सद्यस्थितीतून काँग्रेसची वाटचाल कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:30 AM2019-06-07T03:30:53+5:302019-06-07T03:31:24+5:30
निकालामुळे लोक जसे प्रभावित झाले आहेत, पराभूत उमेदवारांचीही तीच अवस्था झाली आहे. त्यांच्या नेत्यांची व पक्षाची स्थिती त्याहून वेगळी नाही.
डॉ. एस. एस. मंठा
सध्या आपला देश अत्यंत खळबळजनक स्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. निवडणुकीच्या निकालांनी देशातील अर्धी लोकसंख्या उत्सव साजरा करीत आहे तर उरलेली लोकसंख्या या अभूतपूर्व निकालाचा सामना कसा करायचा अशा दिङ्मूढ अवस्थेत आहे. समाजात आढळणारी अशांतता स्पष्ट आहे. यानिमित्ताने मित्र आणि कुुटुंबीय हे देशापुढील मूलभूत विषयासंबंधी चर्चा करू लागले आहेत. ही चर्चा करताना ज्यांच्याशी त्यांची मैत्री होती त्यांची मैत्री नाकारण्याचीही त्यांची तयारी आहे. निवडणुकीच्या निकालांनी काही जणांवर विपरीत परिणामही झाल्याचे दिसते. त्यामुळे ते काळजीत दिसतात व त्यांची झोपही उडून गेल्याचे दिसते. अर्थात कालांतराने त्यांच्यात दिसणारी ही चिन्हे नाहीशीसुद्धा होतील. पण त्यासाठी त्यांनी शहाणपणा दाखवून स्वत:ची जहाल भूमिका टाकून दिली पाहिजे व कुणाचीही बाजू न घेता शांततेत जगण्याचा मार्ग स्वीकारायला हवा.
निकालामुळे लोक जसे प्रभावित झाले आहेत, पराभूत उमेदवारांचीही तीच अवस्था झाली आहे. त्यांच्या नेत्यांची व पक्षाची स्थिती त्याहून वेगळी नाही. सत्तारूढ पक्षाला विजयाचा आनंद वाटणे स्वाभाविक आहे, कारण त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिल्यामुळे त्यांना सत्तेत परत येता आले आहे. त्यात त्यांची काहीच चूक नाही. त्यांनी आखलेले धोरण अचूक होते व त्या धोरणाविषयी त्यांनी तपशीलवार आखणी केली होती. त्या धोरणाची अंमलबजावणी दोषरहित होती. त्यामुळेच आश्चर्यकारक निकालाची उपलब्धी त्यांना प्राप्त झाली. या निवडणूक निकालांनी जशी अव्यवस्था निर्माण झाली तशी ती यापूर्वी कधीच झाली नव्हती. परंपरागत लोकशाही पद्धतीचे रूपांतर अध्यक्षीय राजवटीत झाल्याचा भास होत होता. ‘‘तुमचे प्रत्येक मत हे सरळ माझ्यापर्यंत पोहोचेल’’, या मोदींनी व्यक्त केलेल्या भावनांमुळे प्रत्येक उमेदवाराची उमेदवारी निरर्थक ठरली. उमेदवार अनुभवी आहे की आरोपी आहे की नवखा आहे की नालायक आहे, याचा काही फरक पडत नव्हता.
लोकशाही व्यवस्था टिकून राहण्यासाठी प्रबळ विरोधी पक्षाची गरज असते, हे जरी खरे असले तरी आज संपूर्ण जगातच लोकशाहीची पिछेहाट होताना दिसत आहे. थायलंड आणि व्हेनेझुएला येथे लोकशाही अपयशी ठरली तसेच युकेडॉर, हंगेरी, निकारगुवा, फिलिपाइन्स, पोलंड आणि टर्की येथेही लोकशाहीची पिछेहाट झाली आहे. भारताचे दुर्दैव असे की देशातील सर्वात जुना पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावणेसुद्धा शक्य झालेले नाही. या पक्षाने आत्मपरीक्षण करून पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे प्रामाणिक प्रयत्न केले तर तो पक्ष पाच वर्षांत पुन्हा स्वबळावर उभा राहू शकेल.
पक्षाने स्वत:त परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकूण वातावरणाविषयी पुनर्विचार करावा आणि पक्षाची नव्याने बांधणी करावी. त्यासाठी पक्षाच्या तळातील ज्या संस्था आहेत तेथे तरुण, शिक्षक, कामगार आणि निष्ठावान कार्यकर्ते यांची फौज उभी करावी लागेल. आजच्या पिढीच्या आकांक्षांचा विचार प्रामुख्याने करावा लागेल आणि पक्षात प्राण ओतावा लागेल. तसेच विचारांची लढाई करण्याची तयारी करावी लागेल. त्यादृष्टीने पुढची पाच वर्षे आत्मपरीक्षणाची असतील. याशिवाय वक्त्यांची फळी निर्माण करावी लागेल. लोक मध्यममार्गी भूमिका स्वीकारायला सहजासहजी तयार होत नाहीत. केव्हा कोणती भूमिका घ्यायला हवी याचे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. पक्षाने सतत निरनिराळे विषय हाताळायला हवेत. कारण लोकांना तेच आवडते. परस्परविरोधी इच्छा बाळगून कुणाचेच भले झालेले नाही. त्यांच्यासाठी राष्ट्राचा अजेंडा तयार केला पाहिजे म्हणजे मग स्वत:पुरता विचार करण्याच्या प्रवृत्तीचा नाश होईल.
रोजगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक, भाववाढीवर नियंत्रण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींवर सर्वंकष विचार करण्यासाठी अभ्यास गट नेमून त्यांच्याकडून श्वेतपत्रिका तयार करून घ्यावी. ही समिती स्वत:चा अजेंडा नसलेली व कुणाची बांधिलकी असलेली नसावी. तिने पक्षाचे ध्येयधोरण निश्चित करावे. हे धोरण निश्चित करताना निरनिराळ्या घटकांना प्राधान्य द्यावे लागेल. त्यात बाजारपेठेचे स्वरूप, आपल्या सांस्कृतिक परंपरा, राष्ट्राचे स्पर्धक, राष्ट्राची साधनसंपत्ती आणि उद्दिष्टे यांचा समावेश असावा. याशिवाय आक्रमण आणि संरक्षणविषयक धोरण, अन्य लोकाभिमुख धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी यांचाही समावेश असावा. एकूणच परिवर्तन घडवून आणण्याची पक्षाने तयारी करायला हवी.
हे करताना काँग्रेसने आपली सत्ता असलेल्या राज्यातही बदल घडवून आणण्याची तयारी करायला हवी. विशेषत: कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांत सत्तेचे विरेचन करण्याची गरज आहे. सत्तेमुळे माणसे चिकटून राहतात. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी लोकांना दिलेली अभिवचने पूर्ण करण्याचा प्रयत्न पक्षाने करावा. जे लोक अडचणीत आहेत त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे पक्ष विनाशापासून व मानखंडनेपासून वाचू शकेल. याशिवाय केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील विचारधारा, साहसवाद आणि तंत्रज्ञान यामुळे त्या राज्यातील विद्यमान सत्तेची गणिते बिघडण्याची शक्यता आहे. ती आव्हाने स्वीकारण्याची काँग्रेसची तयारी असायला हवी.
(लेखक माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस आहेत)