अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा शहरात पार पडलेल्या ऐतिहासिक शिखर परिषदेमुळे जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला असे जरी म्हणता येणार नसले, तरी जगातील दोन सर्वात शक्तिशाली देश पुन्हा एकदा वाटाघाटींच्या मेजावर आल्यामुळे थोडा दिलासा नक्कीच मिळाला आहे.
द्वितीय महायुद्धापासून अमेरिका आणि रशियादरम्यान सुरू झालेल्या शीतयुद्धाची तीव्रता आता पूर्वीसारखी राहिली नसली तरी, सर्वाधिक अण्वस्त्रसाठा बाळगून असलेले हे दोन देश एकमेकांच्या पुढ्यात उभे ठाकले की, जगाच्या छातीत नक्कीच धस्स होते. जगातील सर्वात प्रबळ राष्ट्र होण्याची मनीषा बाळगून असलेला चीन, कोणत्याही परिस्थितीत क्रमांक एकचे राष्ट्र हे बिरुद गमावण्यास तयार नसलेली अमेरिका आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सामर्थ्य व प्रतिष्ठेच्या शोधात असलेला रशिया, अशा या तीन राष्ट्रांमधील संघर्षामुळे जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या खाईत ढकलले जाते की काय, अशी धास्ती शांतताप्रेमींना सदैव वाटत असते. त्यातच साम्यवादी विचारसरणीवर पोसलेले रशिया व चीन गत काही काळापासून अमेरिकेच्या विरोधात एकत्र येऊ लागल्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली आहे. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीवरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चीनवर अमेरिका सातत्याने आगपाखड करीत आहे आणि अमेरिकेत जो बायडन यांची राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाल्यापासून अमेरिका व रशियादरम्यानचा विसंवादही एवढा वाढला होता, की रशियाने अमेरिकेतील राजदूत माघारी बोलावला होता व अमेरिकेच्या राजदूताला देश सोडून जाण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर जिनेव्हा येथे पार पडलेल्या शिखर परिषदेत अमेरिका व रशियादरम्यानच्या संबंधांचे गोठलेले बर्फ वितळण्यास प्रारंभ झाल्यामुळे, या शिखर परिषदेला नक्कीच ऐतिहासिक संबोधता येईल. यापूर्वी १९५५ आणि १९८५ मध्येही अमेरिका व रशियादरम्यानचा तणाव चरमसीमेवर पोहोचल्यानंतर, जिनेव्हा येथेच उभय देशांदरम्यान शिखर परिषदा पार पडल्या होत्या. त्याच मालिकेतील ही तिसरी शिखर परिषद म्हणता येईल. जो बायडन सत्तेत आल्यानंतर त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना ‘खुनी’ संबोधले होते. शिखर परिषदेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बायडन यांना त्या वक्तव्यासंदर्भात छेडले असता, ते अजूनही त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे विधान त्यांनी केले. त्यामुळे शिखर परिषद पार पडली म्हणून उभय देशांदरम्यान लगेच सगळे आलबेल होईल, असा भाबडा आशावाद बाळगण्यात काही अर्थ नाही; पण किमान विसंवाद संपुष्टात येऊन सुसंवादास प्रारंभ झाला, हेदेखील नसे थोडके! बायडन आणि पुतीन यांच्यात जवळपास चार तास चाललेल्या चर्चेत, केवळ राजदूतांना परत पाठविण्यावरच सहमती झाली नाही, तर शस्त्रास्त्र नियंत्रण आणि सायबर सुरक्षेसारख्या अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
शिखर परिषदेचे व्यापक फलित कळायला काही काळ जाऊ द्यावा लागेल; पण किमान संवाद सुरू झाल्यामुळे एकमेकांविषयीची अविश्वासाची भावना कमी व्हायला तरी मदत होईल. तत्कालीन सोविएत रशियाचे तुकडे झाल्यानंतर, आता जगात आपणच एकमेव महासत्ता आहोत आणि आपण म्हणू ती पूर्व दिशा असेल, असे अमेरिकन नेतृत्वाला वाटू लागले होते. काही काळ तसे घडताना दिसलेदेखील; मात्र त्यानंतर रशियात पुतीन यांचा उदय झाला आणि त्यांनी रशियाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधला. सोविएत कालखंडातील केजीबी या पाताळयंत्री गुप्तहेर संस्थेत काम केलेले पुतीन हे खमके नेते आहेत. त्यांनी अमेरिकेच्या ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देण्याचे धोरण अवलंबले. तेव्हापासूनच अमेरिका आणि रशियादरम्यानचा तणाव पुन्हा एकदा वाढू लागला होता. त्यातच अमेरिकेला नमविण्यासाठी म्हणून रशिया गत काही वर्षात चीनच्या जवळ गेला. एवढेच नव्हे तर जे जे देश अमेरिकेच्या विरोधात आहेत, त्या सगळ्यांशी मैत्री करायला रशियाने प्रारंभ केला. रशियाच्या या डावपेचांमुळे जगाची पुन्हा एकदा दोन गटांमध्ये विभागणी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी अशी विभागणी झाली, तेव्हा दोनदा जग महायुद्धांच्या वणव्यात होरपळून निघाले. द्वितीय महायुद्धात फक्त अमेरिकेजवळच अण्वस्त्र होते. आज किमान डझनभर देशांकडे हजारोंच्या संख्येने अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे आता जर महायुद्धाचा भडका उडाला तर जगात कुणी शिल्लक तरी राहील की नाही, हाच प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियादरम्यान किमान सुसंवाद सुरू होणे आत्यंतिक गरजेचे होते. तसा तो केल्याबद्दल बायडन आणि पुतीन यांचे अभिनंदन केलेच पाहिजे!