इर्शाळगडाचा डोंगर काळ्याकुट्ट अंधारात आकाशाच्या उशीला टेकून बसलेल्या आजोबासारखा दिसायचा. त्याच्या अंगाखांद्यावर इर्शाळवाडी हे जेमतेम सव्वादोनशे लोकवस्तीचे गाव खेळत होते. या गावातील पारधी समाजातील मुले-मुली मोठी झाली. किती घरातल्या मुली लग्नकार्य करून गेल्या तर किती मुली इथे हात पिवळे करून आल्या. शिकलेली मुलं शहराकडे गेली. अनेक उन्हाळे, पावसाळे या ‘आजोबा’ने पाहिले. वरकरणी भक्कम वाटणाऱ्या या डोंगराचा दगड मात्र ठिसूळ आहे. ठाण्यातील प्रकाश दुर्वे या गिर्यारोहकाचा २३ जानेवारी १९७२ रोजी त्याने घट्ट पकडलेला दगड निसटल्याने मृत्यू झाला होता. मुंबईसह महाराष्ट्रातील गिर्यारोहकाचा तो पहिला मृत्यू. त्यानंतर या इर्शाळगडावरून किमान पाच अनुभवी गिर्यारोहक असेच दगड कोसळल्याने मरण पावलेत.
परवाच्या रात्री इर्शाळगडावरील पन्नासेक कुटुंबे पावसापाण्याची गाढ झोपून गेली. आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता. वारा वेडापिसा झाल्यागत भणाण वाहत होता. मातीच्या इवल्याशा झोपड्यांत अंगाच्या मुटकुळ्या करून म्हातारे आणि घरातील कर्ते झोपले होते. घरातील तरुण डोंगराच्या खालच्या बाजूला असलेल्या शाळेत झोपायला जायचे. वर्षानुवर्षे ज्या ‘आजोबा’च्या कुशीत विसावले त्यानेच नातू-पणतू मांडीवर असताना मान टाकावी तसा इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला. एकच हाहाकार झाला. काही समजण्यापूर्वी शेकडो जीव खोल खोल मातीत गाडले गेले. नाका-तोंडात चिखल गेला. अगोदरच अंधार दाटला होता. आता तर मृत्यूच्या वाटेवरील अंधकारमय प्रवास सुरू झाला. शाळेत झोपलेल्या मुलांना विपरीत घडल्याचे जाणवले. त्यांनीच फोन केल्यामुळे सरकारी यंत्रणांना रातोरात खबर मिळाली. ही मुले वाडीवर असती तर कदाचित सकाळ होईपर्यंत मृत्यूच्या तांडवाची जाणीव जगाला झाली नसती. गिर्यारोहक दुर्वे यांचे मित्र व ठाण्यातील ‘जाणीव ठाणे’ संस्थेचे कार्यकर्ते गेली ५० वर्षे इर्शाळवाडीत जात आहेत. तेथील गोरगरीब रहिवाशांना वैद्यकीय सेवा, कपडे, शैक्षणिक साहित्य याची मदत करीत आहेत. इर्शाळवाडीतील लोक अशा दुर्गम भागात राहत असल्याने त्यांचे डोंगराच्या पायथ्याशी महामार्गालगत पुनर्वसन करावे, असा प्रयत्न जाणीव संस्थेने १९९० च्या दशकात केला. मात्र, इर्शाळवाडीच्या रहिवाशांनी त्याला साफ नकार दिला. त्यामुळे नाईलाज झाला. सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी पृथ्वीचे वाढते तापमान व त्यामुळे भविष्यात होणाऱ्या उलथापालथी हा टवाळीचा विषय होता; परंतु, गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात एखाद्या विशिष्ट भागात ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन जीवितहानी होणे, युरोप- अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये ४६ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाणे, काही भागात समुद्राची पातळी वाढल्याने यापूर्वी दिसणारा भूभाग समुद्राच्या पोटात गडप होणे, असे असंख्य दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरागांमधील बेकायदा उत्खनन, त्यामुळे तेथील जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, दरडी कोसळण्याची भीती आदी मुद्द्यांचा उहापोह करणारा डॉ. माधव गाडगीळ यांनी दिलेला अहवाल ‘विकास विरोधी’ असल्याचा ठपका ठेवून अडगळीत फेकला. आपल्याकडे जे सत्ताधारी असतात त्यांना विकासाचे उमाळे येतात तर विरोधकांना पर्यावरणाचा ऱ्हास ठळकपणे दिसतो. कोकणातील डोंगर पोखरणाऱ्या व्यावसायिकांचे सत्ताधाऱ्यांशी किती घट्ट हितसंबंध असतात ते अनेकदा उघड झाले आहे. इर्शाळवाडी मातीखाली जाताच सत्ताधारी व विरोधक तिकडे धावले. मदतीवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केले. मात्र, अल्पावधीत अशा दुर्घटनांचे विस्मरण होण्याचा आजार लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना जडला आहे. दोन वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील तळीये गाव असेच दरडीखाली गाडले गेले. त्या गावातील वाचलेल्या अनेकांचे पुनर्वसन झालेले नाही. याचा अर्थ तळीये गावातील लोक दुर्घटनेनंतर पूर्णत: विस्थापित झाले.
पुणे जिल्ह्यातील माळीण गावाचे तीन वर्षांनंतर आता पुनर्वसन झाले. त्यामुळे इर्शाळवाडीतील वाचलेल्यांच्या नशिबात पुनर्वसनाकरिता दीर्घकाळ संघर्ष लिहिला आहे. इर्शाळवाडीतील अनेक घरातील लोक रात्री चटईवर अंग टाकल्यावर आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाची, नोकरीची, लग्नकार्याची, कोर्टात अडकलेल्या खटल्यांमधील निवाड्यांची स्वप्ने डोळ्यात साठवत निद्राधीन झाली असतील. या झोपेतून आता आपण परत उठणारच नाही, ज्या आजोबाच्या कुशीत विश्वासाने विसावलोय तोच आपल्याला गिळून टाकणार, याची पुसटशी कल्पनाही त्यांना आली नसेल. मृत्यू हे वास्तव आहे; पण तो इतका भीषण असू नये.