किरण अग्रवाल
कोरोनाच्या दहशतीमुळे एकीकडे सर्वत्र भयाचे वातावरण दाटले असताना दुसरीकडे मात्र या भयाची कसलीही तमा न बाळगता अगर शासन प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाला ठोकरून लावत जागोजागी नागरिकांची जी गर्दी होतांना दिसत आहे, त्यातुन संबंधितांची नादानी तर उघड व्हावीच व्हावी, परंतु या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठीचे कोणतेही नियोजन न करणाऱ्या यंत्रणांची बेफिकिरी वा दुर्लक्षही अधोरेखित झाल्याखेरीज राहू नये.
दुसऱ्या लाटेत कोरोनाने जवळपास प्रत्येकच घरात शिरकाव केल्याचे चित्र आहे. पहिल्या लाटेत केल्या गेलेल्या कम्प्लिट लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जो फटका बसला त्यातून बाहेर पडता आलेलें नसतानाच दुसरी लाट आली, ज्यात जीवितहानी मोठ्या प्रमाणात घडून येत आहे. कोरोनाच्या या लाटेत महाराष्ट्राचा नंबर प्रारंभी देशात अव्वल राहिला, परंतु आता नव्या रुग्णांमध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू पुढे असून महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारत आहे. राज्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणातही दोन कोटींचा टप्पा ओलांडला असून, एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. मुंबई-पुणे-नाशिक या अगोदर हॉटस्पॉट ठरलेल्या महानगरातील बाधितांची संख्याही कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असले तरी बेफिकीर होऊन चालणार नाही. पण दुर्दैवाने तसेच काहीसे होताना दिसत आहे. पहिल्या लाटेतून बाहेर पडत असताना जी चूक घडून आली तीच पुन्हा होताना दिसून यावे, हे चिंताजनकच म्हणायला हवे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अटकाव करण्यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या अधिक आढळत होती तेथे प्रारंभी काही निर्बंध घालण्यात आले होते, त्याचे पुरेसे पालन न झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू करण्यात आले; आता त्या निर्बंधात काहीशी शिथिलता आणली जात असताना पुन्हा बाजारातील गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. बँका उघडताच मर्यादित वेळेत व्यवहार करण्यासाठी अशी काही तोबा गर्दी उडत आहे की ते चित्र पाहूनच धडकी भरावी. विशेषतः दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांखेरीज पेन्शन घेण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिकही रांगेत गर्दी करून उभे राहिलेले पहावयास मिळाले. निगुतीने संसाराचा गाडा ओढणाऱ्यांची यातील अपरिहार्यता समजून घेता येणारी असली तरी, ही गर्दी संसर्गाला निमंत्रण देणारी ठरली तर आश्चर्य वाटू नये. लसीकरणाच्या ठिकाणीही अशीच गर्दी उसळत आहे, त्यामुळे पोलिसांना तैनात करून त्यावर नियंत्रण मिळवण्याची वेळ आली आहे. या गर्दीतील गरजूंची मानसिकता लक्षात घेता यावी, पण यंत्रणांना यात काही सुसूत्रता आणून फिजिकल डिस्टंसिंग साधता येऊ नये का, हा यातील खरा प्रश्न आहे.
सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी येणाऱ्यांकडून बादल्या व हंडा कळशीच्या रांगा लावल्या जातात किंवा पूर्वी रॉकेलच्या दुकानासमोर कॅनच्या रांगा लावल्या गेलेल्या दिसत, तसे आता लसीकरणासाठी काही ठिकाणी पादत्राणांच्या रांगा लावून संबंधित नागरिक झाडाखाली सावलीत बसल्याची चित्रे पहावयास मिळत आहेत. या सावलीतही डिस्टनसिंगचा नियम पायदळी तुडविला जात आहे. मास्क वापरला म्हणजे फिजिकल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर बसविला तरी चालेल असा गैरसमज अनेकांनी करून घेतलेला दिसतो. कोरोनाच्या संसर्गाला यातून निमंत्रण मिळून जाण्याचाच धोका आहे, तेव्हा यंत्रणांनी यासंदर्भात उपाय योजणे गरजेचे बनले आहे. एकदाचे कडक निर्बंध पाळून झाले म्हणजे त्यानंतर अनिर्बंधपणे वागायचे, वावरायचे ही भूमिकाच मुळी चुकीची आहे. निर्बंधांच्या शिथिलतेत निर्धारित कालावधीत खरेदी करायची मुभा असताना उर्वरित वेळेतही लोक बाहेर पडत आहेत व त्यांना अडवणारेही कुणी दिसत नाही; अशा ठिकाणी यंत्रणांनी आपला रोल निभावणे गरजेचे आहे. न ऐकणाऱ्या किंवा निर्बंध न पाळणाऱ्या लोकांना त्यांच्या हालवर सोडून दिल्यासारखी दुर्लक्षाची अगर बेपर्वाईची भूमिका घेऊन चालणार नाही, अन्यथा तिसरी लाट थोपविणे अवघड ठरेल.