आपल्या सर्वांनाच ते माहीत आहे. ऑनलाइन असणं ही प्रत्येकाची गरज झाली आहे. आपण ‘दिसणं’, ‘असणं’ आणि आपलं ‘अस्तित्व’ दाखवणं हा प्रत्येकाच्या जगण्याचाच अविभाज्य भाग झाला आहे. त्याचबरोबर आपण इतरांपेक्षा किती वरचढ आहोत, दुसऱ्याला आपण किती खाली दाखवू शकतो, याबाबतची चढाओढही सोशल मीडियावर सातत्यानं सुरू असते. अलीकडच्या काळात राजकीय ध्रुवीकरण आणि धर्मांधता यामुळे होणारी ऑनलाइन छळवणूक आणि दुसऱ्यांना टोमणे मारणं यात तर इतकी वाढ झाली आहे की एकमेकांची उणीदुणी काढण्याचं ते एक लोकप्रिय व्यासपीठच झालं आहे. ‘आम्ही’ विरुद्ध ‘तुम्ही’ असं युद्ध हातात तलवारी पारजून सतत लढलं जात असतं. आपण जसजसे ‘शिक्षित’ होत आहोत, तसतसे अधिकाधिक एकारलेले आणि एककल्ली होत चाललो आहोत, असे निरीक्षण तज्ज्ञांनीही नोंदविले आहे.
सोशल मीडियावर चालणारी ‘हेट स्पिचेस’ हे आपल्या एकारलेल्या मानसिकतेचे तर कारण आहेच, पण त्यामागे आणखीही एक कारण आहे. संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही वावरता त्या ठिकाणचे तापमान, वातावरण कसे आहे यावरही तुम्ही कसे वागता हे अवलंबून असतं. तुम्ही अति थंड किंवा अति उष्ण वातावरणात राहत असाल तर तुमच्या मेंदूचा तोल बिघडतो. मेंदू काहीसा सटकतो आणि तम्ही थोडे बेताल वागू लागता, असं हे संशोधन सांगतं. नेमकं सांगायचं तर जेव्हा आपण १२ ते २१ अंश सेल्सिअस (५४ ते ७० अंश फॅरनहीट) तापमानात असतो, तेव्हा आपला मेंदू समतोल पद्धतीनं कार्य करतो आणि आपला मूडही चांगला असतो. यावेळी आपण ‘फील गूड’ अनुभव घेत असतो. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमानात मात्र आपला मेंदू थोडा बावचळल्यासारखा होतो आणि त्याचं तंत्र बिघडतं. अशा वातावरणात जे लोक राहातात, त्यांच्याकडून सोशल मीडियावर ‘हेट स्पिचेस’चा वापर जास्त केला जातो.
सर्वसाधारण तापमानात राहाणारे लोक मात्र तुलनेनं समंजस, समतोल वागतात, हे त्यांनी कोट्यवधी लोकांच्या संशोधनातून सिद्ध केलं आहे. ‘पोट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च’ या संस्थेनं याविषयी अत्यंत विस्तृत आणि सखोल असं संशोधन केलं आहे. किती लोकांच्या ट्वीटचा त्यांनी अभ्यास करावा? या संस्थेनं २०१४ ते २०२० या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अमेरिकेतील लोकांनी केलेल्या तब्बल चार अब्ज ट्वीट्सचा अभ्यास केला. यामध्ये अमेरिकेतील ७७३ शहरांतील वेगवेगळ्या तापमानात राहाणाऱ्या लोकांनी कोणत्या वेळी काय ट्वीट केलं याचा सविस्तर अभ्यास केला. द लॅन्सेट प्लेनेटरी हेल्थ या संस्थेनंही या संशोधनाचा अभ्यास करून अनेक महत्त्वाचे निष्कर्ष काढले. त्यात आढळून आलं की, ज्या ठिकाणचं वातावण ‘नॉर्मल’पेक्षा कमी किंवा जास्त होतं, अशा ठिकाणच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात भडकावू संदेश सोशल मीडियावर टाकले. यातला आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, जे लोक आपला राग, संताप प्रत्यक्ष व्यक्त करू शकले नाहीत, त्यांनी आपल्या मनातला सगळा विखार ऑनलाइन व्यक्त केला.
इतक्या बारकाईनं हा अभ्यास केला गेला की, संशोधकांनी हेदेखील शोधून काढलं की कोणता संदेश कोणत्या शहरातून, कोणत्या भागातून पाठवला गेला आहे आणि ज्यावेळी हा संदेश पाठविला गेला, त्यावेळी त्या ठिकाणचं तापमान किती होतं... ज्यावेळी, ज्या ठिकाणचं तापमान सरासरीपेक्षा जास्त किंवा कमी होतं, अशा ठिकाणाहून केल्या गेेलेल्या हेट स्पीचचं प्रमाण जास्त होतं. अमेरिकेत कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक वंशाच्या लोकांना जास्त टार्गेट केलं जातं. त्याचं प्रमाण अनुक्रमे २५ आणि दहा टक्के आहे. या अभ्यासाचा आणखी एक धक्कादायक निष्कर्ष म्हणजे, ज्यावेळी तापमान जास्त थंड किंवा जास्त उष्ण होतं, त्या काळात एलजीबीटीक्यू समुदायालाही मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केलं गेलं. यावेळी त्यांच्या विरोधात केल्या गेलेल्या हेट स्पिचेसचं प्रमाण तब्बल चार पटींनी जास्त होतं.
हेट स्पीचचं प्रमाण २२ टक्के अधिक!ज्या ठिकाणी वाळवंटसदृश वातावरण होतं आणि तापमान साधारण ४२ ते ४५ अंश सेल्सिअस होतं, अशा ठिकाणी भडकावू, विद्वेषजनक, मत्सरी हेट स्पीचचं प्रमाण तब्बल २२ टक्क्यांनी वाढलेलं होतं. तर ज्या ठिकाणी तापमान उणे तीन ते उणे पाच अंश सेल्सिअस होतं, अशा ठिकाणीही निंदा-नालस्ती करणाऱ्या संदेशांचं प्रमाण १२.५ टक्क्यांपेक्षा अधिक होतं. जे लोक श्रीमंत आहेत आणि एसी वगैरे वापरण्याची ज्यांची क्षमता आहे, अशा ठिकाणीही हेट स्पीचचं प्रमाण जास्त होतं, हे विशेष.