युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दूरत:संस्कृत भाषेतील या सुभाषिताचा अर्थ हा आहे की, ज्याप्रमाणे दुर्गम पर्वत आणि गणिकेचे मुखमंडल दुरूनच बघायला चांगले, त्याप्रमाणेच युद्धाच्या कथाही श्रवण करण्यापुरत्याच रम्य! युद्ध अंतत: उभय पक्षांसाठी हानीकारकच सिद्ध होते, हा हजारो वर्षांचा इतिहास आहे. मात्र तो ज्ञात असूनही मनुष्याला युद्धाचे सुुप्त आकर्षण असतेच! त्यामुळेच युद्धाची खुमखुमी नित्य अनुभवायला मिळते. सध्या आपला शेजारी देश असलेल्या चीनलाही अशीच युद्धाची खुमखुमी आली आहे. केवळ भारतच नव्हे, तर तैवान, जपान, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपीन्स, व्हिएतनाम, ब्रुनेई या शेजारी देशांसोबतच अमेरिका व ऑस्ट्रेलिया या सुदूर देशांसोबतही चीन एकाचवेळी कुरापती उकरून काढत आहे. एवढेच नव्हे, तर कधीकाळी ज्या देशाकडून साम्यवादाचे धडे घेतले, त्या रशियासोबतही चीनचा सीमावाद आहेच!
उत्तर सीमेवरील मंगोलियासोबतही तेच! नव्याने व्यायामशाळेत जाऊन बेटकुळ्या फुगवू लागलेला एखादा नवयुवक जसा कुणासोबतही भांडण करण्यासाठी फुरफुरत असतो, तशी सध्या चीनची गत झाली आहे. साम्यवादाची झूल कायम ठेवून भांडवलशाहीची कास धरल्यानंतर आलेली समृद्धीची सूज, प्रचंड क्षेत्रफळ व लोकसंख्या आणि तंत्रज्ञानाची चोरी करून विकसित केलेली शस्त्रास्त्रे या बळावर हा विस्तारवादी देश सर्व शेजारी देशांना धाकात ठेवू बघत आहे. एकमेव महासत्ता बनून जागतिक पटलावर मोठी भूमिका बजावण्याची स्वप्ने बघत आहे. त्यासाठी सहकार्याऐवजी संघर्षाची वाट चीनने चोखाळली आहे. मात्र द्वितीय महायुद्धोत्तर काळात महासत्ता म्हणून वावरलेल्या अमेरिका व रशियाने तो बहुमान केवळ ताकदीच्या नव्हे, तर मित्र राष्ट्रांच्या सहकार्याच्या बळावर मिळविला होता, हे चीन विसरला आहे.
कोरोना आपत्तीनंतर तर भारताचा पारंपरिक शत्रू असलेला पाकिस्तान आणि दक्षिण कोरियाचा पारंपरिक शत्रू असलेला उत्तर कोरिया वगळता चीनला जागतिक पटलावर एकही मित्र उरलेला नाही. त्या दोन्ही देशांची शक्ती, पत आणि विश्वासार्हता तर सर्वज्ञात आहे! उद्या चीनचा कोणत्याही शेजारी देशासोबत संघर्ष उफाळला आणि त्यामध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, आदी प्रबळ देश चीनच्या विरोधात उतरले, तर चीन एकटा त्यांचा मुकाबला करू शकणार आहे का? आताच चीनचा भारतासोबत सीमा संघर्ष उफाळला असताना, अमेरिकेने युरोपमधील सैन्य तैनाती कमी करून आशियात वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भविष्यात काय होऊ शकते, याची ही चुणूक आहे. त्यावेळी पाकिस्तान आणि उत्तर कोरिया हे संपूर्णत: चीनचे आश्रित असलेले देश चीनला कोणती मदत करू शकतील?
चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला शह देण्यासाठी हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया-भारत अशी आघाडी उभी करण्याचा अमेरिकेचा मानस आहे. जपान व ऑस्ट्रेलिया त्यासाठी एका पायावर तयार आहेत. मात्र जोपर्यंत भारत त्या आघाडीत सहभागी होत नाही, तोवर चीनच्या हिंद महासागरातील महत्त्वाकांक्षांना पायबंद घालणे शक्य नाही, याची अमेरिकेलाही जाणीव आहे. आजपर्यंत भारत ते टाळत आला आहे; मात्र भारतासोबतच्या सीमेवर युद्धसदृश स्थिती निर्माण करून चीन एकप्रकारे भारताला त्या दिशेने ढकलत आहे. एकीकडे अमेरिकेच्या कच्छपी लागू नका, असा भारताला अनाहूत सल्ला द्यायचा आणि दुसरीकडे भारताला त्याच वाटेवर जाण्यास भाग पाडायचे, हा चीनचा खेळ अनाकलनीय आहे. वस्तूत: भारतासोबत चांगले संबंध ठेवणे चीनसाठी खूप फायदेशीर आहे. उभय देशांमधील व्यापाराचे तागडे चीनच्या बाजूला खूप झुकलेले आहे. तरीही चीन वारंवार भारतासोबत कुरापत उकरून काढत आहे, याचा अर्थ ती चीनची गरज आहे! त्यामागे केवळ भारताचा भूभाग बळकावणे एवढी इच्छाच असू शकत नाही.
चीनमध्ये पोलादी पडदा अद्याप कायम आहे. त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर झिरपत नाहीत. बाह्य जगास अज्ञात असलेल्या अशाच एखाद्या कारणास्तव भारतासोबत संघर्षाची स्थिती निर्माण करणे चिनी नेतृत्वासाठी आवश्यक झालेले असू शकते; पण चीनला युद्धस्य कथा कितीही रम्य वाटत असल्या, तरी भारतासोबत युद्ध परवडू शकत नाही, याचीही जाणीव आहे. त्यामुळे सध्याच्या संघर्षाचे युद्धात रूपांतर होण्याची शक्यता नसली, तरी चीनच्या डोळ्याला डोळा भिडवून उभे राहणे गरजेचे आहे. चीनला तीच भाषा समजते!