ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला! पाकिस्तान आणि चीनमध्ये वापरात असलेल्या भाषांमध्ये अशा आशयाची म्हण आहे की नाही, हे माहीत नाही; पण गत काही काळातील चीनच्या हरकती बघू जाता, चीनला पाकिस्तानचा गुण लागला, असे नक्कीच म्हणता येईल! कुरापतखोर आणि अन्यायग्रस्त या दोन्ही भूमिका एकाचवेळी वठवण्याचे पाकिस्तानचे कसब, चीननेही चांगलेच आत्मसात केलेले दिसते. पाकिस्तानवगळता एकाही शेजारी देशाशी चीनचे सख्य नाही. चीन प्रत्येकासोबत कुरापती उकरून काढत असतो आणि वरून शेजाऱ्यांनीच त्याचा भूभाग बळकावल्याचा आरोप करीत असतो. भारतासंदर्भातही चीनचे तेच सुरु आहे.
भारतासोबतच्या १९६२मधील युद्धानंतर भारत - चीन सीमेवर बराच काळ बऱ्यापैकी शांतता होती. मात्र, गत काही वर्षांपासून चीनने पुन्हा एकदा कुरापती काढणे सुरु केले आहे. चीन कधी देपसांग, डोकलाम, अथवा गलवानमध्ये घुसखोरी करतो, तर कधी भारतीय नेत्यांच्या अरुणाचल प्रदेश भेटींवर आक्षेप घेतो. कधी ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखण्याचा प्रयत्न करतो, तर कधी अरुणाचल प्रदेशवर दावा करीत, त्या भारतीय राज्यामधील गावांची, प्रदेशांची नावे बदलण्याचा उपद्व्याप करतो. भारत सोडून जाताना ब्रिटिश चीनसोबतची सीमारेषा निश्चित करून गेले नाहीत. त्याचा लाभ घेत चीन सतत कोणत्या ना कोणत्या भारतीय भूभागावर हक्क सांगत असतो. उभय देशांदरम्यान सीमारेषा व्यवस्थापनासंदर्भात काही करार झाले आहेत. त्या करारांचे पालन करीत अलीकडील काळापर्यंत संघर्ष टाळला गेला. पण, गत काही वर्षांत चीनची आक्रमकता वाढत चालली आहे आणि त्याचे दृश्य परिणाम सीमेवर वारंवार बघायला मिळत आहेत. जून २०२०मध्ये चिनी सैनिकांनी गलवान या ठिकाणी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यामुळे उभय देशांचे सैनिक एकमेकांना भिडले होते आणि त्यामध्ये २० भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. काही चिनी सैनिकही ठार झाले होते. पण, चीनने प्रारंभी ते नाकारले आणि पुढे मान्य केले तरी मृतांचा आकडा अजूनही सांगितलेला नाही. भारताची नव्याने कुरापत काढताना, चीनने नववर्षदिनी गलवानमध्ये त्यांचा राष्ट्रीय ध्वज फडकवल्याचा दावा करणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यानंतर भारतीय सैनिकांनीही त्याच ठिकाणी नववर्षदिनीच तिरंगा फडकावल्याची छायाचित्रेही समोर आली आहेत. त्यामुळे चीनच्या दाव्यातील हवा निघाली असली तरी नजीकच्या काळात उभय देशांमधील संघर्ष संपुष्टात येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही.
एकीकडे सीमेवर अशा रितीने सतत तणाव कायम असताना दुसरीकडे उभय देशांमधील व्यापार मात्र वाढतच चालला आहे. गलवानमधील भारतीय सैनिकांच्या हौतात्म्यानंतर भारतात चीनच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत होता. त्यावेळी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन समाजमाध्यमांमधून केले जात होते. अल्पकाळ त्याचा प्रभाव दिसला. पण, आता पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठा चिनी वस्तूंनी गजबजल्या आहेत. चीनसोबतची भारताची व्यापारी तूट ४४ अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड आहे. भारत चिनी उत्पादनांवर अवलंबून असल्याचे हे द्योतक आहे. लहान मुलांच्या गोष्टीतील राक्षसाचा प्राण ज्याप्रमाणे पिंजऱ्यातील पोपटात अडकून पडलेला असतो, त्याप्रमाणेच चीनचा प्राण व्यापारात अडकून पडला आहे. चीन भारताशी थेट युद्ध न पुकारता हळूहळू घुसखोरी करीत भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रकारे भारतानेही चीनच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का देणे गरजेचे आहे. त्यासाठी चीनकडून होणारी आयात कमी करीत नेणे हा जसा एका पर्याय आहे, तसाच चीनसोबत संघर्षरत असलेल्या देशांशी व्यापारी संबंध वृद्धिंगत करणे, हादेखील एक पर्याय आहे.
जपान, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया यांसारख्या चीनसोबत सीमा विवाद असलेल्या देशांशी आर्थिक व लष्करी संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न भारताने करायला हवा. `बिमस्टेक’, `क्वॉड’सारख्या संघटना आणखी मजबूत करण्याचा प्रयत्नही भारताने करायला हवा. चीन भारताच्या शेजारील देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढून अंकित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या देशांना शक्य तेवढे सहकार्य करण्याची भूमिका भारताने घ्यायला हवी. सोबतच चीनला रोखून धरण्यासाठी अमेरिकेला जी भारताची गरज आहे, तिचा पुरेपूर फायदा करून घेणे आणि त्याचवेळी रशिया पूर्णपणे चीनच्या बाजुला झुकणार नाही, याची दक्षता घेण्याची तारेवरची कसरतही भारताला करावी लागणार आहे.