वैचारिक बैठक ही राजकारणाला स्थैर्य देणारी आहे; आम्ही तीच गमावून बसलो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 02:57 AM2019-06-08T02:57:03+5:302019-06-08T02:58:05+5:30

विकासाचा विचार, कार्यक्रम किंवा तात्त्विक नसली तरी किमान वैचारिक बैठक राजकारणाला स्थैर्य देते. आम्ही तीच गमावून बसलो आहोत. परिणामी, राजकारण अधांतरी बनले आहे. त्यात श्रद्धा, अंधश्रद्धा, देव आहेत. फक्त समाज नाही.

Editorial on Indian politics lost ideological views | वैचारिक बैठक ही राजकारणाला स्थैर्य देणारी आहे; आम्ही तीच गमावून बसलो

वैचारिक बैठक ही राजकारणाला स्थैर्य देणारी आहे; आम्ही तीच गमावून बसलो

Next

तत्त्वज्ञाने राजकारणातून कधीचीच बाद झाली आहेत. आता कुणी मार्क्सवादी नाही, समाजवादी नाही आणि गांधीवादीही नाही. असले तरी ते एकएकटे व सांदीकोपऱ्यात वा अधूनमधून वृत्तपत्रांत लिहून ‘आम्ही अजून आहोत’ हे सांगत असतात. विचारांभोवती माणसे येत नाहीत. त्यावर पक्ष संघटित होत नाहीत. एकेकाळचे वैचारिक पक्ष आता इतिहासजमा झाले व त्यांची जागा धर्म व जातीसारख्या जन्मदत्त बाबींनी घेतली. धर्म व जातीवर आधारलेल्या पक्षांना विचार नको असतो. तत्त्वज्ञानाचा तर त्यांना गंधही नसतो. एक नेता व त्याचे भाषण त्याला सांभाळायला पुरेसे असते. भारतात अडीचशेहून अधिक पक्ष आहेत. त्यातल्या किती जणांना तरी त्यांचा वैचारिक कार्यक्रम सांगता येतो? काही पक्ष तर एखादी व्यक्ती किंवा तिचा अहंकार यामुळेही निर्माण झालेले आपण पाहतो. एका विशिष्ट काळानंतर त्यांचा मुद्दा संपून गेला, की तो पक्ष-त्याचे अस्तित्वही त्याच पद्धतीने विरून जाते. भाषक अस्मिता किंवा त्या पद्धतीचा हुंकार देत स्थापन झालेल्या पक्षांचे स्वरूप कालांतराने कसे बदलेले हेही आपल्या लोकशाही व्यवस्थेने पाहिले. त्यांनी अनेकदा तो मूळ मुद्दा सोडून दिल्याचे दिसून आले,

तर कधी सोईस्कररीत्या त्याला बगल देत नवा मुद्दा हाती घेत त्याची भलामण केल्याचे पाहायला मिळाले. कधी एका दिवंगत महापुरुषाचे नाव सांगायचे, जातींचा आधार घ्यायचा. आरक्षणाची मागणी करायची आणि त्या साऱ्याला पक्षाचे नाव द्यायचे? आता भांडवलशाही नाही, समाजवाद नाही, मार्क्सवाद नाही आणि तसला विचार बाळगणारेही त्यांचा उच्चार करीत नाहीत. गांधी, आंबेडकर किंवा सावरकर यांची नावे चालतात. हिंदू, मुसलमान वा जातींची नावे चालतात. मात्र त्यांचे विचार त्यांच्या कुंपणापल्याड जात नाहीत. एकेका प्रश्नासाठी वा समूहासाठी येणाऱ्या संघटनांचे आयुष्य तरी केवढे असणार? प्रथम स्वातंत्र्यलढ्यात पक्ष निर्माण झाले. पुढे त्या काळातील विचारांचे विरोधक झाले. आता तो लढा नाही आणि त्याचे विरोधकही नाहीत. मध्यंतरी धर्माचे स्तोम माजविले गेले व धर्मवादी पक्ष आले. जनसंघ किंवा भाजप, अकाली किंवा नॅशनल कॉन्फरन्स, रिपब्लिकन किंवा बसपा यांचे नेमके स्वरूप वैचारिक नाही. ते धार्मिक, जातीय वा असलेच तर प्रादेशिक आहे.

धर्मांचे आयुष्य जरा मोठे म्हणून हे पक्ष टिकतात. पुढे मंडल आयोगानंतर जाती व पोटजातींचे पक्ष आले. आजही त्यांचा बुजबुजाट मोठा आहे. पासवान, लालू, नितीश, मुलायम आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी हे पक्ष व त्यांचे तसेच सोबती साऱ्या देशात आहेत. येथे संघटित लोकशाही किंवा द्विपक्ष पद्धती कशी येणार? विचार संवादाने साधता येतो, तो परस्परांच्या गळी उतरविता येतो. पण जाती-धर्माचे कसे करणार? आता त्याला पर्याय म्हणून क्षेत्रावर आधारलेले पक्ष तयार होत आहेत किंवा काही जुने पक्ष द्वेषाचा आधार त्यांच्या राजकारणासाठी घेऊ लागले आहेत. मग ते अल्पसंख्याकांचा राग करतात, दलितांवर रोष धरतात, ब्राह्मणांवर हल्ले चढवितात. आजही जात व धर्म सोडून बाकीच्यांना दोषी धरण्याचे राजकारण समाज तोडणारे व त्यात दुही माजविणारे असते. गांधी व आंबेडकरांसारखी माणसे ऐक्याचे राजकारण करू शकतात ते राष्ट्रवादी होतात. पण आताचे ममता, मुलायम, लालू, चंद्राबाबू किंवा शरद पवार हे कसे होणार? त्यासाठी राष्ट्रीय संघटन लागते किंवा राष्ट्रीय विचार लागतो. तो फक्त काँग्रेसजवळ आहे. भाजप हा पक्ष मोठा असला तरी त्याचा आधार विचार नाही. धर्मश्रद्धा आहे. पण सध्या धर्म व जातीची भाषा चालते.

ती अशिक्षितांहुनी सुशिक्षितांना अधिक भावते. हे नवशिक्षित व नवश्रीमंतांचे वर्ग विचारांमागे कधी जाणार की तेथेच राहून आहे तसेच आपल्या पुढल्या पिढ्यांनाही बनविणार? कार्यक्रम, विकासाचा विचार किंवा तात्त्विक नसली तरी किमान वैचारिक बैठक ही राजकारणाला स्थैर्य देणारी आहे. आम्ही तीच गमावून बसलो आहोत. परिणामी, राजकारण अधांतरी बनले आहे किंवा नुसतेच पूजा, आरत्या, बॅण्डबाजे, ईश्वर आणि अल्ला यातच गुंतले आहे. त्यात माणसे नाहीत. श्रद्धा आहेत, अंधश्रद्धा आहेत, देव आणि श्रद्धा आहेत. फक्त समाज नाही.

Web Title: Editorial on Indian politics lost ideological views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.