विजय तेंडुलकरांनी अखेर ही ‘अनैतिहासिक दंतकथा’ असल्याचे जाहीर करून टाकले! पण, प्रत्यक्षात ‘घाशीराम कोतवाल’ नावाचे नाटक हीच नवा इतिहास घडवणारी दंतकथा ठरली. ५० वर्षे उलटली तरी ‘घाशीराम’चे गारूड कायम आहे. ‘घाशीराम’ रंगभूमीवर आले, तेव्हा देश स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा करत होता. इंग्रज गेले, पण त्यांच्याजागी जे आले, त्यांनी कमी भ्रमनिरास केलेला नव्हता. पाकिस्तानचा पराभव भारताने केल्यानंतर बांगलादेश स्वतंत्र होऊन एक वर्ष झाले होते. काही दिवसांनी आणीबाणी लादेपर्यंत मजल जावी, एवढे ‘कोतवाल’ उन्मत्त झाले होते.
सांस्कृतिक भुयारातून शिवसेनेने मुंबईवर मांड ठोकणे सुरू केले होते. अशावेळी ‘घाशीराम कोतवाल’ रंगमंचावर दाखल झाले. नाना फडणवीसांनी जिथे ‘राज्य’ केले, त्या पुण्यात हे नाटक आले. श्रीगणराय नर्तन करू लागले आणि त्या नमनानेच चिरेबंदी वाडे हादरले. आहेत त्या सत्ताधीशांमध्ये प्रेक्षकांना फडणवीस आणि घाशीराम दिसू लागले. उपरोधाने खचाखच भरलेले हे रूपक एवढे जमून आले की, राजकीयच काय, ज्यांची सत्ता सांस्कृतिक आहे, ते सर्वाधिक हादरले! हे नाटक ऐतिहासिक ठरणार, याची खात्री पहिल्या प्रयोगालाच पटली. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात झाला. टोकाचा विरोध आणि तेवढेच प्रचंड कौतुक ‘घाशीराम’ला मिळाले. आशय म्हणून तर हे नाटक चाकोरी मोडणारे होतेच, पण ‘नाटक’ म्हणूनही ते तेवढेच अनवट होते. संगीत, अभिनय, संवाद, दृश्यांची ताकद आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रकाशयोजना असे सगळे पदर एकत्र गुंफले जात होते. नेपथ्य म्हटले तर काही नाही. पण, सगळ्या कला एकमेकांचा हात धरून रंगमंचावर उभ्या. विजय तेंडुलकरांसारखा नाटककार. संगीत भास्कर चंदावरकर यांचे. कृष्णदेव मुळगुंद यांची नृत्ये आणि दिग्दर्शक जब्बार पटेल. असे रसायन यापूर्वी कधी जमून आले नसेल आणि नंतरही अभावानेच दिसले असेल. लावणी, अभंग, लोकसंगीत, दशावतार, भारूड, तमाशा, कीर्तन, रागदारी -ठुमरी, भूपाळी, असे सारेच. शिवाय नृत्य, गायन, अभिनय, समूहाचे आकृतिबंध हे सगळे यात होते. खरे सांगीतिक नाटक कसे असते, याचा वस्तुपाठ म्हणजे ‘घाशीराम’. पण, ते तेवढेच नव्हते. या नाटकात एकूणच कलात्मक सामर्थ्य होते. अगदी आशयाला विरोध करणारेही या ‘फॉर्म’च्या प्रेमात होते. महाराष्ट्रच काय, देश-विदेशात या नाटकाचे प्रयोग झाले. ‘युरोपीयन थिएटरला प्रेरणा देणारे नाटक भारतातून आले आहे’, अशा शब्दांत ‘गार्डियन’ने तेव्हा ‘घाशीराम’चा गौरव केला होता. अर्थातच, या नाटकाला झालेला विरोधही कमी नव्हता.
पुस्तक असो की नाटक, व्यवस्थेला वेगळ्या विचारांचे नेहमीच भय वाटत असते. रंगमंचावर ‘घाशीराम’चा प्रयोग सादर झाल्यानंतर लगेच नाटकाला विरोध सुरू झाला. त्यामुळे १९ प्रयोगांनंतर ते बंद पडले. पुढे १९७३ मध्ये पुन्हा सुरू झाले. सगळ्या विरोधाला ‘घाशीराम’ पुरून उरले. नवनव्या संचात ते येत राहिले. रूपेरी पडद्यावरही आले. ‘घाशीराम’ आज ५० वर्षांचे होत असताना, काळ अगदी बदललेला आहे. नाटकातला काळ दोनशे वर्षांपूर्वीचा. आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहे. एकविसाव्या शतकातील माध्यम क्रांतीने जग खिशात सामावले आहे. ‘घाशीराम’ यूट्यूबवर दिसावे, एवढी माध्यमे बदललेली आहेत. तरीही, ‘घाशीराम’ ताजेच आहे. सत्ताधीशांना पुस्तक आवडले नाही, म्हणून जोवर एका ‘जीआर’ने पुरस्कार परत घेतले जात आहेत, तोवर ‘घाशीराम’ला मरण नाही. बलात्कार आणि खून करणारे सत्तेच्या आशीर्वादाने उजळ माथ्याने मिरवताहेत, तोवर ‘घाशीराम’ कालबाह्य होणार नाही. सत्तेसाठी सोयीच्या संस्कृती सांगितल्या जात आहेत, तोवर ‘घाशीराम’ला मरण नाही.
सत्तेचा बेलगाम, बेमुर्वतखोर वापर आहे, तोवर ‘घाशीराम’ आहे. विजय तेंडुलकर पडद्याआड गेले. चंदावरकर आणि मुळगुंदही गेले. मात्र घाशीराम आहे. उलटपक्षी आज ते अधिकच समकालीन वाटावे, अशा वळणावर आपण आलो आहोत. म्हणूनच, इतिहासातला घाशीराम पुण्यातच ठेचून मारला गेला असला तरी तेंडुलकरांचा- पन्नाशीची उमर गाठलेला ‘घाशीराम’ मात्र जिवंत आहे. ‘घाशीराम कोतवाल’ नावाची अनैतिहासिक दंतकथा अमर आहे. “ऐका होऽऽऽ ऐका, आजपासून घाशीराम सावळदास यास पुण्याचा कोतवाल केला आहे हो ऽऽऽ”, ही दवंडी म्हणूनच आजच्या व्हाॅट्सॲपच्या जमान्यातही तेवढीच हादरवून टाकते आहे!