शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

संपादकीय: गांधारीचा शकुनीला शाप? अफगानिस्तानात जे घडतेय ते पाहून शांततेची शक्यता नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 7:53 AM

तालिबान आणि इस्लामिक स्टेट-खुरासान या दोन्ही संघटना एकमेकींच्या कट्टर वैरी आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकन व अफगाण राष्ट्रीय सैन्याने इस्लामिक स्टेट-खुरासानचा जवळपास बीमोड केला होता.

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर भारतात समाजमाध्यमांमध्ये एक पोस्ट खूप व्हायरल झाली. ‘गांधार नरेश, तुझ्यामुळे माझ्या शंभर पुत्रांचा जीव गेला, त्यामुळे यापुढे तुझा देश कधीही शांती अनुभवणार नाही!’ असा शाप कौरव-पांडव युद्धाच्या समाप्तीनंतर गांधारीने शकुनीला दिला होता आणि त्या शापामुळेच अफगाणिस्तान सतत धगधगत आहे, अशा आशयाची ती पोस्ट आहे. यामधील विनोदाचा भाग सोडून द्या; पण अफगाणिस्तानात गत काही वर्षांपासून जे काही घडत आहे ते बघू जाता, त्या देशाला नजीकच्या भविष्यात शांतता लाभण्याची दुरान्वयानेही शक्यता दिसत नाही. विशेषतः गुरुवारी काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर तर येथून पुढे अफगाणिस्तानचा प्रश्न अधिकाधिक चिघळण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेद्वारा काबूल विमानतळावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती अमेरिका आणि ब्रिटनद्वारा व्यक्त केली गेली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच काबूल विमानतळावर घडविण्यात आलेल्या दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये १३ अमेरिकन सैनिकांसह किमान ११० जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तालिबाननेही या हल्ल्यासाठी इस्लामिक स्टेटच्या खुरासान शाखेलाच जबाबदार ठरविले आहे. तालिबान आणि इस्लामिक स्टेट-खुरासान या दोन्ही संघटना एकमेकींच्या कट्टर वैरी आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकन व अफगाण राष्ट्रीय सैन्याने इस्लामिक स्टेट-खुरासानचा जवळपास बीमोड केला होता. त्यामध्ये तालिबानचाही हातभार लागला होता. मात्र, आता अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर ती संघटना पुन्हा तोंड वर काढू लागल्याचे दिसत आहे. काबूल विमानतळावरील भीषण स्फोटांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय, अशी शंका वाटू लागली आहे. वीस वर्षांपूर्वी अल कैदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर भीषण दहशतवादी हल्ला चढवला होता. तेव्हा ९/११ या नावाने इतिहासात नोंद झालेल्या त्या हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी अमेरिकेने तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानवर भीषण हल्ला चढवला आणि अल कैदाला आश्रय दिलेल्या तालिबानच्या सत्तेचे उच्चाटन केले. यथावकाश अमेरिकेने अल कैदाचा सर्वेसर्वा असलेल्या ओसामा बिन लादेनलाही यमसदनी धाडले; परंतु या सव्यापसव्यात अमेरिकन सेना तब्बल वीस वर्षे अफगाणिस्तानात अडकून पडली. शेवटी ज्यांना सत्तेतून घालवले त्या तालिबानसोबतच वाटाघाटी करून अमेरिकेला अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागला.

आज पुन्हा एकदा तालिबान अफगाणिस्तानात सत्तेत आहे आणि अल कैदाच्या जागी इस्लामिक स्टेट-खुरासन ही दहशतवादी संघटना अमेरिकेला आव्हान देऊ बघत आहे. हे झाले साम्य! फरक हा आहे की, २००१ मध्ये तालिबान अल कैदाच्या सोबत होते, तर यावेळी इस्लामिक स्टेट-खुरासन तालिबानलाही आव्हान देत आहे. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने अमेरिका व तालिबान एकमेकांना सहकार्य करतील का आणि अल कैदाप्रमाणे इस्लामिक स्टेट-खुरासनचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिका पुन्हा एकदा स्वतःला अफगाणिस्तानात अडकवून घेईल का, हे प्रश्न काबूल विमानतळावरील हल्ल्यामुळे उपस्थित झाले आहेत. काबूल विमानतळावरील हल्ल्याची ९/११ सोबत तुलना केली जाऊ शकत नाही, हे खरे आहे. मात्र, अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेताना केलेल्या घिसाडघाईमुळे अडचणीत सापडलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दबाव काबूल विमानतळ हल्ल्यामुळे निश्चितच वाढलेला आहे. घटती लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी ते इस्लामिक स्टेट-खुरासानला शिंगावर घेण्याचा धोका पत्करतील का, हे बघावे लागेल. बायडेन यांनी तो धोका पत्करून पुन्हा अफगाणिस्तानात सैन्य उतरवायचे ठरवल्यास, त्यांना एकाच वेळी तालिबान, अल कैदा आणि इस्लामिक स्टेट-खुरासानसोबत लढावे लागेल. त्यामुळे बायडेन यांच्याद्वारा तो मार्ग स्वीकारला जाण्याची शक्यता फार कमी आहे. प्रशासनाचा अननुभव, आर्थिक तंगी, जगातील बहुतांश देश अंतर राखून, या पार्श्वभूमीवर तालिबानला हे आव्हान पेलणे सोपे सिद्ध होणार नाही. त्याचाच दुसरा अर्थ हा की, अफगाणिस्तानच्या नशिबी आणखी एक रक्तरंजित पर्व लिहिलेले आहे! गांधारीने शकुनीला खरोखरच शाप दिला होता की नाही, हे तर आपल्याला माहीत नाही; परंतु अफगाणी जनतेच्या नशिबात आणखी काही काळ शांतता, स्वस्थता नाही, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ दिसत आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान