय कारण दडून राहत नाही. निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रचाराची धुमाळी सुरू आहे आणि अशा वेळी सरकार हे प्रकरण पुढे आणत असेल, तर त्या मागचा हेतू न समजण्याएवढे लोकही आता खुळे राहिले नाहीत. राज्यात गेल्या काही वर्षांत अनेक पक्षांची अनेक सरकारे आली. मात्र, पवारांचा दबदबा व दरारा कायम राहिला. एवढी वर्षे राजकारणात राहिलेल्या व राज्यातील सहकाराचे क्षेत्र वाढविलेल्या या नेत्याचे साऱ्या समाजाशी व पक्षातील नेत्यांशी अतिशय आत्मीयतेचे संबंध राहिले आहेत.
जी माणसे अलीकडच्या काळात त्यांना सोडून गेली, त्यांनाही पवारांविषयी गैर बोलणे कधी जमले नाही व जमणार नाही. ज्यांनी तो प्रकार केला, त्यांना त्याचा पश्चात्ताप फार लवकर अनुभवावा लागला आहे. जो नेता दीर्घकाळ सत्तेत असतो आणि राजकारणात पुढाकार घेतो, त्याला मित्रांएवढेच शत्रूही असणार. मात्र, पवारांचे शत्रूही त्यांच्याविषयीचा दुष्टावा असलेले दिसले नाहीत. आताचे सरकार पवारांच्या परंपरेला विरोध करणाऱ्या संघपरिवाराचे आहे. त्याच्या नेत्यांनी देशाला काँग्रेसमुक्त बनविण्याची भाषा वापरली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात पवार आहेत आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तोवर आपल्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थैर्य लाभू शकणार नाही, याची भाजपच्या नेत्यांना व सरकारातील मंत्र्यांना पूर्ण कल्पना आहे. पवारांच्या पक्षातील अनेक माणसे व पुढारी त्यांचा पक्ष सोडून भाजपत जाताना राज्याने अलीकडे पाहिले. मात्र, त्यापैकी कुणालाही जनतेत पवारांएवढा आदर कधी मिळविता आला नाही. पवारांचे हे मोठेपणच भाजप व संघ यांना सलणारे आहे. पवारांनी काँग्रेस सोडून आपला राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाने काँग्रेस विरुद्ध निवडणुकाही लढविल्या. मात्र, काँग्रेसच्या लोकांनीही पवारांविषयी कधी अपशब्द वापरले नाहीत. माणूस स्वपक्षातील असो वा विपक्षातील त्याच्याशी मैत्र जोडणे हे पवारांच्या राजकारणाचे महत्त्वाचे सूत्र राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध होणारी कारवाई येत्या काळातील बदलणाऱ्या परिस्थितीवरच अवलंबून आहे.