भारतीय भूकंपाचे धक्के टोरंटोत बसले आहेत. कारण, ज्यामुळे भूकंप होतो त्या टेक्टोनिक प्लेट्स सरकल्या आहेत... ही वाक्ये बुद्धिबळाचा रशियन सम्राट मानल्या जाणाऱ्या गॅरी कास्पारोव्हची आहेत आणि त्याचा थेट संबंध प्रत्यक्ष भूकंपाशी नव्हे तर गुकेश डी. या अवघ्या सतरा वर्षांच्या भारतीय छोऱ्याने जिंकलेल्या फिडे कॅन्डिडेट्स स्पर्धेशी आहे. या स्पर्धेचा विजेता जगज्जेतापदाच्या लढतीत विद्यमान जेत्याला आव्हान देतो आणि डोम्माराजू गुकेश हा चेन्नईत राहणारा तेलुगू किशोर ही स्पर्धा जिंकणारा जगातील सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने गॅरी कास्पारोव्हचाच विक्रम इतिहासजमा केला. तोदेखील तब्बल पाच वर्षांच्या फरकाने.
४० वर्षांपूर्वी, १९८४ मध्ये २२ वर्षांच्या गॅरी कास्पारोव्हने ही स्पर्धा जिंकून अनातोली कारपोव्हला जगज्जेतापदासाठी आव्हान दिले होते. आता पुढच्या विश्वविजेत्याच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनपुढे गुकेशचे आव्हान असेल. युरोपियन खेळाडू नसलेली ही अपवादात्मक लढत असेल. अजून या लढतीची तारीख व स्थळ ठरले नसले तरी गुकेशच्या चमत्कारी कामगिरीने जगभर आतापासून तिची चर्चा सुरू झाली आहे. कास्पारोव्हने टेक्टोनिक प्लेट्स सरकल्या, असे जे म्हटले त्यालाही जागतिक बुद्धिबळातील भारताच्या प्रभावाचा लक्षवेधी संदर्भ आहे. भारत व बुद्धिबळ म्हटले की पहिले नाव डोळ्यासमोर येते त्या विश्वनाथन आनंदने स्वत:च्या कामगिरीने बुद्धिबळ घराघरात पोहोचवला, त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली, तरुण मुलांना प्रेरणा दिली, यशासाठी पाठीवर कौतुकाची थाप तर अपयशानंतर दिलासा दिला, त्या आनंदच्या योगदानाला कास्पारोव्हने दिलेली ही दाद आहे.
काही महिन्यांपूर्वी रमेशबाबू प्रज्ञानानंदा व त्याही आधी आपल्या नाशिकच्या विदित गुजराथीने जागतिक मंचावर देखणी कामगिरी नोंदविली. यंदाच्या कॅन्डिडेट्स स्पर्धेतही हे दोघे चांगले खेळले. पण, गुकेश अप्रतिम खेळला. गुकेशने प्रज्ञानानंद व विदितला या स्पर्धेतही हरवले. चौदा फेऱ्यांमध्ये पाच विजय, अलिरेझा फिरौजाविरुद्ध एकमेव पराभव आणि आठ बरोबरीतून ९ गुणांसह कॅन्डिडेट्स स्पर्धाच नव्हे तर आनंदसह सगळ्या ज्येष्ठांची मनेही जिंकली. फिरौजाविरुद्ध गुकेश हरल्यानंतर त्याचे सांत्वन करण्यासाठी, उमेद वाढविण्यासाठी आनंद गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले, की त्याला अशा सांत्वनाची गरजच नाही. वयाच्या मानाने प्रौढ वाटावा, इतका गुकेश मानसिकदृष्ट्या खंबीर आहे.
स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेशनेही सांगितले, की त्या पराभवानंतरच आपण विजेतेपद मिळवू शकतो हा आत्मविश्वास आला. बुद्धिबळासाठी स्थिरचित्त वृत्ती, शांत परंतु तितकाच खंबीर स्वभाव अशा ज्या गुणांची आवश्यकता आहे, ती गुकेशमध्ये आहे आणि त्याच बळावर तो अत्यंत वेगाने यशाची एकेक पायरी चढत पुढे निघाला आहे. एखादे यश हुकले तरी त्यावर तो खूप विचार करत बसत नाही. अपयश पाठीवर टाकून जिद्दीने पुढचे सामने खेळतो. जानेवारी २०१९ मध्ये १२ वर्षे, ७ महिने व १७ दिवसांत तो जगातील दुसरा सर्वांत तरुण ग्रॅण्डमास्टर बनला. सर्जेई कर्जाकिन याचा विक्रम अवघ्या १७ दिवसांच्या फरकाने हुकला. परंतु, त्याची खंत करीत तो बसला नाही. गुकेशचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशातील गोदावरी डेल्टा भागातील रहिवासी. वडील रजनीकांत हे कान-नाक-घसा सर्जन, तर आई पद्मा मायक्रोबायोलॉजिस्ट. चेन्नईत त्यांचा व्यवसाय आहे. सातव्या वर्षांपासून तो बुद्धिबळाकडे वळला असला आणि नववा वाढदिवस साजरा करण्याआधीच एशियन स्कूल चेस चॅम्पियनशिप जिंकली असली तरी त्याची जागतिक स्तरावरील झेप हा अवघ्या दीड-दोन वर्षांतला चमत्कार आहे.
२०२१ च्या ऑगस्टमध्ये तो ३११ व्या स्थानी होता. वर्षभरात चक्क ३८ व्या स्थानी पोहोचला. त्यानंतरच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील नेत्रदीपक कामगिरीने त्याला पुढच्या ऑगस्टमध्ये टॉप-२० मध्ये पोहोचविले. त्यानंतर महिनाभरात त्याने २७०० गुणांकनाचा टप्पा गाठला आणि ही कामगिरी करणारा बुद्धिबळ इतिहासातला तो तिसरा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. महिनाभरानंतर, ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत केले. जगज्जेता बनल्यानंतरचा कार्लसनचा तो पहिला पराभव होता. गेल्या वर्षी थेट जिवंतपणी दंतकथा बनलेल्या विश्वनाथन आनंदला मागे टाकून गुकेश भारताचा क्रमांक एकचा खेळाडू बनला. दरम्यान, आपला १७ वा वाढदिवस गुकेशने पुन्हा कार्लसनला पराभूत करून साजरा केला आणि तो जागतिक मानांकनात टॉप-१० मध्ये पोहोचला. गुकेशची ही घोडदौड पाहता काही महिन्यांत भारताला नवा जगज्जेता मिळू शकतो. त्यासाठी गुकेशला शुभेच्छा देऊया!